MaharashtraRainUpdate : कोकण , मराठवाडा , विदर्भात पावसाचा धुमाकूळ, आजही कुठे रेड , कुठे ऑरेंज तर कुठे यलो अलर्ट

मुंबई : कोकणातील रत्नागिरी, सिंधुदुर्गासह मराठवाडा, उत्तर महाराष्ट्र, विदर्भातील जिल्ह्यांना पावसाने अक्षरश: झोडपून काढले आहे. मुसळधार पावसामुळे नदी, नाले ओसंडून वाहू लागले असून अनेक ठिकाणी रस्ते, घरे, दुकानांत पाणी शिरल्याचं पहायला मिळत आहे. तर कुठे मुसळधार पावसामुळे गावांचा संपर्क तुटला आहे. त्यातच आता हवामान विभागाने राज्यातील ११ जिल्ह्यांना ऑरेंज अलर्ट जाहीर केला आहे. तर एका जिल्ह्यासाठी रेड अलर्ट जाहीर केला आहे.
हवामान खात्याने वर्तवलेल्या अंदाजानुसार, राज्यात पावसाचा जोर आणखी दोन दिवस कायम राहण्याचा अंदाज आहे. दरम्यान मुंबई, ठाणे, रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, कोल्हापूर, सातारा, पुणे, नाशिक, धुळे, नंदुरबार या ११ जिल्ह्यांना ऑरेंज अलर्टचा इशारा देण्यात आला आहे. तर पालघर जिल्ह्याला रेड अलर्ट आणि जळगाव, औरंगाबाद, बुलडाणा, जालना आणि अकोला जिल्ह्यांना यलो अलर्ट देण्यात आला आहे.
उत्तर महाराष्ट्रातही संततधार सुरू असून, गेल्या आठवडय़ात पावसाने हाहाकार माजवलेल्या चाळीसगावला पुन्हा सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे. चाळीसगाव तालुक्यातील धरण क्षेत्रात मोठय़ा प्रमाणात पाऊस सुरू आहे. त्यामुळे चितेगाव आणि उंबर ओहळ धरणांतून मोठय़ा प्रमाणात पाणी ओसंडून वाहत आहे. चाळीसगाव शहरातून वाहणाऱ्या तितूर आणि डोंगरी या नद्यांचे पाणी मोठय़ा प्रमाणावर वाढत आहे. कन्नड घाटातील दरडी हटविण्याचे काम अजूनही सुरू असतानाच पुन्हा दरडी कोसळल्या आहेत. औरंगाबादकडे जाण्यासाठी या घाटाला पर्याय म्हणून वापर होणाऱ्या नागद घाटातही दरडी कोसळल्याने हा घाटही बंद झाला आहे.