Welcome to   Click to listen highlighted text! Welcome to

HingoliOBCNEWSUpdate : हिंगोलीत उद्या ओबीसी बांधवांची भव्य सभा, भुजबळ यांच्यासह विजय वडेट्टीवार यांचीही उपस्थिती

Spread the love

प्रभू नांगरे | हिंगोली : जालना येथील सभेनंतर आता हिंगोली जिल्ह्यात उद्या ओबीसी बांधवांची रामलीला मैदानावर भव्य  सभा आयोजित करण्यात आली आहे. या सभेला मंत्री छगन भुजबळ यांच्यासह विरोधी पक्ष नेते विजय वडेट्टीवार यांचीही उपस्थिती राहणार आहे. तर, दुसरीकडे मनोज जरांगे यांची देखील हिंगोली-परभणी रोडवरील दिग्रास कऱ्हाळे फाट्यावर ११०  एकरवर सभा होणार आहे. त्यामुळे या दोन्ही नेत्यांच्या सभेकडे हिंगोलीसह राज्याचे लक्ष लागले आहेत.

दरम्यान मराठा समाजाबाबतची मंत्री छगन भुजबळांची वक्तव्य दोन समाजात तेढ निर्माण करणारे  असल्याची टीका केली जात आहे. त्यामुळे, भुजबळांच्या कोणत्याही कार्यक्रमाला उपस्थित राहणार नसल्याची भूमिका विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांनी काही दिवसांपूर्वी घेतली होती. दरम्यान, आता वडेट्टीवार यांनी आपली भूमिका बदलली असून, उद्या होणाऱ्या हिंगोली जिल्ह्यातील ओबीसी सभेला भुजबळांसोबत हजेरी लावणार असल्याचे वडेट्टीवार यांनी म्हटले आहे. गेल्या दोन दिवसांपासून हजारो ओबीसी बांधवांनी फोनवरून मला मेळाव्याला उपस्थित राहावे अशी विनंती केली, तसेच सर्व ओबीसी नेत्यांची देखील अशीच भावना आहे. त्यामुळे, उद्याच्या ओबीसी सभेला आपण उपस्थित राहणार असल्याचे वडेट्टीवार यांनी म्हटले आहे.

या ओबीसीं मेळाव्याचे उ‌द्घाटन अन्न व नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ करणार असून  अध्यक्षस्थानी प्रकाश शेंडगे राहतील. दरम्यान या ओबीसींच्या या एल्गार महामेळाव्यासाठी हिंगोली जिल्ह्यात सर्कलनिहाय बैठका घेतल्या जात आहेत. यात ओबीसी प्रवर्गात मोडणाऱ्या प्रत्येक घटकापर्यंत पोहोचून त्यांनी यात सहभागी होण्यासाठी आवाहन केले जात आहे.

विशेष म्हणजे, अंबड येथील सभेनंतर मनोज जरांगे यांच्याकडून करण्यात आलेल्या प्रत्येक टीकेला भुजबळ हे याच सभेतून उत्तर देणार असल्याची देखील चर्चा आहे.

मनोज जरांगेंची सभा ११०  एकरवर

दरम्यान एकीकडे भुजबळ यांच्या उद्याच्या सभेची तयारी अंतिम टप्प्यात आली असतांना, दुसरीकडे मनोज जरांगे यांच्या देखील सभेची हिंगोलीत जोरदार तयारी सुरु असून जरांगे यांच्या महाराष्ट्र दौऱ्याचा चौथा टप्पा सुरू होणार आहे. याच चौथ्या टप्प्यात जरांगे यांची हिंगोली जिल्ह्यांमध्ये सभा होणार आहे. हिंगोली-परभणी रोडवरील दिग्रास कऱ्हाळे या फाट्यालगत या सभेचे आयोजन करण्यात आले आहे. या सभेसाठी तब्बल अडीचशे एकर शेत जमीनवर तयारी सुरू करण्यात आली आहे. या तयारीसाठी तब्बल आठ ते दहा जेसीबी, दहा ट्रॅक्टर यासह अनेक मराठा समाज बांधव दिवस काम करत आहेत. या ठिकाणी ११०  एकरवर सभा होणार असून, उर्वरित दीडशे एकर जमिनीवर पार्किंगची व्यवस्था करण्यात आली आहे. या सभेची तारीख अद्याप जाहीर झाली नसली, तरी सभेची तयारी मात्र जोरदार स्वरूपात सुरू आहे.

