Welcome to   Click to listen highlighted text! Welcome to

Maratha Reservation : मला समाजाशी गद्दारी करायची नाही, यासाठी मेलो तरीही चालेल – मनोज जरांगे

Spread the love

आंतरवाली सराटीमध्ये मुंबई येथील मराठा आंदोलकांच्या बैठकीत मनोज जरांगे यांनी यापुढे कोणीही मराठा आंदोलक सरकारशी चर्चा करणार नाही अशी घोषणा केली आहे. जरांगे यांच्या या निर्णयामुळे आता सरकारच्या अडचणीत वाढ होण्याची शक्यता आहे. कारण चर्चाच बंद झाली तर मराठा आरक्षणावर तोडगा कसा निघणार असा प्रश्न उपस्थित केला जात आहे.

दरम्यान, मनोज जरांगे यांनी सांगितले, 20 जानेवारीला मुंबईकडे निघणार असून, तब्बल 2 कोटी मराठे मुंबईत येणार आहेत. आता मुंबईतल्या आंदोलकांच्या खांद्यावर समाजाची जबाबदारी आहे. तसेच, इथून येणाऱ्या आंदोलकांची जबाबदारी मुंबईच्या आंदोलकांवर असणार आहे.

आपल्याला चारही बाजूने घेरले, तर आपण 10 बाजूने घेरू, मुंबई आंदोलनासाठी दीड लाख स्वयंसेवक तयार करत आहोत. वकिलांची 200 जणांची टीम असून, 1500 डॉक्टरांची टीम लागणार आहे.

दीड महिन्याचे अन्न सुरवातीला घेऊन जाणार आहे. मुंबईला जाताना रस्त्याने पिकांचे नुकसान होणार नाही, याची खबरदारी घ्यायची आहे. तसेच, मुंबईकर आणि माझ्यासह यापुढे कोणीही मराठा आंदोलक सरकारशी चर्चा करणार नाही, असेही मनोज जरांगे म्हणाले आहेत.

माझी प्रत्येक भूमिका मी मराठा बांधवांच्या समोरच मांडत असतो. सरकारशी होणाऱ्या बैठका देखील मी सर्वांसमोरच करतो. मुख्यमंत्र्यांसोबत झालेल्या उच्चस्तरीय बैठकीत दुसरे कोणी असते तर गुपचूप बैठक करून देखील आला असता पण मला समाजाशी गद्दारी करायची नाही.

यासाठी मेलो तरीही चालेल. मला मी पणा सुद्धा चालत नाही, मराठा समाजाला एवढीच संधी आहे. आता सर्व काही जवळ आले असून, फक्त एका शब्दावर आपले सगळे गुंतले आहे. एका नोंदीवर 70 जणाला लाभ देण्यात आले आहे. तसेच आजपासून पुन्हा शिंदे समिती कामाला लागणार असल्याचे देखील जरांगे म्हणाले.

ज्यांची नोंद मिळाली आहे त्यांच्या सगेसोयऱ्यांना सुद्धा लाभ मिळावा अशी आपली मागणी आहे. ज्यांच्यामध्ये नाते जुडतात त्यांना सोयरे म्हणतात. नाते असले तरच ग्रामीण भागात मुलगी देतात किंवा करतात.

त्यामुळे ज्यांची नोंद मिळाली त्यांच्या सोयऱ्यांना देखील त्याचा लाभ द्यावा अशी आपण मागणी केली होती. मात्र, सरकारने याचा वेगळाच अर्थ काढला आहे. चुलता आणि पुतण्याला सरकार सोयरे समजतात.

आता दोन दिवसात यावर निर्णय घेऊन बैठक करू असे सरकारकडून सांगण्यात आले आहे. त्यामुळे असे झाल्यास एकही मराठा आरक्षणापासून वंचित राहत नाही असे देखील मनोज जरांगे म्हणाले आहे.

सरकारला सोयरे हा शब्द आपण दिला नव्हता. त्यांचे न्यायमूर्ती आले होते. सोबत सहा मंत्री होते. यावेळी गायकवाड समितीचे अध्यक्ष देखील आले होते. त्यांनी काही सचिव सोबत आणले होते. त्यांनी आरक्षणावर, घटनेवर अभ्यास करणारे तज्ञ देखील आणले होते.

घटनेत आरक्षण बसणार का आणि नाही बसल्यास कोणते शब्द टाकावे यासाठी देखील काही लोकं आणले होते. ज्यांची नोंद मिळाली त्यांच्या सर्व कुटुंबाला लाभ द्यायचा, नोंद मिळालेल्या व्यक्तीच्या संबंधित नातेवाईकांना लाभ द्यायचा, नोंद मिळालेल्या व्यक्तीच्या सगेसोयऱ्यांना लाभ मिळणार आणि मागेल त्या मराठयांना आरक्षणाचा लाभ मिळेल हे चार शब्द त्यांनीच सांगितले होते,असेही जरांगे म्हणाले.

 


दिवसभरातील ताज्या आणि महत्त्वाच्या घडामोडी :  www.mahanayakonline.com

दिवसभरातील ताज्या News Update | Join with Mahanayak Online :

https://chat.whatsapp.com/KHZm2husxzD6XiBY0eBBnZ

MahanayakOnline
www.mahanayakonline.com

For advertising call now :
9421379055 | 9028150765

आपलं सरकार

Click to listen highlighted text!