Welcome to   Click to listen highlighted text! Welcome to

LoksabhaNewsUpdate : अकोल्यातील काँग्रेस उमेदवाराविषयी नाना पटोले यांनी दिले असे स्पष्टीकरण…

Spread the love

मुंबई : मोदींच्या विरोधातील मतांचे विभाजन होऊ नये अशी काँग्रेस आणि समविचारी पक्षाची भूमिका होती त्यासाठी राष्ट्रीय स्तरावर इंडिया आघाडी आणि राज्यात महाविकास आघाडीची तयार करण्यात आली. या आघाडीत वंचित बहुजन आघाडीचे नेते प्रकाश आंबेडकर यांनी यावे म्हणून महाविकास आघाडीच्या नेत्यांनी प्रयत्न केले परंतु प्रकाश आंबेडकर यांनी स्वतंत्र भूमिका घेतली. आणि आपले उमेदवारही घोषित केले त्यामुळे काँग्रेसच्या वाट्याला आलेल्या जागांवर काँग्रेसने उमेदवार उभे केला , अशी स्पष्टोक्ती काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी केली आहे.

काँग्रेस नेते राहुल गांधींच्या भारत जोडो न्याय यात्रेचा समारोप मुंबईत झाला. यावेळी, मुंबईच्या शिवाजी पार्क मैदानावर मोठी जाहीर सभाही झाली. या सभेला काँग्रेसकडून वंचित बहुजन आघाडीचे प्रमुख प्रकाश आंबेडकर यांनाही काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे यांनी निमंत्रण दिले होते. याच व्यासपीठावरुन प्रकाश आंबेडकरांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींवर आणि भाजपावर हल्लाबोल केला. त्यामुळे, वंचित बहुजन आघाडी नक्कीच महाविकास आघाडीत सहभागी होईल, असे चित्र निर्माण झाले होते मात्र, महाविकास आघाडीतील जागावाटपाचा तिढा सुटत नव्हता. त्यामुळे, एक तर महाविकास आघाडीच्या जागांचा तिढा सुटत नाही आणि वंचित बहुजन आघाडीला महाविकास आघाडीच्या नेत्यांकडून जागा वाटपाच्या चर्चेत सन्मानजनक वागणूक मिळत नाही असे आरोप करीत प्रकाश आंबेडकरांनी एकापाठोपाठ एक वंचित बहुजन आघाडीच्या उमेदवारांच्या दोन याद्या जाहीर केल्या. त्यात प्रकाश आंबेडकर हे अकोल्यातून निवडणुकांच्या मैदानात उतरले आहेत.

प्रकाश आंबेडकरांनी काँग्रेस विरोधात उमेदवार दिले…

दरम्यान प्रकाश आंबेडकर यांनी या याद्या जाहीर केल्यामुळे ते महाविकास आघाडीपासून बाहेर पडले असल्याचा संदेश त्यांनी दिला. त्यात त्यांनी काँग्रेसच्या नागपूर आणि कोल्हापुरातील काँग्रेस उमेदवारांना काँग्रेसने न मागताही पाठिंबा दिल्यामुळे काँग्रेस त्यांच्या अकोल्यातील उमेदवारीला पाठिंबा देईल अशी अटकळ बांधली जात होती परंतु काँग्रेसने या चर्चांकडे दुर्लक्ष करीत काल अकोल्यात आपला उमेदवार दिला आहे. त्यांच्या आधी जाहीर केलेल्या दुसऱ्या यादीत वंचितने मराठवाडा, मुंबई आणि पश्चिम महाराष्ट्रातील काही महत्त्वाच्या मतदारसंघातील उमेदवारांची घोषणा केली आहे. त्यातच, सोलापुरात प्रणिती शिंदेंविरुद्ध उमेदवार देण्यात आला आहे. तर, लातूरमध्येही नरसिंहराव उदगीरकर यांना मैदानात उतरवले आहे. त्यामुळेच, काँग्रेसनेही प्रकाश आंबेडकर यांच्याविरुद्ध उमेदवारी देत जशास तसे उत्तर देण्याचा प्रयत्न केला असल्याचे सांगितले जात आहे.

यासंदर्भात स्वत: काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी भूमिका स्पष्ट केली आहे . त्यांनी पत्रकारांशी बोलताना म्हटले आहे की , ” लोकशाहीवादी मतांचं विभाजन होऊ नये यासाठी आम्ही वंचित बहुजन आघाडीला मविआमध्ये सामील करण्याचे आमचे प्रयत्न होते . त्यांना भारत जोडो न्याय यात्रेच्या सभेला उपस्थित राहण्यासाठी सन्मानाने निमंत्रणही दिले होते. त्यांनी आयोजित केलेल्या संविधान सभेलाही मी स्वतः गेलो होतो. महाविकास आघाडीच्या बैठकीलाही त्यांना सातत्याने बोलवण्यात येत होते मात्र, त्यांनी आमची वारंवार चेष्टाच केली. असे असतानाही काँग्रेसच्या वतीने आम्ही आपली भूमिका पक्षश्रेष्ठींनी समजून सांगितली होती. आम्ही पूर्ण तयारीत देखील होतो. पण, त्यांनी ज्या पद्धतीने संपूर्ण महाराष्ट्रमध्ये आपले उमेदवार उभे करायचं काम सुरू केलं. याचा अर्थ त्यांना आमची साथ नको होती, हेच त्याच्यातून सिद्ध होतं. म्हणून आम्ही काल त्या ठिकाणी उमेदवार घोषित केला”.

यावेळी महाविकास आघाडी विरुद्ध महायुती असा तगडा सामना बघायला मिळेल अशी अपेक्षा व्यक्त केली जात होती मात्र वंचित बहुजन आघाडीने सोलापूर, लातूर, माढा, सातारा आणि रत्नागिरी-सिंधुदुर्गसह सर्वच जागांवर उमेदवार देण्याचा निश्चय केल्यामुळे या जागांवरील महाविकास आघाडीच्या उमेदवारांना भाजप प्रणित महायुती आणि प्रकाश आंबेडकर यांच्या वंचित बहुजन आघाडीशी एकाच वेळी लढावे लागणार आहे. म्हणजेच एका बाजूला महायुती आणि दुसऱ्या बाजूला वंचित बहुजन आघाडीशी महाविकास आघाडीला सामना करावा लागणार आहे.

आपलं सरकार

Click to listen highlighted text!