Welcome to   Click to listen highlighted text! Welcome to

VidhansabhaNewsUpdate : छगन भुजबळ यांनी जरांगे पाटील यांचा मुद्दा केला उपस्थित , अध्यक्षांनी सरकारला दिले हे निर्देश …

Spread the love

मुंबई : मराठा आरक्षणासाठी बोलवण्यात आलेल्या विशेष एकदिवसीय अधिवेशनात दोन्ही सभागृहांमध्ये मराठा आरक्षणाचा मसुदा एकमताने मंजूर करण्यात आला. दरम्यान विधानसभेत मराठा आरक्षणाचा मसुदा मंजूर झाल्यानंतर राज्याचे अन्न आणि नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ यांनी मराठा नेते मनोज जरांगे यांची तक्रार विधानसभा अध्यक्षांकडे केली. मनोज जरांगे यांच्याकडून आपल्याला जीवे मारण्याची धमकी दिली जाते, अशी तक्रार त्यांनी विधानसभा अध्यक्षांकडे केली. तसेच मनोज जरांगे यांच्याकडून मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री आणि अधिकाऱ्यांना शिवीगाळ केली जाते. याबाबतचे व्हिडीओ देखील समोर आले आहेत, असे छगन भुजबळ यांनी सभागृहात विधानसभा अध्यक्षांना उद्देशून सांगितले. यावर बोलताना , शासनाने याबाबतची दखल घेऊन उचित उपाययोजना करावी , असे निर्देश विधानसभा अध्यक्षांनी दिले.

“मराठा आरक्षण मसुद्याला आम्हाला विरोध करायचा नाही. किंबहुना आम्ही मराठा समाजाला वेगळे आरक्षण द्या, अशी मागणी करत होतो. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी ज्या जरांगेचा उल्लेख केला, अहो ते सतत धमक्या देत आहेत. याला टपकवीन, त्याला टपकवीन. मला स्वत:ला धमकी. अध्यक्ष महोदय, हे काय आहे? एवढंच नाही, छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्याच्या खाली बसून महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांना, उपमुख्यमंत्र्यांना अहो, आईवरुन शिव्या दिल्या. तिथे महसूल आयुक्त, एसपी, कलेक्टर त्यांना ते म्हणतात की तुम्ही भाडखाऊ आहात. त्यांनाही आईवरुन शिव्या. अध्यक्ष महोदय, ही जी दादागिरी सुरु आहे त्याला कंट्रोल करणार आहात की नाही?”, असं छगन भुजबळ म्हणाले.

‘राज्यात भीतीचे वातावरण निर्माण केले जात आहे ’

“याला खरंतर काही कारण नव्हतं. त्यांनी २७ तारखेला गुलाल उधळला. फटाके वाजवले, परत १० तारखेला उपोषणाला बसले आणि अनेक शहरांमध्ये बस गाड्या फोडल्या. राज्यात भीतीचं वातावरण निर्माण केलं जातंय. अध्यक्ष महोदय, हे थांबायला पाहिजे”, असे मत भुजबळ यांनी मांडले. “अध्यक्ष महोदय, हे आंदोलन सुरु असताना आपण काही बोललो तर ते ताबोडतोब धमकी देतात. त्यांना आजचा ठराव मंजूर नाही”, असेही भुजबळ म्हणाले.

‘त्यांच्यावर काही बोललं की आम्हाला धमकी देणार’

“हे सर्व झाल्यानंतर त्यांचे काय म्हणणे आहे. आता ते काय म्हणात की, मी उठणार नाही. म्हणजे त्यांचे आंदोलन चालूच. आपण मराठा समाजाला वेगळे आरक्षण द्यायचा ठराव केला तरी त्यांचं आंदोलन चालू. त्यांच्यावर काही बोलले की आम्हाला धमकी देणार. अध्यक्ष महोदय, आता त्यांचे म्हणणे आहे की, आम्हाला हे आरक्षण नको. आम्हाला ओबीसीतूनच आरक्षण हवे . अध्यक्ष महोदय, त्यांची दादागिरी आणि खोटेपणा तो त्यांच्याबरोबर काम करणारे भंडारा डोंगरावरचे अजय महाराज बारोसकर हे जे महाराज आहेत त्यांनी सुद्धा स्पष्टपणे सांगितले आहे की, हे गृहस्थ ऐकणारे नाहीत”, अशी भूमिका छगन भुजबळ यांनी मांडली.

विधानसभा अध्यक्षांचे महत्त्वाचे निर्देश

छगन भुजबळ यांची भूमिका ऐकून विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी त्यांना त्यांच्या सुरक्षेबाबत आश्वास्त केलं. “भुजबळ साहेब आपण आपल्या सुरक्षेबाबत चिंता व्यक्त केली आहे. त्याची मी नोंद घेतली आहे. आपल्याला कुठल्याही प्रकारची जीवहानीची संभावना वाटत असेल तर त्याबाबत चिंता व्यक्त करणं रास्त आहे. सभागृहासमोर आपण चिंता व्यक्त केलीय त्याची नोंद घेतली आहे. शासनाने याबाबतची दखल घेऊन उचित उपाययोजना करावी”, असे निर्देश विधानसभा अध्यक्षांनी दिले.

आपलं सरकार

Click to listen highlighted text!