Welcome to   Click to listen highlighted text! Welcome to

ज्येष्ठ पत्रकार अनंत दीक्षित यांचे निधन

Spread the love

महाराष्ट्रातील जेष्ठ पत्रकार , व्यासंगी आणि प्रभावी वक्ते, माजी संपादक अनंत दीक्षित यांचं आज पुण्यात दीर्घ आजारानं निधन झालं. ते ६७ वर्षाचे होते. त्यांच्या मागे पत्नी आणि विवाहित मुलगी असा परिवार आहे. अनंत दीक्षित हे गेल्या दोन वर्षांपासून किडनी विकाराने त्रस्त होते. गेल्या काही महिन्यांपासून त्यांना हृदयविकाराचाही त्रास जाणवत होता. गेल्या दोन महिन्यांपासून तर त्यांची प्रकृती आणखीनच खालावली होती. प्रकृती अस्वस्थामुळे त्यांना आज पुण्याच्या रत्ना हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले होते. उपचार सुरू असतानाच आज सायंकाळी त्यांची प्राणज्योत मालवली. दीक्षित यांच्या पार्थिवावर बुधवारी ११ मार्च रोजी सकाळी ९ वाजता पुण्यातील वैकुंठ स्मशानभूमीत अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत. त्यांची कन्या अमृता स्कॉटलंडमध्ये असते. ती मंगळवारी संध्याकाळपर्यंत पुण्यात परतेल. त्यानंतर बुधवारी सकाळी अंत्यसंस्कार होतील, असे त्यांच्या कुटुंबियांनी सांगितले.

दीक्षित हे मूळचे सोलापूरच्या बार्शीचे होते. केसरीतून त्यांच्या पत्रकारितेची सुरुवात झाली. त्यानंतर त्यांनी कोल्हापूर ‘सकाळ’मध्ये काम पाहिले. कोल्हापूर ‘सकाळ’मध्ये ते उपसंपादक ते वृत्तसंपादक म्हणून १९८२ ते २००० सालापर्यंत कार्यरत होते. त्यानंतर २०००साली पुणे ‘सकाळ’च्या संपादकपदी ते रुजू झाले. पुणे ‘सकाळ’मध्ये त्यांनी चार वर्षे संपादक म्हणून काम पाहिलं. त्यानंतर पुणे ‘लोकमत’मध्ये ते संपादक म्हणून रुजू झाले. ‘लोकमत’मधून निवृत्त झाल्यावरही ते पत्रकार म्हणून क्रियाशील होते. वृत्तवाहिन्यांवर राजकीय विश्लेषक म्हणून त्यांनी ठसा उमटविला होता. पुरोगामी विचारधारा मानणाऱ्या दीक्षित यांची सडेतोड राजकीय विश्लेषक म्हणून ख्याती होती. अचूक आणि निष्पक्ष मांडणी हे त्यांचं वैशिष्ट्ये होतं. त्यांच्या निधनामुळे पत्रकारिता क्षेत्राची अपरिमित हानी झाली असून एका अभ्यासू संपादकाला महाराष्ट्र मुकल्याची भावना व्यक्त होत आहे.

दीक्षित यांच्या निधनावर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनीही शोक व्यक्त केला आहे. महाराष्ट्राच्या पुरोगामित्वाची बूज राखणारा, सडेतोड आणि वृत्तपत्रीय क्षेत्रात संपादकीय जाणीवा जिवंत ठेवणारा सच्चा पत्रकार, संपादक म्हणून अनंत दीक्षित स्मरणात राहतील, अशा शब्दांत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी दिवंगत दीक्षित यांना श्रद्धांजली वाहिली आहे.

आपलं सरकार

Click to listen highlighted text!