AurangabadNewsUpdate : विद्यापीठ प्रवेश द्वारासमोरील आंबेडकर पुतळ्याजवळील फलकाची मोडतोड करणारा मद्यपी पोलिसांच्या ताब्यात…

छत्रपती संभाजीनगर: येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ गेट समोरील डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या पूर्णाकृती पुतळ्याजवळ लावण्यात आलेल्या डिजिटल बोर्डाची मोडतोड करणारा एक तरुण दिसताच त्याला तेथे उपस्थित असणाऱ्या तरुणांनी तत्काळ ताब्यात घेऊन बेगमपुरा पोलिसांच्या हवाली केले. हा तरुण मद्यपी असून त्याचे मानिसक संतुलन ठीक नसल्याचे त्याच्या कुटुंबीयांनी सांगितले. विद्यापीठ परिसरात पूर्णतः शांतता असून वाहतूक सुरळीत सुरु आहे. हा तरुण याच भागातील राहणार असून पोलीस उपयुक्त नितीन बगाटे आणि बेगमपुरा पोलिसांनी घटनेची माहिती मिळताच घटनास्थळी धाव घेतली.
दरम्यान नुकसान केलेल्या अक्षरांची दुरुस्ती करण्यात येत आहे .आता परिस्थिती नियंत्रणात असून कोणीही अफवेस बळी पडू नये, सर्वांनी शांतता बाळगावी असे, आवाहन पोलिस उपायुक्त नितीन बगाटे आणि आंबेडकरवादी तरुण कार्यकर्त्यांनी केले आहे.
सायंकाळी ५ ते साडेपाच वाजण्याच्या सुमारास हा प्रकार घडल्याची माहिती आंबेडकरवादी बहुजन विकास समितीचे अध्यक्ष दीपक निकाळजे यांनी दिली. विद्यापीठ गेटसमोर डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पूर्णाकृती पुतळ्याजवळील ‘The Symbol of Knowledge – Dr. B. R. Ambedkar’ या डिजिटल बोर्डला नुकसान करण्याचा प्रयत्न हा तरुण करीत होता. हे लक्षात येताच याठिकाणी उपस्थित असलेल्या तरुणांनी त्याला रोखले आणि पोलिसांच्या ताब्यात दिले. त्याच्या हातात असलेल्या चाकूच्या साहाय्याने तो सिम्बॉल ऑफ नॉलेज च्या अक्षरांची मोडतोड करत होता त्याला रोखण्याचा प्रयत्न करणारांना तो चाकूचा धाक दाखवत असल्याने त्याला रोखणे उपस्थित तरुणांना कठीण झाले होते परंतु दारूच्या नसेल तो खाली पडल्याने त्याला तरुणांनी चोप देऊन बेगमपुरा पोलिसांच्या स्वाधीन केले.
सदर घटनेची माहिती मिळताच बेगमपुरा पोलिसांसह पोलीस उपयुक्त नितीन बगाटे यांनी घटनास्थळाला भेट देऊन शांतात प्रस्थापित केली. सदर कृत्य करणाऱ्या दारुड्या तरुणाचे नाव महेश कांबळे असून त्याची आई पी ई एस संस्थेत नोकरीला आहे. त्याच्यावर मानसिक परिणाम झालेला असून तो नशेच्या आहारी गेला असल्याची माहिती त्याच्या कुटुंबीयांनी दिल्याचे निकाळजे यांनी सांगितले .