Welcome to   Click to listen highlighted text! Welcome to

MaharashtraAssemblyUpdate : विधानसभेच्या हिवाळी अधिवेशनात नेमकं काय झालं ? का खवळले देवेंद्र फडणवीस ?

Spread the love

मुंबई : राज्याच्या विधीमंडळाच्या हिवाळी अधिवेशनाचा पहिला दिवस सत्ताधारी आणि विरोधक यांच्यातील खडाजंगीने चांगलाच गाजला. कर्नाटकात छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याच्या विटंबनेवरून सत्ताधारी पक्षाने प्रचंड आक्रोश करीत कर्नाटक मुख्यमंत्र्यांचा धिक्कार केला . तर शिवसेनेचे आमदार भास्कर जाधव यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची नक्कल केल्याने भाजपच्या आमदारांनी आक्षेप घेत त्यांना माफी मागण्यास भाग पाडले.


दरम्यान आजच्या प्रकारावर विधानसभेचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी संध्याकाळी विधान भवन परिसरात पत्रकार परिषद घेऊन आजच्या अधिवेशनातील घडामोडींवर आपली भूमिका मांडली. दरम्यान विधानसभेच्या अध्यक्षपदाची निवडणूक ही यावेळी आवाजी मतदान पद्धतीने घेण्याचा निर्णय झाला खरा परंतु या निर्णयावर विरोधी पक्षाकडून आक्षेप घेण्यात आला आहे. फडणवीस यांनी याच निर्णयावरुन महाविकास आघाडी सरकारवर निशाणा साधला. महाविकास आघाडी सरकार १७० आमदारांचा पाठिंबा असल्याचा दावा करते. पण आपल्या आमदारांवरच विश्वास नसलेले हे सरकार आहे, अशी टीका त्यांनी यावेळी केली.

फडणवीस म्हणाले कि , अध्यक्षपदाच्या निवडणुकीकरता जो प्रस्ताव आज मांडण्यात आला त्या प्रस्तावातून हे सरकार किती असुरक्षित आहे हे आपल्या सगळ्यांचा लक्षात आले . गेल्या ६० वर्षांपासून विधानसभा अध्यक्षांची निवडणूक ही गुप्त मतदान पद्धतीने झाली. अगदी जेव्हा विरोधी आणि सरकार पक्ष यांच्यात पाच ते सात मतांचा फरक होता त्यावेळेसही गुप्त मतदान पद्धतीने निवडणूक झाली. पण १७०आमदार आमच्याकडे आहेत असे सांगणाऱ्या महाविकास आघाडी सरकारला नियम बदलून खुल्या पद्धतीने ही निवडणूक घेण्याची नामुष्की ओढावली आहे. याचे कारण त्यांच्यातील जो असंतोष आहे. हा असंतोष इतका भयानक आहे की त्यांना खात्री आहे गुप्त मतदान पद्धतीने केले तर त्यांचे आमदार अध्यक्षपदाच्या निवडणुकीत असंतोष व्यक्त करतील. त्यांच्यावर नामुष्की येईल. म्हणून त्यांनी नियम बदलण्याचा घाट घातला आहे. हे करत असताना इतक्या घाईत हे सगळे करण्यात आले आहे.

घाबरलेले सरकार

मुळात पहिल्यांदा नियम समितीच्या बैठकीत अहवाल तयार करण्यात आला. विशेष म्हणजे भाजपच्या नियम समिती सदस्यांना निमंत्रणच देण्यात आले नाही. नियम समितीत त्यांचे बहुमत असतानाही त्यांनी भाजपच्या सदस्यांना टाळण्याचा प्रयत्न केला. आज सभागृहात नियम समितीचा रिपोर्ट आणताना नियमानुसार दहा दिवसांचा कालावधी द्यायला पाहिजे होता. काही आक्षेप असतील तर पुन्हा नियम समितीची बैठक बोलावली पाहिजे. पुन्हा नियम समितीने त्यावर निर्णय केले पाहिजेत. त्यानंतर ते नियम पुन्हा सभागृहात सादर केले पाहिजेत. ही सगळी पद्धत डावलून चुकीच्या पद्धतीने अत्यंत घाईघाईने आवाजी मतदानाने हा अहवाल मंजूर करुन दहा दिवसांची मुदत एक दिवसांवर आणण्याचा प्रयत्न केला. त्यासंदर्भात आम्ही पोल मागत होतो. पण पोलदेखील दिला गेला नाही. हे सरकार घाबरलेले सरकार आहे. आपल्या आमदारांवर विश्वास नसलेले हे इतिहासातील पहिले सरकार आहे अशी टीकाही फडणवीस यांनी केली.

सरकारने मान्य केलेली कर्जमाफी फसवी

“विजेच्या बाबतीत आम्ही लक्षवेधी मांडली. गावचे गाव बंद आहेत. पाण्याचे पंप बंद आहेत. मंत्री म्हणतात आम्हाला राज्य सरकार पैसे देत नाही. शेतकऱ्यांचे वीज कनेक्शन कापत आहेत. सरकार सांगते थकबाकी वाढली. ते व्याजावर व्याज लावत आहेत. आज आम्ही शेतकऱ्यांची मदतीची मागणी लावून धरली. सरकारने मान्य केलेली कर्जमाफी फसवी आहे. शेतकऱ्यांना किती पैसे मिळाले ते मी वाचून दाखवले. दीड लाखात अख्खा जिल्हा यांनी मदत केली”, असा दावा फडणवीसांनी केला.

भास्कर जाधव यांचे वर्तन आक्षेपार्ह

दरम्यान या सभागृहाचा दुरुपयोग करण्यात आला. शिवसेना भास्कर जाधव यांचे वर्तन लज्जास्पद होते. पंतप्रधान जे बोलले नाही ते त्यांच्या तोंडी टाकले. त्यांनी जी नक्कल केली ती आक्षेपार्ह होती. हे वर्तन सहन होणार नाही. तुम्ही आमच्या नेत्यांचे अंगविक्षेप कराल, आम्ही सहन करु, असे  होणार नाही , अशी भूमिका त्यांनी यावेळी मांडली.

आपलं सरकार

Click to listen highlighted text!