MarathaAndolanNewsupdate : शिंदे साहेब आज उधळलेल्या गुलालाचा अपमान होऊ देऊ नका….सकाळी नेमके काय झाले ?

मुंबई : मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी मराठा आरक्षणाचे आंदोलक मनोज जरंगे पाटील यांनी चालो मुंबईचा नारा देत मुंबई गाठलीच होती तोच ते वाशी , नवी मुंबईत असतानाच राज्य सरकारने त्यांच्याशी तीन तास चर्चा करीत मध्यरात्रीच मागण्या मान्य पत्र सरकारच्या वतीने त्यांना देण्यात आले. आणि पुढे आझाद मैदानावर मोर्चा जाण्याच्या आत हे आंदोलन स्थगित केल्याची घोषणा जरांगे पाटील यांनी केली. यासंदर्भात मनोज जरांगे पाटलांनी मध्यरात्री पत्रकार परिषद घेऊन माहिती दिली. त्या नंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते शरबत घेऊन मनोज जरांगे पाटील यांनी आपले उपोषण सोडले आणि आंदोलन स्थगित करीत असल्याचे सांगितले.
दरम्यान यावेळी बोलतानाजरांगे पाटील म्हणाले की , आम्ही मुंबईकडे कूच करत असताना आम्हाला सांगितलं जात होतं की तिकडं जाऊन काही होणार नाही. ही पोरं तिकडं जाऊन राडा करतील, परंतु, आम्ही आरक्षण घेणारच असं ठरवून घरून निघालो होतो. आम्ही २९ ऑगस्टला म्हटलं होतं, आरक्षणात मारलेल्या खुट्ट्या आम्ही उपटून फेकणार…ज्यांनी पाचर मारलीय ती काढून फेकणार…मराठ्यांचा नादी लागायचं नाही. आम्हाला छेडण्याचा प्रयत्न केला तर आमचा नाईलाज आहे. आम्ही आत्ताही गावखेड्यात ओबीसी आणि मराठ्यांमध्ये वाद होऊ दिला नाही. यापुढेही होऊ देणार नाही. कारण आम्ही लहान-मोठे भाऊ म्हणून गुण्यागोविंदाने राहतो. पुढे मुख्यमंत्र्यांना उद्धेशून जरांगे पाटील म्हणाले , शिंदे साहेब, आज उधळलेल्या गुलालाचा अपमान होऊ देऊ नका, अशी विनंती मनोज जरांगे पाटील यांनी मुख्यमंत्र्यांना विनंती केली.महत्त्वाचं म्हणजे, या सगळ्या मागण्यांबाबत मनोज जरांगेंनी शासननिर्णय आणि लिखित पत्रे घेतली आहेत.
मराठा आरक्षणासाठी सुरू असलेलं आंदोलन आता संपलंय का? असा प्रश्न उपस्थित होत आहे. माध्यमांशी बोलताना पत्रकारांनी त्यांना असा प्रश्न विचारला. त्यावर ते म्हणाले, आम्ही आता आंदोलन स्थगित करतोय. सध्या राज्यभर दिवाळी सुरू आहे. यापेक्षा वेगळा आनंद काय असणार?
आरक्षण मिळेपर्यंत मराठा समाजाला ओबीसींचे अधिकार मिळतील : मुख्यमंत्री शिंदे
यावेळी बोलताना , आरक्षण मिळेपर्यंत मराठा समाजाला ओबीसींचे अधिकार आणि ओबीसींच्या सर्व सवलती दिल्या जातील अशी घोषणा एकनाथ शिंदे यांनी केली. तसेच ते म्हणाले, ‘एक मराठा लाख मराठा’ आमच्यासाठी खूप महत्त्वाचा आहे. तुम्ही मराठ्यांनी संयमीपणे या ठिकाणी आंदोलन केलं. राज्य सरकारने तुमच्या सर्व मागण्या मान्य केल्या आहेत. मराठा समाजासाठी असलेल्या सर्व महामंडळांना न्याय देण्याचं काम राज्य सरकार करेल. हे सरकार मराठा समाजाच्या सर्व मागण्या पूर्ण करेल, हा शब्द मी या ठिकाणी देतो तसेच मनोज जरांगे यांचं अभिनंदन करतो.
मनोज जरांगे पाटील यांनी त्यांचं उपोषण सोडलं आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी स्वतः वाशी येथे मनोज जरांगेंच्या आंदोलनस्थळी जाऊन मनोज जरांगे यांना फळांचा रस दिला. जरांगे पाटलांनी रस पिऊन उपोषण सोडलं. मनोज जरांगे यांनी आंदोलनावेळी घोषणा केली होती की, मराठा आरक्षण घेणार आणि मुंबईत विजयी गुलाल उधळणार. परंतु, मुंबईत दाखल होण्यापूर्वीच राज्य सरकारने मनोज जरांगे यांच्या मागण्या मान्य केल्या आहेत. त्यानंतर एकनाथ शिंदे मनोज जरांगे यांच्या आंदोलनस्थळी जाऊन जरांगे यांना विजयाचा गुलाल लावला.
जात प्रमाणपत्र वाटप करणाऱ्यांचा डाटा देणार : मनोज जरांगे
“मराठा समाजाच्या ५४ लाख नोंदी सापडल्या आहेत. सापडलेल्या नोंदींचे प्रमाणपत्र तातडीने देण्यात यावं. तसंच त्यांच्या कुटुंबातील नागरिकांना ताबडतोब प्रमाणपत्र देण्यात यावेत, असा आपला लढा होता. ही प्रक्रिया सुरू झाली आहे. याबाबतचा डाटा सरकार थोड्याच दिवसांत देणार आहेत, असं जरांगे पाटील म्हणाले.
सग्यासोयऱ्यांना जातप्रमाणपत्र मिळणार
ज्यांच्या नोंदी सापडल्या नाहीत, अशा सग्यासोयऱ्यांना जातप्रमाणपत्र देण्याची मागणी मनोज जरांगे पाटलांनी लावून धरली होती. ही मागणीही मान्य करण्यात आली असून याबाबत अधिकृत शासननिर्णय जाहीर झाला असल्याचं मनोज जरांगे यांनी सांगितले.
राज्यभरातील गुन्हे मागे घेतले जाणार
आंतरवाली सराटीसह राज्यभर विविध मराठा आंदोलकांवर गुन्हे दाखल करण्यात आले होते. हे गुन्हे मागे घेण्याचीही मागणी मनोज जरांगे पाटलांनी केली होती. ही मागणी मान्य झाली असून गुन्हे मागे घेण्याची प्रक्रिया सुरू झाल्याची माहिती त्यांनी दिली.