AurangabadNewsUpdate : वक्फ बोर्डाची जमीन परस्पर व्यापा-यांच्या घशात – खा. इम्तियाज जलील

महापालिका, नगररचनातील अधिका-यांशी हातमिळवणी
औरंंंगाबाद : जालना रोड, आकाशवाणी समोरील वक्फ बोर्डाची जमीन भाडेतत्त्वावर घेऊन तिच्यावर बेकायदेशीर बांधकाम करुन विकल्याचा आरोप खासदार इम्तियाज जलील यांनी शनिवारी (दि.३०) पत्रकार परिषदेत केला आहे. कैलास एजन्सीला दिलेली जमीन त्यांनी दुस-यांच्या नावावर परस्पर केल्याने त्याची साखळी पुढे वाढत गेली. त्यामुळे हा सर्व घोटाळा शंभर कोटींच्या घरात असल्याचा आरोपही खासदार जलील यांनी केला आहे.
आकाशवाणीसमोरील जालना रोडलगत सर्व्हे क्र. ३३ मध्ये २० एकर नऊ गुंठे अशी जमीन वक्फ बोर्डाच्या मालकीची आहे. वक्फ संस्थेचे मुतवल्ली व सज्जादनशील म्हणून सय्यद शहा अमिनोद्दीन मगरबी व सय्यद शहा अजीजोद्दीन हे होते. त्यांनी सन १९६४ मध्ये परस्पर विल्हेवाट लावण्याच्या उद्देशाने जमिनीतील एक लाख चौरस फुट जागा बेकायदेशीररित्या तत्कालीन कैलास मोटर्स आणि सध्याची कैलास एजन्सीचे मालक कैलास प्रकाश बाफना यांना ९९ वर्षाच्या भाडे करारनामनुसार हस्तांतरीत केली. मात्र, ही जमीन वक्फ बोर्डाच्या नियमावलीनुसार दिर्घकालावधीसाठी देता येत नाही. त्यानंतर ही बाब लक्षात आल्यावर १९९५ मध्ये पुन्हा एक भाडेपत्रातील दुरुस्तीपत्र वक्फ संस्थेच्या मुतवल्ली यांनी तत्कालीन वक्फ मंडळाच्या अधिका-यांना हाताशी धरुन तयार केला. हा दस्तावेज १९९६ मध्ये नोंदवला. पुढे कैलास एजन्सीने २०१० मध्ये महापालिकेकडे बांधकामासाठी अर्ज केला. महापालिकेने २०११ मध्ये बांधकामाला मंजूरी दिली. मात्र, त्या संचिकेत वक्फ मंडळाची पुर्वपरवानगी व नाहरकत प्रमाणपत्र देणे गरजेचे असल्याचा शेरा मारलेला असतांना देखील मनपाच्या अधिका-यांशी हातमिळवणी करून वक्फ बोर्डाच्या जमिनीवर टोलेजंग इमारत बांधण्यासाठी बेकायदेशीर परवानगी मिळवून बेकायदेशिररित्या बांधकाम केल्याचा आरोप खा. जलील यांनी केला आहे.
दरम्यान, वक्फ न्यायाधिकरणाच्या आदेशाविरुध्द कैलास एजन्सीने उच्च न्यायालयात धाव घेतली. आता हे प्रकरण न्यायप्रविष्ठ आहे. तसे असताना देखील कैलास एजन्सीच्या संचालकांनी ही जमिन विकण्याचा सपाटा लावल्याचा आरोपही खासदार जलील यांनी केला आहे. यावेळी कैलास एजन्सीने नोंदणी करुन दिलेल्या जमिनीची कागदपत्रे दाखवून खासदार जलील यांनी तापडीया अॅन्ड कासलीवाल व्हेंचर्स, जुगलकिशोर तापडीया, बालाजी पाटील, मकरंद अनासपुरे, सुनील इंगळे, प्रदीप मनकानी, राजू मनकानी, विनोद चोटलानी, राजू तनवाणी, सुनील चोटलानी, रजनी चोटलानी, दीपक जिंदल, मोहम्मद रियाजोद्दीन मोहम्मद मजहरोद्दीन यांच्या नावे बेकायदेशीर दस्तावेज नोंदविण्यात आले असल्याचे खा.इम्तियाज जलील यांनी यावेळी सांगितले.
नसता २६ फेब्रुवारीपासून उपोषण करणार
या घोटाळ्यासंदर्भात राज्याच्या गृहमंत्र्यांकडे तक्रार करण्यात आली आहे. त्यांनी पोलीस आयुक्त डॉ. निखील गुप्ता यांना चौकशीचे आदेश दिले आहेत. पोलिसांनी याप्रकरणी गुन्हा दाखल न केल्यास येत्या २६फेब्रुवारीपासूनविभागीय आयुक्त कार्यालयासमोर एक हजार कार्यकत्र्यांच्यासह आमरण उपोषणाला बसणार असल्याचा इशारा खासदार सय्यद इम्तियाज जलील यांनी यावेळी दिला आहे.