ऊसतोड कामगारांचा जीवनसंघर्ष मांडणारा लघुपट “मुक्ता” लवकरच प्रदर्शित

डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठातील जनसंवाद व वृत्तपत्रविद्या विभागातील बी.ए तृतीय वर्षातील विद्यार्थ्यांनी निर्माण केलेला ‘मुक्ता’ लघुपट लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे. ऊसतोड कामगारांचा जीवनसंघर्ष, रोजंदारीमुळे सततचे होणारे स्थलांतर आणि यातून मुलांच्या शिक्षणावर पडणारा विपरीत परिणाम अशा अनेक दुर्लक्षित पैलूंवर ‘मुक्ता’ या लघुपटाच्या माध्यमातून प्रकाश टाकण्यात आला आहे.
ऊसतोड कामगारांचे नित्याचे स्थलांतर आणि साहजिकच यातून मुलांच्या शिक्षणात येणारी अनियमितता या सर्वांचा परिपाक निरक्षरतेमध्ये होतो. परिणामी ऊसतोड कामगारांच्या कुटुंबात पिढीजात शिक्षणाविषयीचा नकारात्मक दृष्टिकोन निर्माण होतो. 21 व्या शतकातील हा मागासलेला दृष्टिकोन समाजातील विक्षिप्त वस्तुस्थिती स्पष्ट करतो. ‘सर्व शिक्षा अभियान/मोहीम’ यांसारखे शासकीय निर्णय समाजातील या गटापर्यंत कसे पोहोचत नाहीत, हा मुद्दा मांडताना लघुपटात सरकारच्या निर्णय अंमलक्षमतेवर प्रश्न उपस्थित करण्यात आला आहे.
सदर लघुपटामध्ये ‘मुक्ता’ नावाची ऊसतोड कामगाराची मुलगी आर्थिक विवंचनेतही शिक्षणाची आकांशा उराशी बाळगून शिक्षण पूर्ण करते. ऊसतोड कामगारांच्या समुदायामध्ये एक प्रेरणास्थान बनून त्यांना साक्षर बनविण्याचा यशस्वी प्रयत्न करते.
समाजातील रूढी, परंपरा, अंधश्रद्धा, बिकट परिस्थिती यावर जिद्दीने मात करून समाजपरिवर्तन घडविता येते. सोबतच निरक्षरतेविरुद्ध बंड पुकारून एक महिलाचं समाजाला योग्य दिशा व दशा देऊन विकसित समाजाची पायाभरणी करू शकते. हा संदेश लघुपटातून देण्यात आला आहे. सदर लघुपटाचे चित्रीकरण लोहगाव, पैठण, औरंगाबाद याठिकाणी करण्यात आले आहे.
लघुपटाची कथा, पटकथा आणि दिग्दर्शन मिलिंद ताजने यांनी केले आहे. चित्रिकरण लक्ष्मीकांत जाधव आणि आकाश कांबळे यांनी केले आहे. लघुपटाचे संवादलेखन गणेश फरताडे यांनी केले आहे. याचबरोबर पूजा सोनवणे, जनक जोशी, रत्नदीप वाहूळे, प्रियांका एंगडे यांनी प्रमुख भूमिका साकारल्या आहेत. तर सहायक भूमिकेत संदेश जाधव, कोमल पोळ, मिलिंद ताजने, लक्ष्मीकांत जाधव, कुणाल जाधव, योगिता बनसोडे यांचा समावेश आहे. गायन सुनील लाटे यांनी केले आहे.
लघुपटनिर्मितीसाठी प्रा. गरड सर (मुख्याध्यापक, जि.प प्रशाला लोहगाव), नितीन बोरुडे, किरण प्रकाश वाघ (स्थानिक पोलीस) यांचे विशेष सहकार्य लाभले आहे.