Welcome to   Click to listen highlighted text! Welcome to

देशातील ३७० लोकसभा मतदारसंघात ईव्हीएममुळे घोळ, जर मॅचच फिक्स असेल तर सामने खेळून काय फायदा? : राज ठाकरे

Spread the love

गेल्या ३० वर्षांपासून ईव्हीएम मशीनवर शंका उपस्थित केली जात आहे. ईव्हीएमवर लोकांचा विश्वास राहिला नसल्याने बॅलेटपेपरद्वारेच मतदान झालं पाहिजे, अशी मागणी निवडणूक आयोगाकडे करण्यात आल्याचं सांगतानाच नुकत्याच झालेल्या लोकसभा निवडणुकीत ३७० लोकसभा मतदारसंघात घोळ असल्याचा दावा मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी केला. प्रसारमाध्यमांशी बोलताना राज यांनी हा दावा केला. तसंच ईव्हीएमचं काय करायचं हे महाराष्ट्रात गेल्यावरच ठरवू, असा इशाराही त्यांनी दिला.

मुख्य निवडणूक आयुक्तांची भेट घेतल्यानंतर राज ठाकरे यांनी प्रसारमाध्यमांशी संवाद साधताना निवडणूक आयोगासह भाजपवरही टीका केली. ज्या देशात दोन महिने निवडणुका चालतात, तिथे दोन दिवस मतमोजणी झाली तर बिघडले कुठे? असा सवाल राज यांनी केला. गेल्या ३० वर्षांपासून ईव्हीएमवर लोक संशय घेत आहेत. त्यामुळे बॅलेट पेपरवर निवडणुका घेतल्यास त्यात स्पष्टता येईल आणि लोकांचा विश्वासही बसेल, असं सांगतानाच ३७० लोकसभा मतदारसंघात ईव्हीएममुळे घोळ झालाय. या मतदारसंघात जास्तीचं मतदान मोजलं गेलंय. याकडेही निवडणूक आयोगाचं लक्ष वेधल्याचं ते म्हणाले.

निवडणूक आयोगाला ईव्हीएम संदर्भातील सर्व मुद्दे पटवून दिले आहेत. पण त्यांच्याकडून आम्हाला शून्य अपेक्षा आहेत. तुम्ही निवडणूक आयोगाकडे तक्रार का केली नाही? असा सवाल माध्यमांनी करू नये म्हणून ही औपचारिक भेट घेतली आहे, असं ते म्हणाले. ईव्हीएमची चीप अमेरिकेतून येते. ईव्हीएम मशीन हॅक होण्याची शक्यता आहे, असं असतानाही निवडणूक आयोग बॅलेट पेपरवर मतदान घ्यायला तयार नाही. जर मॅचच फिक्स असेल तर सामने खेळून काय फायदा? असा सवाल त्यांनी केला.

२०१४ पूर्वी भाजपने ईव्हीएम मशीन विरोधात रान उठवलं होतं. त्यासाठी कोर्टातही गेले होते. मात्र सत्तेत आल्यानंतर भाजप गप्प का? असा प्रश्नही त्यांनी केला. २००५ नंतर तब्बल १४ वर्षाने राज ठाकरे दिल्लीत आले होते. यावेळी त्यांनी दिल्ली भेटीच्या आठवणीही जागवल्या. मी आलो तेव्हा दिल्ली वेगळी होती. आता दिल्ली खूपच बदललीय. मला दिल्ली ओळखता आली नाही, असा चिमटाही त्यांनी काढला. दरम्यान, राहुल गांधी यांच्या राजीनाम्यापाठोपाठ काँग्रेसमध्ये सुरू असलेल्या राजीनामानाट्यावर बोलण्यास त्यांनी नकार दिला.

आपलं सरकार

Click to listen highlighted text!