Welcome to   Click to listen highlighted text! Welcome to

RajgruhNewsUpdate : अखेर राजगृहात घुसून फुलझाडांची नासधूस करणारा मुख्य आरोपी अटकेत

Spread the love

भारतरत्न  डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या मुंबईतील  हिंदू कॉलनी , दादर येथील राजगृह निवासस्थानात झालेल्या तोडफोड प्रकरणी मुख्य आरोपीला अटक करण्यात आली आहे. विशाल मोरे उर्फ विठ्ठल काण्या (२०) असे या आरोपीचे नाव असून तो कल्याण येथे राहणारा आहे. या आधी त्याचा साथीदार उमेश जाधव याला अटक करण्यात आली आहे.

दादर येथील ‘राजगृह’ या निवासस्थानावर झालेल्या हल्ल्याप्रकरणी माटुंगा पोलिसांनी आधी उमेश सीताराम जाधव (३५) या आरोपीला अटक केली होती. तो दगडफेक करणाऱ्या मुख्य आरोपीला मदत करत होता. सीसीटीव्ही फुटेजच्या आधारे ही कारवाई करण्यात आली होती. त्यानंतर आता मुख्य आरोपीला बेड्या ठोकण्यात आल्या आहेत.

दरम्यान, ८ जुलै रोजी हिंदू कॉलनीमधील राजगृहाबाहेरच्या फुलझाडांची, कुंड्यांची नासधूस करण्यात आली होती. यावेळी करण्यात आलेल्या दगडफेकीत राजगृहाच्या काचांचे नुकसान झाले होते. तसेच सीसीटीव्ही कॅमेरे फोडून दगडफेक करून हल्लेखोरांनी पळ काढला होता. याबाबतची माहिती मिळताच माटुंगा पोलिसांसह मुंबई पोलीस दलातील वरिष्ठ अधिकारी घटनास्थळी पोहचले होते. या घटनेची गंभीर दखल घेत राजगृहजवळ कडक पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला आहे. दरम्यान हि घटना घडताच  वंचित बहुजन आघाडीचे प्रमुख अॅड. प्रकाश आंबेडकर यांनी त्यानंतर लगेचच व्हिडिओच्या माध्यमातून सर्वांना शांतता राखण्याचे आवाहन केले होते. पोलिसांच्या तपासावरही त्यांनी समाधान व्यक्त केले होते.

या प्रकरणी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यासह सर्वांनीच आपल्या  तीव्र भावना व्यक्त करून त्यातूनच ‘राजगृह’ वास्तूला यापुढे २४ तास पोलीस सुरक्षा देण्याचा निर्णय राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत घेण्यात आला होता . ‘राजगृह’च्या सुरक्षेचा प्रश्न गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड यांनी मंत्रीमंडळ बैठकीत उपस्थित केला होता. त्यानंतर सुरक्षेबाबत एकमुखाने निर्णय घेण्यात आला.

आपलं सरकार

Click to listen highlighted text!