Welcome to   Click to listen highlighted text! Welcome to

MaharashtraPoliticalUpdate : डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या संविधानामुळे मी आमदार झालो, हे साक्षीमधील सुनील प्रभू यांचे वाक्य प्रोसिडिंगमधून का वागळले ? : नाना पटोले

Spread the love

मुंबई : “सुनील प्रभू यांनी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या संविधानामुळे मी आमदार झालो, असे त्यांनी साक्षीमध्ये सांगितले पण बाबासाहेब आंबेडकरांचा नामोल्लेख सुद्धा प्रोसिडिंगमध्ये येऊ द्यायचा नाही. या पद्धतीने विधानसभा अध्यक्षांचे बाजूने कारवाई होत असेल तर ते फारच चुकीचे चाललेल आहे. त्यात दुरुस्ती व्हावी, हिवाळी अधिवेशनात  आम्ही यावर चर्चा करू. अध्यक्षांना अधिकार असतात. मात्र, ज्याप्रमाणे विधिमंडळाच्या कामकाजाला काळीमा लावण्याचे काम होत असेल तर त्यात आम्हाला शांत बसता येणार नाही, आम्ही जाब विचारू” असे  काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी म्हटले आहे.

दरम्यान नॅशनल हेराल्ड प्रकरणात ईडीने संपत्ती जप्त केली आहे. यावर आपली प्रातीक्रिया देताना पटोले म्हणाले की, “चिडलेल्या भाजपचा चेहरा यानिमित्ताने आपल्याला पाहायला मिळतोय. पाच राज्याच्या निवडणुकांमध्ये त्यांची हार झालेली आहे. पंतप्रधानांच्या सभेला लोक जमा होत नाहीत. गृहमंत्री यांच्या सभेला जमा होत नाहीत. त्यांच्यासमोर सगळीकडे हार निश्चित ठरलेली आहे, अशावेळी सूड उगवत ही कारवाई त्यांनी केलेली आहे. “मागच्या काळातही त्यांनी खूप त्रास दिला. ही काही गांधी घराण्याची प्रॉपर्टी नाही. ही देशाची प्रॉपर्टी आहे. काँग्रेस पक्षाची ही प्रॉपर्टी आहे. यातला पैसा किंवा मालमत्ता गांधी परिवाराची नाही. प्रत्येकाने आपल्या कामाचा पैसा त्या ठिकाणी लावलेला आहे. आज ना उद्या लोकांच्या समोर खरे येणार. त्यांच्या पायाखालची जमीन सरकल्यामुळे भाजपने ही कारवाई केलीय” असे नाना पटोले म्हणाले.

मराठा विरुद्ध ओबीसी संघर्ष शासन प्रायोजित …

दरम्यान आरक्षणाच्या विषयावर बोलताना पटोले म्हणाले की , आरक्षण हा मागास समाजाचा अधिकार आहे. त्याची तरतूद बाबासाहेबांनी संविधानात केलेली आहे. सरकार जातीनिहाय जनगणना करत नाही, त्यामुळे हे सगळे प्रश्न निर्माण झाले आहेत. मुस्लिम धर्मातही मागास जाती खूप आहेत, जातीचे मूळ हा धर्माचा प्रश्न नाही होऊ शकत. मुस्लिम धर्मातील ज्या मागास जाती आहेत, त्यांनाही जनगणना करून आरक्षण दिले पाहिजे. मराठा विरुद्ध ओबीसीसंघर्षावर बोलताना ते म्हणाले की ,  हे सरकार प्रायोजित होऊन हा संघर्ष घडवत आहे, राज्यातील एक मंत्री एका समूहाबरोबर जाऊन चॅलेंज करत असेल तर लक्षात आले पाहिजे की, हे सरकार प्रायोजित महाराष्ट्राला पेटवण्याचे काम सुरू आहे .

“संत तुकाराम महाराजांचा अपमान करणाऱ्यांच्या कार्यक्रमाच्या ठिकाणी उपमुख्यमंत्री, मुख्यमंत्री जात असतील तर तो त्यांचा व्यक्तिगत प्रश्न आहे. त्यांनी जावे  किंवा जाऊ नये, आमच्यासाठी इतर अनेक महत्त्वाचे प्रश्न आहेत. सरकार आपल्या दारी या कार्यक्रमाच्या माध्यमातून सरकारच्या पैशाचा चुराडा आणि लूट करण्याचे काम सुरू आहे” अशी टीकाही पटोले यांनी केली.

आपलं सरकार

Click to listen highlighted text!