Welcome to   Click to listen highlighted text! Welcome to

विकासाकडे दुर्लक्ष करून राजकीय फायद्यासाठी हिंदू -मुस्लिम तणावाचे राजकारण करणारांपासून सावध राहा : खा. इम्तियाज जलील

Spread the love

‘राजकीय फायद्यासाठी हिंदू-मुस्लिम तणाव वाढवून औरंगाबादची प्रतिमा दंगलीचे शहर अशी करण्यात आली. रस्ते, पाणी, उद्योग, पर्यटन, शिक्षण या सुविधांकडे दुर्लक्ष करून राजकारण खेळले गेले. या शहराला आदर्श शहर करण्यासाठी जनतेने स्वत:च्या अधिकारांची जाणीव ठेवावी. लोकप्रतिनिधींना प्रतिप्रश्न विचारण्याचा हक्क आपण विसरल्याने शहर बकाल झाले’, ‘निवडून आल्यानंतर मला सरळ करण्याची भाषा एका आमदाराने केली. पण, मला सरळ करण्याऐवजी स्पाइस जेटच्या कार्यालयात जाऊन त्यांना सरळ करण्याची गरज होती. ते काम मी केल्याने ऑगस्टमध्ये स्पाइस जेट विमानसेवा सुरू होणार आहे असे प्रतिपादन खासदार इम्तियाज जलील यांनी केले.

प्रा. अविनाश डोळस सामाजिक प्रतिष्ठानच्या वतीने ‘औरंगाबाद जिल्ह्याचा विकास – संधी आणि समस्या’ या विषयावर खासदार इम्तियाज जलील यांचे डॉ. बाबासाहेब आंबेडकर कला व वाणिज्य महाविद्यालयात रविवारी व्याख्यान झाले. या व्याख्यानात  ते बोलत होते.  ज्येष्ठ पत्रकार संजय आवटे, सामाजिक कार्यकर्ते प्रा. विजय दिवाण, डॉ. वाल्मिक सरवदे आणि डॉ. संजय मून यांची यांची यावेळी प्रमुख उपस्थिती होती.

औरंगाबाद जिल्ह्याच्या स्थितीवर बोलताना खा. जलील म्हणाले कि , ‘पाण्याचे खासगीकरण करणारे हे एकमेव शहर होते. काही नेत्यांच्या आर्थिक फायद्यासाठी समांतर योजना लादली होती. शहराबद्दल आत्मियता असलेल्या नागरिकांनी योजना बंद पाडली. मला मुख्यमंत्र्यांपर्यंत पाठपुरावा करावा लागला. त्यामुळे जनतेने ठेकेदार, पालिका अधिकारी आणि लोकप्रतिनिधींचे संगनमत ओळखणे गरजेचे आहे. शहराच्या प्रश्नांवर आपण प्रतिप्रश्न करीत नसल्याने शहर बकाल झाले. आता महाराष्ट्र जीवन प्राधिकरण पाणीपुरवठा करण्याची चर्चा सुरू झाली आहे. शहराची प्रतिमा सुधारण्याची हीच योग्य वेळ आहे. नागरिकांनी पाच वर्षे मला विकासकामांसाठी वारंवार विचारणा करावी. तरच आपण धार्मिक संवेदनशील शहर अशी ओळख पुसून आदर्श शहर निर्माण करू’, असे जलील म्हणाले.

बारापुल्ला दरवाजाच्या संवर्धनासाठी सहा कोटी रुपये मंजूर झाले. एका वर्षात फक्त स्वत:च्या फोटोसेशनवर महापौरांनी २० लाख रुपये खर्च केले. ही माहिती बाहेर निघताच महापालिकेच्या जनसंपर्क अधिकाऱ्याने सारवासारव करीत फोटोसाठी फक्त दीड लाख रुपये खर्च केल्याचे सांगितले. आता प्रश्न पडतो की, माहिती देणारा लेखा विभाग खोटा की जनसंपर्क अधिकारी खोटा ? डिजिटल युगात २० लाख खर्च करून काढलेले फोटो जनतेसाठी खुले करा’, असे आव्हान जलील यांनी दिले. तसेच फोटोग्राफीचा प्रताप चव्हाट्यावर आणणार असल्याचे सांगितले. डॉ. उत्तम अंभोरे यांनी सूत्रसंचालन केले. यावेळी नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

आपलं सरकार

Click to listen highlighted text!