MaharashtraRainUpdate : मुसळधार पावसामुळे मोठ्या प्रमाणात नुकसान , जनजीवन विस्कळीत , जालना जिल्ह्यात दोघांचा मृत्यू

औरंगाबाद : मराठवाड्यासह राज्यात पावसाने धुमाकूळ घातला असून भरपावसात जनावरांना चारा आणण्यासाठी गेलेल्या दोन भावंडांचा विजेचा धक्का लागून मृत्यू झाल्याची घटना जालना जिल्ह्यातील भोकरदन तालुक्यातील लिंगेवाडीत घडली आहे.पवन गजानन घोडे (२२) व सचिन रामकीसन घोडे (२२) अशी या दोन मयत भावंडांची नावं आहेत.
भोकरदन तालुक्यात काल पहाटेपासून पावसाची संततधार सुरू असल्याने जनावरांना बाहेर चरण्यासाठी सोडणे शक्य नव्हते. चारा घेण्याच्या उद्देशाने गेलेल्या दोघा भावांना अचानक विजेच्या धक्का लागला. शेजाऱ्यांनी आरडा-ओरडा करत त्यांची सुटका केली. त्यानंतर दोघांना तत्काळ भोकरदन येथील ग्रामीण रुग्णालयात दाखल केले. मात्र तोपर्यंत उशीर झाला होता. डॉक्टरांनी दोघांना तपासून मृत घोषित केले. दोघांवरही ग्रामीण रुग्णालयात शवविच्छेदन करण्यात आले आहे. त्यानंतर उशीरा लिंगेवाडी येथे त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले. या घटनेमुळे लिंगेवाडी गावावर शोककळा पसरली आहे.
दरम्यान बीड जिल्ह्यालाही जोरदार पावसाने झोडपून काढले विविध ठिकाणी नदीला आलेल्या पुरात चार जण वाहून गेल्याच्या घटना घडल्या आहेत. यात दोन जणांना सुखरूप बाहेर काढण्यात यश आले तर दोन जणांचा बुडून मृत्यू झाला आहे. यात एका महिलेचा व तरुणाचा समावेश आहे. तालुक्यातील कपिलधार येथील नदीमध्ये दोन तरुण वाहून गेले यात ओकार विभूते या तरुणाला वाचविण्यात यश आले असून यशराज कुडकेला शोध सुरू आहे. दुसऱ्या घटनेत वडवणी तालुक्यातील परडी माटेगाव येथील महिलेचा पाय घसरून नदी पडली, यात तिचा बुडून मृत्यू झाला. मनिषा अशोक शेंडगे (वय 32 वर्ष) असं मयत महिलेचं नाव आहे. तिसऱ्या घटनेत केज तालुक्यातील वाघे बाभुळगाव या ठिकाणी पापनाशी नदी पुलावरून पाणी वाहत असताना एका व्यक्तीने इंडिका गाडी पुलावरून घालण्याचा प्रयत्न केला मात्र चालकाला वाचवण्यात गावकऱ्यांना यश आले.
अनेक ठिकाणी मुसळधार
गेल्या दोन दिवसांपासून कोकणातही जोरदार पाऊस बरसत असून रात्री अतिमुसळधार पाऊस झाला. ढगफुटीसदृश्य पावसाने हाहाकार उडाला असून नागरिकांच्या घरात, वस्त्यांमध्ये पाणी शिरले आहे. रत्नागिरी जिल्ह्यातील दापोली अतिवृष्टीमुळे जनजीवन विस्कळीत झाले असून अतिमुसळधार पावसाने काही रस्ते जलमय झाले आहे आहेत. तर काही ठिकाणी गावाकडे जाणारे रस्ते वाहून गेले आहेत, मालेगाव, मनमाड, नांदगाव, येवला, सटाणासह नाशिकच्या ग्रामीण भागात पावसाने धुमाकूळ घातला असून मंगळवार दुपारपासून पावसाला सुरूवात झाली होती. त्यानंतर पावसाचा जोर वाढला आणि मेघगर्जनेसह मुसळधार पावसाने या भागाला अक्षरशः झोडपून काढले. रात्रभर पावसाची संततधार सुरू होती. जोरदार पावसामुळे अनेक नदी नाल्याना पूर येऊन ते दुथडी भरून वाहत आहे.
औरंगाबादमध्ये जोरदार पाऊस
औरंगाबाद शहरासह जिल्ह्यात जोरदार पाऊस झाला. शहरात झालेल्या पावसाने शहरात नदी नाले भरले, त्यामुळे सखल भागात पाणी शिरले. पैठण गेट बरुदगर नाला भागातील अनेक नागरिकांच्या घरात पाणी शिरले. पैठण परिसरातील अनेक दुकानांमध्ये पाणी शिरल्याने नुकसान झाले आहे. ग्रामीण भागातही कन्नड आणि सिल्लोड भागात काल दिवसभर पाणी असल्याने अनेक प्रकल्प ओवरफ्लॉव झाले आहेत. छोटे पूल पाण्याखाली गेल्याने रात्री अनेक गावांचा संपर्क अजून तुटलेला आहे.
बुलडाणा जिल्ह्यातही काल झालेल्या पावसाने सर्वसामान्यांची दाणादाण उडवून टाकली आहे..या पावसात बुलडाणा जिल्ह्यातील पिकांचे मोठे नुकसान झाले आहे. तर पुराच्या पाण्यात वाहून गेल्याने दोघांचा मृत्यू झाला आहे. याशिवाय अनेक घरांची पडझड झाली असून १०५ नागरिकांचे स्थलांतरण करण्यात आले आहे. नद्यांना पूर आला आहे. एका गावात पाण्याच्या पुरातून काही जनावरं पाण्यातून वाट काढत असताना अचानक जोर वाढला आणि काही जनावरं पाण्यात वाहून गेली. पण, काही अंतरावर दूर गेल्या गाय परत बाहेर आली.शेगांव तालुक्यातील मौजे जवळा येथील आदित्य संतोष गवई (वय 18) हा पुराच्या पाण्यात वाहून गेला त्याचा मृतदेह सापडला असून पोस्टमार्टमसाठी साई बाई मोटे रुग्णालयात रवाना केला आहे. हा मृतदेह जवळापासून काही अंतरावर तिन्त्रव या गावानजिक असलेल्या कोल्हापुरी बंधाऱ्याजवळ आढळून आला.