कु. अनुष्का पाटोळे खून प्रकरणी लातूर जिल्हाधिकारी यांना सह आरोपी करावे-आक्रोश मोर्चात मागणी
लातूर (अरुण जे कांबळे): लातूर शहरातील नवोदय विद्यालयातील विद्यार्थिनी कु. अनुष्का पाटोळे हिच्या अमानुष हत्येप्रकरणी सुरू असलेल्या तपासाबाबत प्रशासकीय पातळीवर तसेच नियुक्त एसआयटी प्रमुख तपास अधिकाऱ्यांच्या कामकाजावर संशय व्यक्त केला जात आहे. या प्रकरणात निष्पक्ष चौकशी व न्याय मिळावा, या मागणीसाठी समाजाच्या वतीने आज लातूर शहरात भव्य आक्रोश मोर्चा काढण्यात आला.
या मोर्चामध्ये काही वक्त्यांनी आरोपींना पाठीशी घालण्याचे काम लातूर जिल्हाधिकारी वर्षा ठाकूर घुगे करत असल्याचा आरोप केला. त्यामुळे त्यांना सहआरोपी करण्यात यावे, अशी एकमुखी मागणी आंदोलनकर्त्यांकडून करण्यात आली.
याबाबत मिळालेल्या माहितीनुसार, लातूर जिल्ह्यातील नवोदय विद्यालयात शिकणारी मुलगी कु. अनुष्का किरण पाटोळे हिचा खून करण्यात आला परंतु शाळेच्या प्रशासनाने तिने आत्महत्या केली असा आरोप केला आहे. मुलीने कॉटवर फाशी घेतली असा खोटा आरोप केला. वास्तविक पाहता मुलीच्या अंगावर जखमा दिसून आल्या हाताचे फ्रॅक्चर प्रखर शहाणे दिसून आले. त्यांनी पुरावा नष्ट करण्याचा प्रयत्न केला व त्यास या शाळेचे अध्यक्ष म्हणजेच जिल्हाधिकारी यांनी आरोपीस पाठीशी घातले आहे, असा आरोप मुलीचे आई-वडील व समाज बांधवांनी केला.
या घटनेचा निषेध व्यक्त करण्यासाठी आज लातूर शहरांमध्ये आक्रोश मोर्चाचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी माजी न्यायाधीशांच्या अध्यक्षतेखाली निष्पक्ष चौकशी समिती स्थापन करावी, सदरील प्रकरण फास्ट ट्रॅक कोर्टामध्ये चालवून तात्काळ न्याय प्रस्थापित करावा, नवोदय विद्यालयाचे अध्यक्ष यांच्या मोबाईलचे सीडीआर तपासावे तथा सर्व आरोपींचे तत्कालीन लोकेशन काळजीपूर्वक तपासावे, नवोदय विद्यालयाचे अध्यक्ष व प्रमुख पदाधिकारी यांना सह आरोपी करण्यात यावे, आरोपींची नार्को टेस्ट करण्यात यावी, एसआयटीचे प्रमुख तपास अधिकारी यांच्या तपासाबाबत शंका आहे त्यामुळे तात्काळ अधिकारी बदलून मिळावा, खून झालेल्या मुलीच्या आई-वडिलांचा पुरवणी जबाब घेऊन तपास अहवालात आरोपींची संख्या नावे निश्चित करावे. एफआयआरमध्ये आवश्यक बदल करावे तथा सोबत जोडलेल्या पुरवणी निवेदनाची गांभीर्याने दखल घ्यावी, अनुसूचित जाती जमाती अत्याचार प्रतिबंधक कायद्याची काटेकोरपणे अंमलबजावणी करावी. सदर प्रकरणातील सर्व आरोपींना फाशीची शिक्षा देण्यात यावी. या मागण्यांचे निवेदन राज्याचे गृहमंत्री, सामाजिक न्याय मंत्री, मानवी हक्क आयोग, पोलीस महासंचालक, महिला हक्क आयोग, विभागीय आयुक्त संभाजीनगर, जिल्हाधिकारी लातूर, जिल्हा पोलीस अधीक्षक लातूर यांना एका निवेदनाद्वारे दिले आहे.
या आक्रोश मोर्च्यात लातूर जिल्ह्यासह मराठवाडा आणि राज्यातील विविध भागांतून अनेक मान्यवर मोठ्या संख्येने उपस्थित होते. या आंदोलनाच्या नियोजन व समन्वयात जी. ए. गायकवाड, सुरेश चव्हाण, सुनील सौदागर, सचिन कांबळे, पिराजी साठे, रवी अर्जुने, राजेंद्र लोगेकर, किरण पाटोळे, कीर्ती ताई पाटोळे, गोरोबा लोखंडे, आनंदभाई वैरागे, राज क्षीरसागर, आश्विन कांबळे, अमोल चव्हाण, अशोक मगर, प्रसाद भोसले, प्रवीण मगर, राहुल शिरसागर, मोहन सुरवसे, कैलास कांबळे, विष्णू कांबळे, नूतन हनुमंत, रवी कदम, श्याम भाऊ चव्हाण, अमोल गायकवाड, पंकज शिंदे, आदिनाथ मगर, करण कांबळे, किशोर शिंदे, राजेंद्र लोंढे, विक्रांत शंके व अशितोष कांबळे आदी प्रमुखांनी सहकार्य केले.
