महाविकास आघाडी : सांगली , भिवंडी , मुंबई पाठोपाठ शिर्डीतही काँग्रेस कार्यकर्ता बंडखोरीच्या तयारीत…

शिर्डी : महायुतीत सहा जागांवरून जागावाटप थांबलेले असतानाच महाविकास आघाडीतही जागा वाटप होऊनही काही जागांवर टोकाचे मतभेद चालू आहेत. भिवंडी , मुंबई आणि सांगलीत काँग्रेस कार्यकर्ते शिवसेना उद्धव ठाकरे आणि राष्ट्रवादी शरद पवार यांच्यावर नाराज असतानाच , दुसरीकडे शिर्डी मतदार संघातही शिवसेना उद्धव ठाकरे यांना जागा दिल्यामुळे नाराज उत्कर्षा रुपवते यांनी वंचित बहुजन आघाडीची वाट धरण्यासाठी अकोल्याकडे प्रयाण केले असल्याचे सांगण्यात येत आहे.
दरम्यान सांगलीची जागा शिवसेना उद्धव ठाकरे यांनी जागावाटपाच्या आधीच घोषित केल्यामुळे विशाल पाटील यांनी अपक्ष उमेदवारी दाखल केली आहे, तर मुंबईत वर्षा गायकवाड यांनी पक्षाच्या बैठकांनाच दांडी मारण्यास सुरुवात केली आहे. अशातच आणखी एका मतदारसंघात काँग्रेसमुळे ठाकरेंची शिवसेना अडचणीत येण्याची शक्यता निर्माण झाली आहे.
शिर्डी मतदारसंघातील उत्कर्षा रुपवते यांनी आज सायंकाळी काँग्रेसच्या सदस्यत्वाचा आणि पदांचा राजीनामा दिला आहे. शिर्डीची जागा ठाकरेंना सोडल्याने त्या नाराज होत्या. अशातच रुपवते यांनी आज राजीनामा देत अकोल्याची वाट धरली आहे. त्या अकोल्यात पोहोचल्या असून काही वेळातच प्रकाश आंबेडकर यांच्या उपस्थितीत वंचित बहुजन आघाडीत प्रवेश करण्याची शक्यता आहे. दरम्यान उत्कर्षा रुपवते यांना वंचितकडून शिर्डीची उमेदवारी मिळण्याची शक्यता आहे. असे झाल्यास शिर्डीमध्ये शिंदे गटाचे खासदार सदाशिव लोखंडे आणि ठाकरे गटाचे भाऊसाहेब वाकचौरे यांच्यातील दुरंगी लढत तिरंगी होणार आहे. रुपवते यांच्या लढण्याचा फटका ठाकरे गटाला बसण्याची शक्यता आहे.
सुरुवातीपासून काँग्रेसचा बालेकिल्ला असलेला मतदारसंघ २००९ मध्ये शिवसेनेने हिसकावून घेतला होता. परंतु २०१४ मध्ये वाकचौरे यांनी काँग्रेसमध्ये जात शिवसेनेला धक्का दिला होता. २०१४ च्या निवडणुकीत शिवसेनेने वाकचौरेंच्या विरोधात लोखंडे यांना उतरविले होते. लोखंडे यांनी वाकचौरेंचा पराभव केला होता. यानंतर २०१९ मध्येही लोखंडे विजयी झाले होते. आता २०२४ मध्ये लोखंडे शिंदेंच्या शिवसेनेत असून वाकचौरे पुन्हा उमेदवारीसाठी ठाकरेंच्या शिवसेनेत आले आहेत.