विधानसभा निवडणुकीत गोपीचंद पडळकर लढणार अजित पवारांच्या विरोधात

मुंबईतील गरवारे क्लबमध्ये मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि भाजपाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांच्या उपस्थितीत पक्षप्रवेश सोहळा पार पडला. या सोहळ्यात गोपीचंद पडळकर यांनी भारतीय जनता पक्षात प्रवेश केला. दरम्यान पडळकर यांनी बारामतून लढावे, याबाबत लवकर पक्षश्रेष्ठींशी बोलून निर्णय जाहीर करू, असे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी जाहीर केले आहे. यामुळे भारतीय जनता पक्षाचे उमेदवार म्हणून गोपीचंद पडळकर हे बारामती विधानसभा मतदारसंघातून राष्ट्रवादीचे अजित पवार यांच्या विरोधात लढणार असल्याचे जवळजवळ स्पष्ट झाले.
गोपीचंद पडळकर यांनी काही महिन्यांपूर्वी भारतीय जनता पक्षाला सोडचिठ्ठी देत वंचित बहुजन आघाडीत प्रवेश केला होता. मात्र, आज त्यांनी भाजपात प्रवेश केला. ‘गोपीचंद पडळकर हा ढाण्या वाघ आहे, ढाण्या वाघाने जंगलाच्या राजासारखं असावं, म्हणून माझं असं म्हणणं आहे की गोपिचंद पडळकर यांनी बारामतीमधून निवडणूक लढवावी, असे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सूचित केले आणि उपस्थितांनी मुख्यमंत्र्यांच्या सूचनेला दुजोरा दिला.
पडळकर वंचितमध्ये गेल्याचे दु:ख झाले होते. पडळकर हे पुन्हा घरात परत आले आहे. त्यांनी धनगर समाजाचे व्रत स्वीकारले, तसेच समाजाला संघटित केले आणि समाजाचा आवाज बुलंद केला, अशा शब्दात मुख्यमंत्र्यांनी त्यांचा गौरव केला. पडळकर हे माझे जवळचे मित्र आहेत असे सांगत आदिवासी समाजाच्या सर्व योजना धनगर समाजाला लागू करू आश्वासन दिल्यानंतर त्यासाठी १००० कोटी रुपयांची तरतूद केल्याची माहिती मुख्यमंत्र्यांनी यावेळी दिली. आरक्षणाचा प्रश्न कोर्टात गेल्याशिवाय सुटू शकत नाही, असेही ते म्हणाले. या पक्षप्रवेश सोहळ्यात काँग्रेसचे आमदार काशिराम पावरा आणि शिरपूर काग्रेसचे अध्यक्ष प्रभाकर चव्हाण यांनीही भाजपात प्रवेश केला आहे.