… म्हणून मी या सभेला उपस्थित राहतो आहे : वडेट्टीवार

दरम्यान, या सभेच्या आपल्या उपस्थितीबाबत बोलतांना वडेट्टीवार म्हणाले की, “हिंगोली येथील ओबीसी मेळाव्याची आधीपासूनच तयारी करण्यात आली होती. सगळ्या ओबीसी बांधवांनी ही तयारी केली होती. तर, गेल्या दोन दिवसांपासून हजारो ओबीसी बांधवांनी फोनवरून मला मेळाव्याला उपस्थित राहावे अशी विनंती केली, ओबीसी नेत्यांची सुद्धा अशीच भावना आहे. त्यामुळे आपण हिंगोलीच्या मेळाव्याला जाणार आहे. हा मेळावा सर्वपक्षीय मेळावा आहे.

ओबीसीसाठी भुजबळ साहेबांनी सुद्धा आवश्यकता पडेल तर राजीनामा देण्यासाठी तयार असल्याची भूमिका मांडली आहे. तसेच, ओबीसीच्या हक्कासाठी भेद नको असे  म्हणणारे नेते मला भेटले आहे. त्यामुळे, आमच्या भूमिकेमुळे चुकीचा संदेश जाऊ नये आणि ओबीसींच्या आग्रहाखातर मी हिंगोली येथे उद्याच्या मेळाव्याला जातोय,” असे वडेट्टीवार म्हणाले.

सरकारमध्ये एकमेकांची जिरवा असा उद्योग सुरु…

सरकारमध्ये सर्व काही आलबेल नाही. एक मंत्री उपमुख्यमंत्र्यांच्या निर्णयाला आव्हान देतो. सरकारमध्ये तिघांचीही दिशा वेगवेगळी आहे. दिल्लीच्या हाय कमांडला तिघांना एकत्र बसून समजवण्याची वेळ येते. जसं पाणी अडवा जिरवा आहे तसं एकमेकांच्या फाईली अडवा आणि एकमेकांची जिरवा असा उद्योग सर्रास या सरकारमध्ये सुरू असल्याचे वडेट्टीवार म्हणाले.

तुषार दोषी यांच्यावर कारवाई होणे आवश्यक

दरम्यान, जालना येथील आंतरवाली सराटी प्रकरणावर बोलतांना वडेट्टीवार म्हणाले की, “पोलीस अधीक्षक तुषार दोषी यांच्यावर कारवाई होणे आवश्यक आहे. त्यांच्या आदेशशिवाय लाठीमार होणे शक्य नव्हते. त्यांच्यावर कारवाई आवश्यक आहे. फक्त ओबीसी अधिकाऱ्यांवर कारवाई झाली व इतरांवर झाली नसल्याचा चुकीचा संदेश जाईल,” असे ही वडेट्टीवार म्हणाले.

हिंगोलीत कडक बंदोबस्त…

दरम्यान हिंगोलीतील ओबीसी सभेच्या पार्श्वभूमीवर जिल्ह्यातील कायदा व सुव्यवस्थेच्या परिस्थितीस तोंड देण्यासाठी विशेष कार्यकारी दंडाधिकारी यांची नियुक्ती करण्यात आली आहे. जिल्ह्यातील 13 पोलीस स्टेशनसाठी प्रत्येकी एक याप्रमाणे 13 विशेष कार्यकारी दंडाधिकारी यांची नियुक्ती करण्यात आली आहे. तर, जिल्हाधिकारी तथा जिल्हादंडाधिकारी जितेंद्र पापळकर यानी फौजदारी प्रक्रिया संहिता 1973 अन्वये ही नियुक्ती केली असल्याची माहिती प्रशासनाकडून देण्यात आली आहे.

आपलं सरकार

Click to listen highlighted text!