बापू भारतात पोस्टर पुरते उरले आहेत , ‘मोदी भारताचे राष्ट्रपिता’वर तुषार गांधींची प्रतिक्रिया

अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींना ‘फादर ऑफ नेशन’ असा उल्लेख करण्यावरुन भारतात उलट सुलट प्रतिक्रिया व्यक्त केल्या जात असून या वक्तव्याबद्दल महात्मा गांधी यांचे पणतू तुषार गांधी यांनी नाराजी व्यक्त केली आहे. डोनाल्ड ट्रम्प उद्या जॉर्ज वॉशिंग्टन यांची जागा घेतील असा टोलाही यावेळी त्यांनी लगावला. महात्मा गांधी यांची १५० वी जयंती साजरी करण्याच्या सरकारच्या योजनेवरही तुषार गांधी यांनी टीका करत हे फक्त प्रतीकात्मक असल्याचं म्हटलं आहे.
पंतप्रधान नरेंद्र मोदी गेल्या आठवड्यात अमेरिका दौऱ्यावर होते. यावेळी डोनाल्ड ट्रम्प यांनी मोदींचं कौतुक करताना म्हटलं होतं की, “मोदींनी एका वडिलांप्रमाणे भारताला एकत्र आणलं आहे. ते कदाचित फादर ऑफ इंडिया आहेत”.
डोनाल्ड ट्रम्प यांच्या या वक्तव्यावर बोलताना तुषार गांधी यांनी म्हटलं होतं की, “ज्यांना फादऱ ऑफ नेशन बदलले पाहिजेत असं वाटत आहे त्यांचं स्वागत आहे. ट्रम्प यांनाही कदाचित जॉर्ज वॉशिंग्टन यांची जागा घ्यायची असेल”. यावेळी तुषार गांधी यांनी महात्मा गांधींचा मारेकरी नथुराम गोडसे याचा गौरव करणाऱ्यांवर टीका करताना वेळच योग्य तो निर्णय देईल असं म्हटलं आहे.
“जे हिंसा आणि द्वेषाची पुजा करतात ते गोडसेचं कौतुक करु शकतात. माझा त्यांच्यावर कोणताही रोष असणार नाही. ज्याप्रमाणे बापूंची पूजा मी करतो, त्याप्रमाणे त्यांनाही हक्क आहे,” असं तुषार गांधी यांनी म्हटलं आहे. महात्मा गांधी यांची १५० वी जयंती साजरी करण्याच्या सरकारच्या योजनेवर टीका करताना, महात्मा गांधी संस्थेचे ट्रस्टी कोण हाताळत आहेत अशी विचारणा करत हे सगळं प्रतीकात्मक असल्याचं त्यांनी सांगितलं.
“बापूंचे विचार आणि विचारसरणी नेहमीच्या आयुष्यात तसंच प्रशासकीय कामात अवलंबली पाहिजे. पण दुर्दैवाने तसं होताना दिसत नाही,” अशी खंत यावेळी त्यांनी व्यक्त केली. “बापू सध्या फक्त एक प्रतीक म्हणून ज्याप्रमाणे नोटा आणि स्वच्छ भारत अभियानाचे पोस्टर्स यापुरते मर्यादित राहिले आहेत,” असं तुषार गांधी यांनी म्हटलं आहे.