NashikNewsUpdate : मराठा आंदोलकांना हुलकावणी देत भुजबळांचा दौरा संपताच रस्त्यावर गोमूत्र शिंपडून निषेध …….

नाशिक : राज्याचे अन्न व नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ आज येवल्यात पाहणी दौऱ्यावर असून त्यांच्या दौऱ्याला विरोध करणाऱ्या मराठा आंदोलकांना हुलकावणी देत त्यांनी शेतकऱ्यांच्या बांधावर जाऊन पिकांच्या नुकसानीची पाहणी केली. यावेळी पोलिसांचा मोठा बंदोबस्त ठेवण्यात आला होता तर मराठा समाजाने त्यांच्या मार्गावर रास्ता रोको करण्याची तयारी केली होती. मात्र दुपारी मराठा समाजाचा तीव्र विरोध लक्षात घेता पोलिसांच्या सूचनेवरून आपला दौरा अर्धवट सोडून ते शहापूरकडे रवाना झाले.
जाहीर केल्याप्रमानी आज सकाळी लवकर येऊन भुजबळ यांनी आपला दौरा सुरू केला. येवला विंचुर चौफुलीवर मराठा समाजाचे कार्यकर्ते भुजबळ यांचा निषेध करण्यासाठी जमले होते. याची माहिती पोलिसांनी त्यांना दिली. त्यानंतर पोलिसांच्या सूचनेवरूनच वाद टाळण्यासाठी भुजबळ अंगणगाव मार्गे आपल्या पाहणी दौऱ्यासाठी निघून गेले. त्यामुळे सकाळी होणारा वाद टळला. अर्थात सोमठानदेश व अन्य भागातील नागरिकांत संताप कायम असल्याने दौऱ्याचा शेवटी काय होते, याची उत्सुकता कायम आहे. पोलिस यंत्रणा देखील त्यामुळे तणावात आहे.
येवल्यातील काही शेतकऱ्यांनी मंत्री भुजबळ यांना काल रात्रीच दूरध्वनी करून आपण आमच्या गावांना भेटी देऊ नये. आम्ही सर्व एकमताने तसा निर्णय घेतला आहे, असे कळवले होते. त्यावर चार लोकांनी एकत्र येऊन ठराव केला, तर तो सबंध गावाचा ठराव होतो का? असे त्यांनी दूरध्वनी करणाऱ्या मराठा समाजाच्या कार्यकर्त्याला सुनावले होते. त्यामुळे आज सकाळी त्यांचा दौरा कसा होतो. याची उत्सुकता होती. भुजबळ यांच्या समर्थकांनी देखील त्यांना मतदारसंघातील विरोध, कार्यकर्ते, आंदोलन, राजकीय चर्चा याबाबत सतत माहिती देऊन सावध केले होते.
हा दौरा सुरू झाल्यावर भुजबळ यांनी काही शेतकऱ्यांच्या द्राक्षबागांची पाहणी केली. ही पाहणी देखील शासकीय अधिकारी, पोलिस तसेच मीडियाच्या गराड्यातच झाली. पोटादा येथून हा वाहनांचा ताफा अतीशय वेगात निघून गेला. गावात कोणीही थांबले नाही, असे ग्रामस्थांनी सांगितले.
दरम्यान मंत्री भुजबळ यांचा ताफा सोमठानदेश या गावातून जात असतांना आक्रमक झालेल्या मराठा बांधवानी भुजबळ यांच्याकडे पाठ करून भुजबळ गो बॅक च्या जोरदार घोषणा दिल्या त्यामुळे काही काळ तणावाची परिस्थिती निर्माण झाली होती मात्र पोलिसांनी चोख बंदोबस्त ठेवला होता. छगन भुजबळ यांचा हा पाहणी दौरा संपल्यानंतर ज्या रस्त्यावरून छगन भुजबळ परतले त्या रस्त्यावर मराठा आंदोलकांनी गोमूत्र शिंपडून आपला निषेध व्यक्त केला. तसेच आंदोलकांनी अर्धनग्न होत आंदोलकांनी काळे शर्ट फिरवत छगन भुजबळ गो बॅकच्या घोषणा देण्यात आल्या. येवला हा मंत्री छगन भुजबळ यांचा बालेकिल्ला मानला जातो गेल्या २० वर्षा पासून ते या मतदार संघांचे प्रतिनिधित्व करीत आहे इतक्या वर्षात प्रथमच त्यांना मोठ्या प्रमाणात विरोध होत असल्याचे पहावायास मिळाले.