Welcome to   Click to listen highlighted text! Welcome to

BiharPoliticalNewsUpdate : नितीशकुमार पाचव्यांदा भूमिका बदलण्याच्या तयारीत … ? कधी भाजप , कधी डावे तर कधी काँग्रेस सोबत !!

Spread the love

नवी दिल्ली : नीतीश कुमार मुख्यमंत्री आणि भाजपाच्या कोट्यातून दोन उपमुख्यमंत्री होतील. नीतीश कुमार पहिल्यांदाच राजकीय भूमिका बदलत नाहीत, तर त्यांच्या पाच दशकांच्या राजकीय कारकिर्दीत त्यांनी अनेकदा भूमिका बदलली आहे. खरे तर नीतीश कुमार बिहारच्या राजकारणात निर्णायक ठरले आहेत आणि २० वर्षांपासून राजकारण त्यांच्याभोवती केंद्रित आहे. नीतीश दहा वर्षांत पाचव्यांदा भूमिका बदलण्याच्या तयारीत आहेत. नीतीश यांनी १९७४ च्या विद्यार्थी आंदोलनातून राजकारणात प्रवेश केला आणि १९८५ मध्ये पहिल्यांदा आमदार झाले. यानंतर नीतीश कुमार यांनी मागे वळून पाहिले नाही आणि राजकारणात पुढे जात राहिले. लालूप्रसाद यादव १९९० मध्ये बिहारचे मुख्यमंत्री झाले, मात्र १९९४ मध्ये नीतीश यांनी त्यांच्या विरोधात आघाडी उघडली. नीतीश आणि लालू जनता दलात एकत्र होते, पण राजकीय महत्त्वाकांक्षेमुळे त्यांचे संबंध एकमेकांपासून वेगळे झाले.

डाव्यांशी असलेली युती तोडली …

१९९४ मध्ये नीतीश यांनी जनता दल सोडले आणि जॉर्ज फर्नांडिस यांच्यासोबत समता पक्षाची स्थापना केली. यानंतर १९९५ साली त्यांनी डाव्या पक्षांसोबत युती करून निवडणूक लढवली, पण निकाल त्यांच्या बाजूने लागला नाही. नीतीश यांनी डाव्यांशी असलेली युती तोडली आणि १९९६ मध्ये भाजपच्या नेतृत्वाखालील एनडीएचा भाग बनले. यानंतर नीतीश कुमार २०१३ पर्यंत बिहारमध्ये भाजपसोबत निवडणूक लढवत राहिले आणि बिहारमध्ये सरकार बनवत राहिले. बिहारमध्ये १७ वर्षे भाजपा आणि नीतीश एकत्र राहिले. २०१४ च्या लोकसभा निवडणुकीसाठी भाजपाने नरेंद्र मोदींना पंतप्रधानपदाचे उमेदवार घोषित केल्यावर नीतीश कुमार यांचा भाजपाबद्दलचा पहिला भ्रमनिरास झाला.

पुन्हा भाजपशी असलेले संबंध तोडले …

पुढे नीतीशकुमार यांनी नरेंद्र मोदींना विरोध करत भाजपाशी संबंध तोडले आणि २०१४ ची लोकसभा निवडणूक एकट्याने लढवली. २०१४ च्या निवडणुकीत जेडीयूला फारसं यश मिळाले नाही. त्यानंतर नीतीश कुमार यांनी आरजेडी आणि काँग्रेसशी हातमिळवणी केली. २०१५ च्या विधानसभा निवडणुकीत नीतीश कुमार यांच्या जेडीयू ने आरजेडी आणि काँग्रेस सोबत निवडणूक लढवली आणि बिहारमध्ये भाजपचा पराभव केला.

त्यानंतर नीतीश कुमार यांनी आरजेडी आणि काँग्रेससोबत सरकार स्थापन केले. नीतीश मुख्यमंत्री आणि तेजस्वी यादव उपमुख्यमंत्रीपदी विराजमान झाले. बिहारमध्ये दोन वर्षे राजदसोबत सरकार चालवल्यानंतर नीतीश यांनी २०१७ मध्ये महाआघाडीशी संबंध तोडले. त्यानंतर भाजपसोबत सरकार स्थापन केले. नीतीश मुख्यमंत्री आणि भाजप नेते सुशील मोदी उपमुख्यमंत्री झाले.

दरम्यान २०१७ ते २०२२ पर्यंत नीतीश कुमार आणि भाजपाने सरकार चालवले. यावेळी नीतीश यांनी २०२० ची बिहार विधानसभा निवडणूकही भाजपासोबत लढवली, परंतु निवडणुकीच्या निकालात भाजपला फायदा झाला आणि जेडीयूचे नुकसान झाले. जेडीयू हा तिसरा पक्ष ठरला. जेडीयूने ४३ तर भाजपाने ७४ जागा जिंकल्या. मात्र असे असतानाही भाजपने नीतीश कुमार यांच्याकडे मुख्यमंत्रीपद सोपवले आणि स्वतःचे दोन उपमुख्यमंत्री बनवले.

२०२० मध्ये नीतीश कुमार मुख्यमंत्री जरुर झाले पण भाजपाचा दबाव ते सहन करू शकले नाहीत. बिहारमध्ये दोन वर्षे सरकार चालवल्यानंतर नीतीश कुमार यांनी २०२२ मध्ये पुन्हा भूमिका बदलली आणि आरजेडी- काँग्रेससोबत सरकार स्थापन केले. नीतीश कुमार मुख्यमंत्री आणि तेजस्वी यादव उपमुख्यमंत्री झाले. दीड वर्षांनंतर नीतीश कुमार यांनी पुन्हा आपला विचार बदलला असून आता ते पुन्हा भाजपासोबत सरकार स्थापन करण्याच्या प्रयत्नात आहेत

 

आपलं सरकार

Click to listen highlighted text!