Pune AccidentNewsUpdate : आमच्याकडे भक्कम पुरावे , आम्ही आरोपीवर सज्ञान म्हणून खटला चालवण्याची मागणी केली होती… : पोलीस आयुक्त अमितेश कुमार
पुणे : पुण्याच्या कल्याणीनगर परिसरात एका धनिकपुत्राने भरधाव वेगात पोर्शे कार चालवत दोघांना चिरडल्याची घटना समोर आल्यानंतर लोकांमध्ये संतापाची तीव्र लाट उसळली आहे. या प्रकरणात पुणे पोलिसांच्या कारवाईवरही अनेकांनी गंभीर प्रश्न उपस्थित केले होते. पुणे पोलिसांनी आरोपी वेदांत अग्रवाल याच्या रक्ताची तपासणी वेळेत न केल्यामुळे न्यायालयात त्याला फायदा मिळाला, असा आरोप झाला होता. बराच वेळ उलटून गेल्यानंतर वेदांत अग्रवाल याच्या शरीरात मद्याचा अंश आढळणार नाही आणि त्याचा फायदा वेदांतला मिळाला, अशी चर्चा होती. या पार्श्वभूमीवर पुण्याचे पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांनी माध्यमांशी बोलताना महत्त्वाचे स्पष्टीकरण दिले. वेदांत अग्रवाल याचा ब्लड रिपोर्ट अद्याप आला नसला तरी आमच्याकडे त्याच्याविरोधात भक्कम असे तांत्रिक पुरावे आहेत, असा दावा अमितेश कुमार यांनी केला. दरम्यान या प्रकरणातील अल्पवयीन आरोपीला जामिन मिळाला आहे. तर त्याचे वडिल बांधकाम व्यावसायिक विशाल अग्रवाल यांना आज पुणे पोलिसांनी संभाजीनगरमधून अटक केली आहे.
आम्ही वेदांत अग्रवाल याला न्यायालयात सादर केले तेव्हाही त्याने मद्यप्राशन केल्याचे सांगितले. तसेच तो अरुंद रस्त्यावर, विना नंबरप्लेटची गाडी भरधाव वेगाने चालवत होता, या सर्व गोष्टी आम्ही न्यायालयाच्या निदर्शनास आणून दिल्या. पण न्यायालयाने वेदांत अग्रवाल याला जामीन दिला, असेही पुण्याच्या पोलीस आयुक्तांनी स्पष्ट केले.
आम्ही आरोपीवर सज्ञान म्हणून खटला चालवण्याची मागणी केली होती…
या प्रकरणात ज्यावेळी ही घटना आमचे निदर्शनास आली त्याचवेळी या प्रकरणात 304 आयपीसीचे कलम वाढवण्यात आले. 304 आयपीसी म्हणजे यामध्ये गंभीर शिक्षेची तरतूद आहे. यामध्ये सात वर्षांपेक्षा जास्त शिक्षा आहे. त्यामुळे बालन्याय कायद्यातील कलम 2 मध्ये तरतूद आहे की, एखादा गुन्हा नृशंस असल्यास अल्पवयीन गुन्हेगाराविरोधात सज्ञान म्हणून खटला चालवावा. त्या अनुषंगाने आम्ही न्यायालयात दोन अर्ज दिले. एका अर्जात नृशंस कृत्य असल्यान आरोपीवर सज्ञान म्हणून खटला चालवावा,अशी मागणी होती. तर दुसऱ्या अर्जात निर्णय होत नाही तोपर्यंत आरोपींना 14 दिवसांसाठी रिमांड होममध्ये पाठवा, अशी मागणी होती. मात्र, कोर्टाने या दोन्ही मागण्या फेटाळल्या आणि त्यांना जामीन दिला. जामीन देणे हा न्यायालयाचा अधिकार आहे, आमच्या अधिकारात ती गोष्ट येत नाही. पण आरोपीला जामीन मिळाल्यानंतर लोकांमध्ये संतप्त प्रतिक्रिया उमटल्या. आम्हालाही हा जामीन मान्य नव्हता. त्यामुळे आम्ही उच्च न्यायालयात अपील केले, अशी माहिती पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांनी दिली.
मृताच्या नातेवाईकांना धमक्या…
दरम्यान पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांनी पत्रकार परिषद घेत या प्रकरणात आतापर्यंत केलेल्या कारवाईची माहिती दिली. पोलीस आयुक्तांच्या या पत्रकार परिषदेत आणखी एक धक्कादायक आणि तितकीच संतापजनक माहिती दिली. ते म्हणाले की, अपघातातील मृतांचे नातेवाई आणि मित्रांना धमकावल्याचे प्रकार आमच्या कानावर आले आहेत. याप्रकरणी आता आम्ही चौकशी सुरू केली आहे. मात्र, त्यांना धमकावल्याची तक्रार नातोवाईकांनी आतापर्यंत केलेली नाही. मृतांच्या नातेवाईकांशी वाईट वागणूक आणि या प्रकरणातील आरोपींना प्रत्यक्ष किंवा अप्रत्यक्ष मदत करणाऱ्या पोलीस कर्मचारी आणि अधिकाऱ्यांवर कठोर कारवाई केली जाणार आहे.”
अपघातानंतर अल्पवयीन आरोपीला बाल न्याय मंडळासमोर हजर करण्यात आले असता, त्यांनी त्याला जामीन मंजूर केला. प्रादेशिक परिवहन कार्यालयाला भेट देऊन वाहतूक नियमांचा अभ्यास करण्याचे निर्देश त्यांनी आरोपीला दिले. तसेच त्याला रस्ता अपघात आणि त्यांचे उपाय या विषयावर 300 शब्दांचा निबंध लिहिण्यास सांगितले आहे.
कार अपघातात सहभागी असलेल्या 17 वर्षीय अल्पवयीन मुलाच्या वडिलांना मंगळवारी छत्रपती संभाजीनगर येथे अटक करण्यात आली. त्यानंतर आज त्यांना न्यायालयात हजर करण्यात येणार आहे.अल्पवयीन मुलांना दारू दिल्याप्रकरणी दोन बारच्या तीन कर्मचाऱ्यांनाही अटक करण्यात आली आहे. कोसी रेस्टॉरंटचे मालक प्रल्हाद भुतडा व मॅनेजर सचिन काटकर आणि हॉटेल ब्लॅकचे मॅनेजर संदिप सांगळे यांना मंगळवारी अटक करण्यात आली. सोमवारी, एका बारचे सीसीटीव्ही फुटेज सोशल मीडियावर व्हायरल झाले, ज्यात अल्पवयीन मद्यप्राशन करताना दिसत आहे.