Welcome to   Click to listen highlighted text! Welcome to

वंचित बहुजन आघाडीबद्दल काँग्रेसचे प्रभारी रमेश चेन्नीथला यांनी दिली महत्वाची माहिती …

Spread the love

अमरावती : वंचित बहुजन आघाडीच्या इंडिया आघाडीतील प्रवेशाबाबत काँग्रेसचे प्रदेश प्रभारी रमेश चेन्नीथला यांनी महत्वाची अपडेट दिली आहे. त्यांनी दिलेल्या माहितीनुसार महाविकास आघाडीत लवकरच वंचित बहुजन आघाडी सामील होणार असून त्या अनुषंगाने प्रकाश आंबेडकर यांच्याशी बोलणी करण्याची जबाबदारी उद्धव ठाकरे, शरद पवार हे हाताळत आहेत.

लोकसभा निवडणुकीच्या तयारीच्या अनुषंगाने प्रदेश काँग्रेसच्या आढावा बैठकीसाठी ते गुरुवारी अमरावतीत आले होते. यावेळी रमेश चेन्नीथला प्रसार माध्यमांशी संवाद साधताना त्यांनी काँग्रेस पक्षाच्या लोकसभा निवडणुकीबाबतचा रोडमॅप सांगितला. राज्यात महाविकास आघाडी ही संयुक्तपणे निवडणूक लढविणार आहे. येत्या आठवड्यात लोकसभा निवडणूक जागा वाटपावरही मंथन होईल. महाविकास आघाडीत प्रकाश आंबेडकरांच्या वंचित बहुजन आघाडीला सहभागी करून घेण्यासाठी एकमत होईल, यात दुमत नाही; पण शिवसेनेचे उद्धव ठाकरे, राष्ट्रवादीचे शरद पवार या दोन्ही नेत्यांवर प्रकाश आंबेडकर यांच्याशी बोलणी करण्याची जबाबदारी सोपविली आहे, असे रमेश चेन्नीथला यांनी सांगितले.

राहुल गांधी यांनी मणिपूर ते मुंबई भारत जोडो न्याय यात्रा सुरू केली असून, या न्याययात्रेला मोठे जनसमर्थन मिळत आहे. ही निवडणूक यात्रा नाही, तर देशातील सर्वसामान्य जनतेला न्याय देण्यासाठी आहे. यात्रेच्या माध्यमातून राहुल गांधी भारत जोडण्याचे काम करत आहेत, ही यात्रा देशासाठी आहे, असे ते म्हणाले.

पृथ्वीराज चव्हाण यांचा प्रकाश आंबेडकरांना सवाल

दरम्यान २०१९ मध्ये वंचित बहुजन आघाडीमुळे ९ ठिकाणी काँग्रेसचे खासदार पडले आणि भाजपाचे निवडून आले हे वास्तव आहे. त्यामुळे असं काही प्रकाश आंबेडकरांनी करू नये. तुम्ही खरगेंना फोन केला तर तुम्हाला भेटायला कोण अडवणार आहे? तुम्ही कोणाच्या निमंत्रणाची वाट पाहताय? असा थेट सवाल काँग्रेस नेते पृथ्वीराज चव्हाण यांनी वंचित बहुजन आघाडीचे नेते प्रकाश आंबेडकरांना विचारला आहे.

वंचितचा इंडिया आघाडीत समावेश करण्याबाबत पत्रकारांनी पृथ्वीराज चव्हाण यांना प्रश्न विचारला. त्यावेळी ते म्हणाले की, इंडिया आघाडी ही २८ पक्षांची आहे. त्या पक्षांनी मल्लिकार्जुन खरगेंना नेतृत्व दिले आहे. प्रकाश आंबेडकर इंडिया आघाडीतील नेत्यांना वैयक्तिक ओळखतात. जर त्यांना इंडिया आघाडीत यायचे असले तर त्यांनी खरगेंना भेटून सांगितले पाहिजे.एखादे पत्र दिले पाहिजे. पण ते कुणाच्या निमंत्रणाची वाट पाहतायेत माहिती नाही. त्यांना मोदींना हरवायचं आहे की नाही हा खरा प्रश्न आहे. माझ्या माहितीप्रमाणे प्रकाश आंबेडकरांनी पत्र लिहिले नाही. मी एक पत्र पाहिले जे त्यांच्या प्रवक्त्यांनी लिहिलं. स्वत: प्रकाश आंबेडकरांनी भेटायला काय हरकत आहे? ते नेते आहेत. २८ पक्षाचे नेते एकमेकांना भेटत आहेत. मग प्रकाश आंबेडकरांना भेटायला काय अडचण आहे? असं त्यांनी विचारले.

प्रकाश आंबेडकर हे देशातील मोठे नेते

तसेच प्रकाश आंबेडकर ठाकरेंच्या शिवसेनेसोबत चर्चा करतायेत त्यामुळे त्यांची चर्चा संपली की आम्हाला कळेल. प्रकाश आंबेडकर हे देशातील मोठे नेते आहेत. देशात त्यांच्या एकट्याकडे आंबेडकर हे नाव आहे. प्रकाश आंबेडकरांनी राष्ट्रीय राजकारणात सक्रीय झाले पाहिजे. त्यांनी देशाच्या संसदेत आले पाहिजे ही आमची प्रामाणिक इच्छा आहे. मी मुख्यमंत्री असतानाही असा प्रयत्न केला होता. पण जर अवास्तव मागणी झाली आणि जागा उभ्या केल्या तर त्याचा फायदा मोदींना होतो. मी वेळोवेळी सांगतोय असंही पृथ्वीराज चव्हाणांनी म्हटले .

यावेळी प्रदेश काँग्रेस अध्यक्ष नाना पटोले, विधिमंडळ पक्षनेते बाळासाहेब थोरात, माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण व पृथ्वीराज चव्हाण, विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार, नसीम खान, चंद्रकांत हंडोरे, माजी मंत्री यशोमती ठाकूर, अनीस अहमद, महिला काँग्रेस प्रदेशाध्यक्ष संध्या सव्वालाखे, सचिव आशिष दुआ, आ. वजाहत मिर्जा, मुख्य प्रवक्ते अतुल लोंढे, नाना गावंडे, डॉ. सुनील देशमुख, जिल्हा काँग्रेसचे अध्यक्ष बबलू देशमुख, शहराध्यक्ष बबलू शेखावत आदी उपस्थित होते.

आपलं सरकार

Click to listen highlighted text!