Welcome to   Click to listen highlighted text! Welcome to

MaharashtraPoliticalUpdate : मी लेचापेचा माणूस नाही… अजित पवारांनी दिली टिकेला उत्तरे !!

Spread the love

पुणे : मी लेचापेचा माणूस नाही. राजकीय आजार माझ्या स्वभावात नाही. अलीकडच्या काळात वेगवेगळ्या प्रकारे वाचाळवीरांची संख्या वाढलेली दिसते.लोकशाहीत प्रत्येकाला आपले मत व्यक्त करण्याचा अधिकार संविधानाने दिलेला आहे. त्या अधिकाराचा वापर आपण कसा करायचा हा ज्याचा त्याचा प्रश्न आहे.परंतु विविध प्रश्न असताना रोज कुणी ना कुणी काही विधाने करते. कुणी आ रे म्हटलं की दुसऱ्याने का रे म्हणायचे. ही शिकवण आपल्याला यशवंतराव चव्हाणांनी शिकवली नाही. ही महाराष्ट्राची परंपरा नाही. संस्कृती नाही हे सर्वांनी ध्यानात घेतले पाहिजे. अशा शब्दात उपमुख्यमंत्री अजित पवारांनी टीकाकारांना फटकारले आहे.

गेल्या काही दिवसांपासून अजित पवार यांनी मौन धरण केले होते . या यशवंतराव चव्हाण यांना आदरांजली अर्पण केल्यानंतर ते माध्यमांशी बोलताना म्हणाले की, दिवाळीच्या काळात मला डेंग्यू झाल्याने १५ दिवस आजारात गेले. दुर्दैवाने मी जेव्हा टिव्ही बघायचो, पेपर वाचायचो तर मला राजकीय आजार आहे अशी विधाने केली गेली. मी लेचापेचा माणूस नाही. गेली ३२ वर्ष माझी मते मी स्पष्टपणे लोकांसमोर मांडत असतो. राजकीय आजार माझ्या स्वभावात आणि रक्तात नाही. कारण नसताना वेगवेगळ्या प्रकारच्या बातम्या आल्या. अमित शाह यांना भेटायला गेलो तर तक्रार करायला गेलोय अशी बातमी, तक्रार करणे माझ्या स्वभावात नाही. काम करताना सर्वांना सोबत घेऊन काम करायचे असते असं त्यांनी सांगितले.

आरक्षण कायद्याच्या चौकटीत बसलं पाहिजे…

वाचाळवीरांबाबत मी कुठल्याही पक्षाचा उल्लेख केला नाही. मी दोन्ही बाजू सांगितल्या , त्यात सगळेच आले. मला कुणाला वैयक्तिक टोकायचे नाही. माझ्यासह सर्वांनी त्याचे आत्मचिंतन करायचे आहे. राज्यात इतर अनेक प्रश्न आहे. प्रत्येकाला आपापल्या समाजाला आरक्षण मागण्याचा हक्क आहे. त्यात कुणाचे दुमत नाही. पण ते देताना कायद्याच्या, नियमांच्या चौकटीत टिकले पाहिजे. मागील काळात जे आरक्षण दिले ते दुर्दैवाने हायकोर्टात टिकले पण सुप्रीम कोर्टात टिकले नाही. त्यामुळे त्या घटकांना असे  वाटते की राज्यकर्ते आम्हाला खेळवतायेत का? त्यातून समज गैरसमज निर्माण होतात. नवीन पिढीच्या मनात वेगळी भावना वाढीला लागते.

धनगर समाजाचीही मागणी आहे…

राज्याचे प्रमुख एकनाथ शिंदे यांनी स्वत:छत्रपती शिवरायांची शपथ घेऊन आरक्षण देणारच असे वचन दिले आहे. त्यादृष्टीने सरकारचे प्रयत्न आहेत. समाज मागासलेला आहे हे आयोगाकडून सिद्ध करावे लागते. धनगर समाजाचीही मागणी आहे. जेव्हा धनगर समाजाची मागणी पुढे येते तेव्हा आदिवासी समाजाची वेगळी भूमिका आहे. प्रत्येकाला आपली भूमिका मांडण्याचा अधिकार आहे. परंतु ते करताना एकमेकांविषयी कटुता होऊ नये. एकमेकांबद्दल समज-गैरसमज, चीड निर्माण होऊ नये अशी माझी सर्वांनी विनंती आहे असंही अजित पवार म्हणाले.

कुणाच्या भावना दुखावल्या जाणार नाहीत याची काळजी घेतली पाहिजे…

दरम्यान, मी कुणाचे नाव घेऊन विधान करत नाही. सत्ताधारी-विरोधी पक्ष सगळ्यांनीच याबाबत भूमिका समजून घेऊन कुणाच्या भावना दुखावल्या जाणार नाहीत याची काळजी घेतली पाहिजे. प्रत्येकाची मागणी असते. ते नियमात, कायद्याच्या चौकटीत बसवण्याकरता जो काही वेळ द्यावा लागेल तो दिला पाहिजे. कारण पुन्हा ते कोर्टात जाते. तिथे टिकले नाही तर पुढे काय…बिहारमध्ये जे आरक्षण दिलंय त्याचा अभ्यास सुरू आहे. महाराष्ट्रात आता ६२ टक्के आरक्षण आहे. कुणाच्याही आरक्षणाला धक्का न लागता मराठा समाजाला आरक्षण द्यावे हे सर्वपक्षीय नेत्यांनी एकमताने ठरवले आहे असंही अजित पवारांनी सांगितले.

आपलं सरकार

Click to listen highlighted text!