म्हातारा न मी इतुका , वय वर्षे अवघे ७० !! निवेदन असे दिले कि , पाहून जिल्हाधिकारीही हैराण झाले !!

शासकीय जनता दरबारात लोक काय काय गाऱ्हाणे घेऊन येतात त्याचा हा एक नमुना आहे आणि हा प्रकार आहे तामिळनाडूच्या रामनाथपुरम जिल्ह्यातला. एका ७० वर्षाच्या वृद्धाने आपल्याला २४ वर्षांच्या पी. व्ही. सिंधूशी लग्न करायचं आहे, अशी मागणी केली आहे. विशेष म्हणजे, जर आपल्याला तिच्याशी लग्न करू दिलं नाही, तर मी तिचं अपहरण करेन, अशी धमकीच या वृद्ध गृहस्थाने दिली आहे. मलायसामी असे या हौशी नवरदेवाची नाव आहे ! शिवाय, आमच्या लग्नासाठी सरकारनंच तयारी करून द्यावी, असं देखील या महाशयांनी जिल्हाधिकाऱ्यांना दिलेल्या निवेदनात म्हटले आहे. या प्रकारामुळे रामनाथपुरमचे जिल्हाधिकारी देखील काही काळ नि:शब्द झाले!
प्रथेप्रमाणे लोकांच्या समस्या सोडविण्यासाठी जिल्हाधिकारी प्रत्येक आठवड्याला जनता दरबार भरवतात . यामध्ये सामान्य नागरिक आपल्या तक्रारी जिल्हाधिकाऱ्यांकडे मांडतात. त्यावर जिल्हाधिकारी शक्य असल्यास लगेच किंवा लेखी आश्वासनासह अधिकाऱ्यांना निर्देश देऊन तातडीने ते प्रकरण मार्गी लावतात. तामिळनाडूच्या रामनाथपुरम जिल्ह्यात भरलेल्या अशाच एका आठवडी दरबारात ७० वर्षांचे मलायसामी आले होते. इतरांप्रमाणेच मलायसामी यांची देखील अशीच एखादी समस्याविषयक तक्रार असेल, असं समजून जिल्हाधिकाऱ्यांनी त्यांना विचारणा केली. पण निवेदनात जे होते आणि त्यांनी प्रत्यक्षात त्यांनी जे ऐकले ते खरॊखरच धक्का देणारे होते.
मलायसामींनी त्यांच्यासोबत आणलेल्या अर्जावर पी. व्ही. सिंधूचा फोटो लावला होता आणि या अर्जामध्ये मलायसामी यांनी पी. व्ही. सिंधूशी लग्न करण्याची इच्छा व्यक्त केली होती. नुसती इच्छाच नाही तर त्यासोबत त्यांनी प्रशासनालाच इशारा देखील दिला होता. ‘मला बॅडमिंटनपटू पी. व्ही. सिंधू हिच्याशी लग्न करायचं आहे. त्यासाठीची तयारी प्रशासनाने करावी. पण जर हे झालं नाही, तर मी सिंधूचं अपहरण करेन’, असा इशाराच मलायसामींनी दिला आहे. या प्रकारामुळे गडबडलेल्या अधिकाऱ्यांनी या हौशी नवरदेवाला कसंतरी समजावून त्यांची पाठवणी केली.