Welcome to   Click to listen highlighted text! Welcome to

सरकारने माझ्यावर ट्रॅप रचलाय, मी त्याला भीत नाही, जरांगे पाटील यांनी सरकारला ठणकावले

Spread the love

जालना : गेल्या वर्षभरापासून मराठ्यांनी वाट पाहिली. आमच्या अडीशे तीनशे बांधवांनी आत्महत्या केलीय. आमच्या आई बहिणीच्या कपाळावरील कुंकू पुसलंय. आमच्या माताभगिनींची डोकी फुटलीत. पोरं अडीच महिने रुग्णालयात होती. सरकारनं भानावर यावं. मागच्या भानगडीत पडू नका. तुम्हाला गोडी गुलाबीने यावर तोडगा काढावा लागेल. आडमुठ्या भूमिकेत जाल, मुंबईत येऊ देणार नाही. आता मराठे संतापलेत. ५४ लाख लोकांच्या नोंदी सापडल्यात त्यांना प्रमाणपत्र द्या. सरकारने माझ्यावर ट्रॅप रचलाय, मी त्याला भीत नाही असं मनोज जरांगे पाटील यांनी पुन्हा सरकारला ठणकावले आहे.

जालनातील अंतरवाली सराटी येथे झालेल्या पत्रकार परिषदेत मनोज जरांगे पाटील म्हणाले की, मराठा समाज जो मुंबईला येणार आहे त्यांना २० तारखेपासून अंतरवाली सराटी येथून निघायचे. जे येणार नाहीत त्यांनी सर्वांना वाटेला लावण्यासाठी यावे. सगळ्या मराठ्यांनी बाहेर पडावे. सरकार आपल्याला येड्यात काढायला निघालंय. कुणीही उद्रेक, जाळपोळ करू नये. जर कुणी करणार असेल तो आमचा माणूस नाही. घरी कुठल्याही मराठ्यांनी थांबू नये. ताकदीने रस्त्यावर मराठा दिसला पाहिजे असं त्यांनी सांगितले.

कोणकोणत्या मंत्र्याने माझ्यावर ट्रॅप रचलाय ते मला माहिती आहे. कोणत्या जिल्ह्याचा पालकमंत्री आहे, कुणी विरोध केला, कुणी नाही केला हे सगळे माहिती आहे. २० जानेवारीच्या आंदोलनात कोणता मंत्री सहभागी होतोय आणि किती लोकांना घेऊन सहभागी होतोय हे बघायचे आहे. जो या आंदोलनाला येणार नाही त्याने लक्षात ठेवावं. ही सगळी मराठ्यांची फसवणूक चालली आहे. मराठवाड्यात एकही मराठा नाही सगळेच कुणबी आहेत. मला परिपूर्णच आरक्षण पाहिजे. त्याशिवाय तुमचे माझे जमणार नाही. सरकारच्या आमदार, मंत्र्यावर विश्वास ठेऊ नका. आमच्यात काही असंतुष्ट आत्मे आहेत त्यांना हाताखाली घेतले आहे. लातूर, संभाजीनगर, पुणे याठिकाणचे मंत्री आहे. मराठ्यात फूट पाडण्यासाठी ट्रॅप रचला जात आहे असंही मनोज जरांगे पाटील यांनी म्हटले आहे.

दरम्यान, दीड महिने लोकांनी अर्ज केलेत. अजून प्रमाणपत्रे दिली नाहीत. लाखोंच्या संख्येने मराठा बांधव माझ्यावर विश्वास ठेऊन आहे. तुमच्याशी मैत्री करायला मी येत नाही. मुंबईत आल्यावर माझ्यावर गोळ्या घातल्या तरी माझे विचार मरू देऊ नका हे माझे मराठ्यांना आवाहन आहे. आंदोलन शांततेत करायचे पण संपूर्ण राज्य बंद दिसले पाहिजे. आरक्षण घेतल्याशिवाय मागे फिरणार नाही. सरकारला ७ महिने वेळ दिला. तुम्ही १ वर्षात काहीच करू शकला नाही. मी जर त्या मंत्र्यांचे नाव घेतले तर त्याचा राजकीय सुपडा साफ होईल. विनाकारण खोट्या बातम्या पेरू नका असा इशाराही मनोज जरांगे पाटलांनी दिला आहे.

शासन-प्रशासनाला  सुनावले खडे बोल…

मराठा आरक्षण लढ्याचे नेते मनोज जरांगे पाटील यांनी कुणबी प्रमाणपत्र वाटपावरुन शासन-प्रशासनाला खडे बोल सुनावले. त्यानंतर सरकारला जाग आली असून सर्व जिल्हाधिकाऱ्यांना मुख्य सचिवांनी तसे आदेश दिले आहेत. कुणबी नोंदी सापडलेल्या मराठ्यांना तात्काळ प्रमाणपत्र वाटप करा, असे आदेश राज्याच्या मुख्य सचिवांनी सर्व जिल्हाधिकाऱ्यांना दिले आहेत. मराठवाड्यामध्ये सर्वात कमी नोंदी सापडल्याचा मुद्दा मनोज जरांगे यांनी उपस्थित केला होता. शिवाय ज्यांच्या नोंदी सापडलेल्या आहेत, त्यांना अधिकारी जाणीवपूर्वक कुणबी प्रमाणपत्र देत नसल्याचा आरोप त्यांनी केला.

त्यानंतर राज्याच्या मुख्य सचिवांनी सर्व जिल्हाधिकाऱ्यांना कुणबी प्रमाणपत्र वाटप करण्याचे आदेश दिले आहेत. मनोज जरांगे पाटील यांनी माध्यमांना प्रतिक्रिया देत म्हटले की, प्रमाणपत्र वाटप करण्याचा आदेश दिला खरा पण त्याची अंमलबजावणी झाली पाहिजे. त्यानंतर राज्याच्या मुख्य सचिवांनी सर्व जिल्हाधिकाऱ्यांना कुणबी प्रमाणपत्र वाटप करण्याचे आदेश दिले आहेत. मनोज जरांगे पाटील यांनी माध्यमांना प्रतिक्रिया देत म्हटलं की, प्रमाणपत्र वाटप करण्याचा आदेश दिला खरा पण त्याची अंमलबजावणी झाली पाहिजे.

जरांगे पाटील पुढे म्हणाले, काहीही झाले तरी आम्ही शंभर टक्के मुंबईला जाणार आहोत. सरकारने किती मराठ्यांना कुणबी प्रमाणपत्र वाटप केले, त्याचा डेटा आम्हाला २० तारखेच्या आत द्यावा. आज नोंद सापडली तरी उद्या प्रमाणपत्र देता येते . ५४ लाख नोंदींपैकी किती लोकांना प्रमाणपत्र दिली, त्याची माहिती सरकारने आम्हाला द्यावी, अशी मागणी त्यांनी केली.

”मुख्य सचिवांनी आदेश दिले असले तरी आम्ही लगेच हुरळून जाणार नाही. असल्या आदेशांना काहीही अर्थ नसतो. जेव्हा कुणबी प्रमाणपत्र वाटप केले जाईल, तेव्हा खरे . सरकार जर राज्यभर शिबिरे घेऊन कुणबी प्रमाणपत्र वाटप करणार असेल तर चांगलेच आहे. परंतु हे त्यांना आधीच सुचायला पाहिजे होते.” असे म्हणत जरांगे पाटलांनी २० जानेवारीच्या मुंबई आंदोलनाचा निर्धार पक्का असल्याचे स्पष्ट केले.

आपलं सरकार

Click to listen highlighted text!