Welcome to   Click to listen highlighted text! Welcome to

सरकार काहीही म्हणत असले तरी आम्ही मुंबईला जाणारच , जरंगे पाटील यांचा निर्धार

Spread the love

जालना : मराठा समाजावर आरक्षणासाठी मुंबईला येण्याची वेळ येणार नाही असे मुख्यमंत्री म्हणत असले तरी आम्ही सरकारच्या आशेवर नाही . आम्ही मुंबईला जाणार आणि आरक्षण घेणारच असा निर्धार मराठा आरक्षण आंदोलनाचे नेते मनोज जरांगे यांनी केला आहे.

पत्रकारांशी बोलताना जरांगे म्हणाले की , आमच्या पोरांचे नुकसान व्हायला लागलंय मग आणखी किती दिवस वेळ द्यायचा? आता मराठ्यांनी ठरवलंय घराघरातून मराठे मुंबईत येणार आहे. आमची तयारी सुरू आहे. जे मुंबईत येणार नाही ते जिथे असतील तिथून आंदोलनात उतरतील. सरकार गुप्तपणे आकडेवारी काढतंय पण तुमचे गणित कोलमडून जाणार आहे. मुंबईत ३ कोटी मराठा दिसतील. पुण्याच्या पुढे गेले आणि पनवेलजवळ पाहिले तर ३ कोटीला कमी पडले तर नाव बदलून ठेवा असा इशारा मनोज जरांगे पाटील यांनी सरकारला दिला आहे.

ओबीसींच्या सभांना विरोध नाही…

मनोज जरांगे पाटील पुढे म्हणाले की, सरकार काहीही म्हणत असले तरी मुंबईत जायची वेळ येणार आहे. त्यामुळे मराठे कामाला लागले आहेत. दारोदारी जाऊन समाजाला जागरुक करत आहोत. लाखोंच्या संख्येने मराठा समाज या आंदोलनात सहभागी होणार आहे. काही मुंबईत येतील काही रस्त्यावर निरोप द्यायला येतील. प्रत्येकाला लोकशाहीत आंदोलन करण्याचा अधिकार आहे. ओबीसी नेते जितक्या सभा घेतात तितका आमचा समाज आणखी एक होत आहे. त्यामुळे आमचा कुणालाही विरोध नाही. सुप्रीम कोर्टातील आरक्षण टिकणार आहे का हा मुद्दा आहे. सातारच्या गादीला मी प्रचंड मानतो. त्याबद्दल एक शब्दही काढणार नाही. ५० टक्क्यांहून अधिक आरक्षण झाले तर इंदिरा सहानी प्रकरणामुळे टिकत नाही हे आधी आपण पाहिलेले आहे.

१५ तारखेला पत्रकार परिषद घेऊन कार्यक्रम जाहीर करू …

मुंबईला जाण्याचा मार्ग ठरवला आहे. आजही बैठक झाली. कुठे कुठे मुक्काम करायचा, तिथे सगळ्या गोष्टींची व्यवस्था आहे की नाही याचा आढावा घेतला जातोय. १५ तारखेला पत्रकार परिषद घेऊन कुठे कुठे मुक्काम असेल हे जाहीर करू. आम्ही मुंबईला जाण्याच्या तयारीत आहोत. किती दिवस संयम पाळायचा, गोरगरिब मराठा लेकरांसाठी ७ महिने वेळ दिला. तुम्ही जाणुनबुजून करताय हे वाटायला लागलंय. त्यामुळे आज-उद्या करण्यात पोरांचे वाटोळे होतंय, समाजाची पोरं मोठी व्हायला पाहिजे हे आम्ही ठाम ठरवलंय त्यामुळे आमचे मुंबईला जायचंय हे फिक्स आहे असंही मनोज जरांगे पाटील यांनी सांगितले.

दरम्यान, आमच्या नोंदी सापडलेल्या असतानाही कायदा पारित होत नाही. बैठका होत राहतात मात्र त्यातून काही होत नाही. २० जानेवारी रोजी मुंबईला निघण्याची तयारी झालेली आहे . तयारी अंतिम टप्प्यात आहे. आरक्षण घेतल्याशिवाय आता माघार नाही. किती लोक येणार आहे याचा शोध घेण्यासाठी सरकारी यंत्रणाही कामाला लागली आहे असे जरांगे म्हणाले.

आपलं सरकार

Click to listen highlighted text!