New Book : वाचावे असे काही : महाराजा सयाजीराव आणि पुणे शहराचे प्रेम, लेखक आणि संपादक : बाबा भांड

महाराजा सयाजीराव गायकवाड हे प्रज्ञावंत राजे असल्यामुळे ज्ञानात्मक प्रबोधनातून सामाजिक परिवर्तनावर त्यांचा भर होता.असे परिवर्तन करू पाहणार्या प्रत्येक समाजधुरिणांना त्यांचे पाठबळ होते.
महाराष्ट्राबाहेर बडोद्यात एक मराठी राजा समाजपरिवर्तनाचे काम करतो आहे याकडे सांस्कृतिक राजधानी असलेल्या पुण्यातील मंडळीचे लक्ष होते. सयाजीरावांच्या राज्याभिषेकापासून पुणेआणि महाराजांचे ऋणानुबंध होते. न्या. म. गो. रानडे, महात्माजोतिराव फुले, लोकमान्य टिळक, महर्षी वि. रा. शिंदे, महर्षी धों.के. कर्वे, गंगाराम म्हस्के, बावुराव जगताप या मंडळींना आणि डेक्कन मराठा एज्युकेशन असोसीएशन, डेक्कन एज्युकेशन सोसायटी, फर्ग्युसन महाविद्यालय, श्री शिवाजी शिक्षण संस्था, भांडारकर प्राच्य विद्या संस्था, भारत इतिहास संशोधन मंडळ अशा अनेक संस्था आणि व्यक्तींना महाराजांचा राजाश्रय होता.
महाराजांना शिक्षण आणि समाजपरिवर्तना विषयी आवड असल्याने पुण्यात या अंगाने घडणार्या प्रत्येक घटना-प्रसंगा कडे त्यांचे लक्ष होते. पुण्यातील या जाणकार मंडळींनाही महाराजांबद्दल आदर होता. महाराजांना या व्यक्तींबद्दल आणि संस्थांबद्दल विशेष आस्था होती. त्यामुळे त्यांना ते तन मन धनाने मदत करत होते. महाराजांचे पुणे शहराबद्दलचे प्रेम आणि ऋणानुबंध ‘महाराजा सयाजीराव आणि पुणे शहराचे प्रेम’ या ग्रंथातून समोर येत आहे. हा ग्रंथ सयाजीराव ट्रस्टने प्रकाशित केला असून ग्रंथाचे संपादक आहेत बाबा भांड. मुखपृष्ठ आहे विष्णू थोरे यांचे.