Welcome to   Click to listen highlighted text! Welcome to

शिंदे गटाला जेवढ्या जागा मिळतील, तेवढ्याच आम्हालाही हव्या… महायुतीत जागावाटपावरून संघर्ष सुरू

Spread the love

लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर महायुतीत जागावाटपावरून संघर्ष सुरू असून जागावाटपाचा प्रश्न अद्याप सुटलेला नाही. अजितदादांच्या गटाचे नेते छगन भुजबळ यांनी अजित पवार यांच्या गटाला एकनाथ शिंदे यांच्या गटाच्या तेवढ्याच जागा मिळाल्या पाहिजेत, अशी भूमिका स्पष्ट केली आहे.

मुंबईतील बीकेसी येथील रिलायन्स जिओ वर्ल्ड सेंटरमध्ये केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्यासोबत अजित पवार, प्रफुल पटेल, सुनील तटकरे यांची जागावाटपाबाबत बैठक झाली. त्यानंतर पत्रकार परिषद घेत भुजबळांनी आपली भूमिका स्पष्ट केली आहे. त्यामुळे महायुतीतील जागावाटपाचा संघर्ष अधिक वाढण्याची शक्यता आहे.

जागावाटपाच्या चर्चा अजून सुरु असून त्याची पूर्वतयारी म्हणून आमचा अभ्यास सुरुच होता. मात्र नंतरही आम्ही सर्व कार्यकर्त्यांना विश्वासात घेण्याचे काम केले आहे. जागावाटपाचा अंतिम निर्णय झाल्यानंतर आम्ही आमचे उमेदवार जाहीर करुत. आम्ही बैठकीत एवढेच सांगितले आहे की शिंदे गटाला जेवढ्या जागा मिळतील, तितक्याच अजित पवार गटालाही मिळाल्या पाहिजेत, असे छगन भुजबळ यांनी सांगितले आहे.

मला विश्वास आहे की आम्हाला दिलेल्या कमिटमेंट, आश्वासने पाळली जातील. त्यापेक्षाही कोण उमेदवार मजबूतीने लढू शकतो आणि जिंकून येऊ शकतो हे महत्त्वाचे आहे, नंतर तो कुठल्या पक्षाचा हे महत्त्वाचे प्रत्येकाचे उमेदवार पाहून त्यातून कोण निश्चित निवडून येईल हा माझ्या दृष्टीने महत्त्वाचा निकष आहे, असेही भुजबळ म्हणाले.

आमची चर्चा सुरु आहे…

देशात 400 पार, महाराष्ट्रात 45 पेक्षा जास्त जागा कशा पद्धतीने जिंकता येतील, त्यादृष्टीने प्रयत्न सुरु आहेत. भाजप सर्वात मोठा पक्ष आहे, यात काही शंका नाही. सर्वात जास्त आमदार, खासदार त्यांचेच आहेत.

आमची चर्चा सुरु आहे, सामोपचाराने निर्णय होईल. जागावाटपात राष्ट्रवादी नाराज असल्याच्या चर्चा तथ्यहीन आहेत. चर्चा आताच सुरु झाल्या आहेत, आधीच कसे नाराज होऊ? राष्ट्रवादीची ताकद जास्त आहे, तिथे लढण्याचा आमचा आग्रह आहे. जी जागा आम्हाला मिळेल, आम्ही तिथे जिंकून येऊ, असेही भुजबळ म्हणाले.

गेल्या लोकसभा निवडणुकीत भाजपने 48 पैकी 25 जागा लढवल्या होत्या, तर शिवसेनेने 23 जागांवर उमेदवार उभे केले होते. भाजपने 25 पैकी 23 जागा जिंकल्या, तर शिवसेनेने 18 जागा जिंकल्या होत्या. त्यातील 13 खासदार एकनाथ शिंदे यांच्यासोबत गेले. आता भाजपची ताकद वाढल्याने पक्ष 30 जागांवर लढण्यावर ठाम आहे.

तर शिंदे गटही 22 जागांसाठी अडून बसला होता. मात्र, भाजपने दबाव वाढवला आहे. सर्व 13 विद्यमान खासदारांना तिकीट मिळावेत यासाठी शिंदे आग्रही होते. मात्र, शहा यांनी त्यांना प्रत्येक मतदारसंघाची परिस्थिती समजावून सांगण्याचा प्रयत्न केला. त्यामुळे 13 पैकी काही विद्यमान खासदारांची तिकिटे कापली जाण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

राष्ट्रवादी दहा जागांवर इच्छुक

2019 च्या लोकसभा निवडणुकीत राष्ट्रवादीने चार जागा जिंकल्या होत्या. अजित पवार यांच्यासोबत सुनील तटकरे हे एकमेव खासदार आहेत. राष्ट्रवादी दहा जागांवर इच्छुक आहे. तर भाजपही 32 जागांवर ठाम आहे. तसेच शिंदे गटाला जेवढ्या जागा मिळतील, तेवढ्याच आम्हालाही हव्या, अशी भूमिका भुजबळ यांनी घेतली आहे. त्यामुळे उर्वरित 16 जागांचे समसमान वाटप करायचे झाल्यास शिंदे गट- अजित पवार गट यांना प्रत्येकी 8-8 जागा मिळण्याची शक्यता आहे.

 

 


दिवसभरातील ताज्या आणि महत्त्वाच्या घडामोडी :  www.mahanayakonline.com

Join with Mahanayak Online WhatsApp Group: https://chat.whatsapp.com/KHZm2husxzD6XiBY0eBBnZ

MahanayakOnline  www.mahanayakonline.com

For advertising call now: 9421379055 | 9028150765

आपलं सरकार

Click to listen highlighted text!