Welcome to   Click to listen highlighted text! Welcome to

MarathaReservationUpdaate : अंतरवली सराटीत उसळला लाखोंचा जनसागर , येत्या १० दिवसात मराठा आरक्षण देण्याची आग्रही मागणी

Spread the love

अंतरवली सराटी : जालना जिल्ह्यातील अंतरवली सराटी येथे गेल्या काही दिवसापासून मराठा समाजाला आरक्षण मिळावे , या मागणीसाठी मनोज जरांगे पाटील यांनी आंदोलन सुरू केले आहे. जरांगे पाटील यांचे आमरण उपोषण उठविताना आंदोलकांवर पोलिसांकडून अमानुष लाठीहल्ला झाला आणि आणि हे गाव महाराष्ट्रात  रातोरात प्रसिद्ध झाले. अखेर जरांगे पाटील यांचे आमरण उपोषण सोडण्यासाठी सरकारने पुढाकार घेत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी स्वतः उपोषणस्थळी येऊन ४० दिवसांचा वेळ घेत हे उपोषण सोडवले. 

दरम्यानच्या काळात जरांगे यांनी मराठवाड्यात आणि सीमावर्ती जिल्ह्यात मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी जागृतीपर सभा घेतल्या. आज मुख्यमंत्र्यांनी दिलेल्या आश्वासनाला एक महिना पूर्ण होत असून या पार्शवभूमीवर आज अंतरवली सराटी येथे मराठा आरक्षणासाठी ऐतिहासिक सभा होत आहे . सुमारे  १०० एकर जागेत ही सभा होणार आहे. या सभेसाठी राज्यभरातून मराठा बांधव आले आहेत.

सभास्थळी कायदा-सुव्यवस्था अबाधित राहावी, यासाठी पोलिस अधीक्षकांसह तीन अतिरिक्त पोलिस अधीक्षक, ६ डीवायएसपी, २१ पोलिस निरीक्षक, ५७ सहायक पोलिस निरीक्षक व फौजदार, १००० पोलिस अंमलदार, २०० वाहतूक शाखेचे कर्मचारी, ‘एसआरपीएफ’ची एक तुकडी, ‘बीडीडीएस’चे चार पथके कार्यरत राहणार आहेत. शिवाय चार ड्रोनद्वारे सभास्थळाच्या परिसरात पाहणी केली जाणार आहे.

दहा दिवसात सरकारने आरक्षण दिले पाहिजे…

या सभेपूर्वी मनोज जरांगे पाटील यांनी माध्यमांना प्रतिक्रीया देताना मनोज जरांगे पाटील यांनी म्हटले आहे की , मराठा समाजाची आज १२ वाजता सभा सुरू होणार आहे. ही गर्दी आमच्या वेदना आहेत. मुल शिकून मोठी होतात पण नोकरीपासून वंचित राहत आहेत. आमच्यासाठी हा सुवर्णक्षण आहे. राज्यातील मराठा समाज एकत्र आलाय. सरकारच्या हातात आजपासून दहा दिवस आहेत. आज मराठा समाज शांततेत आला आणि शांततेत गेला, हा पायंडा आम्ही पाडणार आहे. आम्हाला आरक्षण पाहिजे, राहिलेल्या दहा दिवसात सरकारने आरक्षण दिले पाहिजे. आम्ही आरक्षण घेतल्याशिवाय शांत बसणार नाही, असा इशाराही जरांगे पाटील यांनी दिला.

“आता सभेला आलेली गर्दी पाहून आकडा सांगणे कठीण आहे. सभेसाठी जमलेली गर्दी ही सगळी वेदना आहे. या समाजाचा प्रश्न सरकारने मार्गी काढावा. दहा दिवस राहिले आहेत, आम्ही आरक्षण घेतल्याशिवाय शांत बसणार नाही. आज सभा संपल्यानंतर समाज शांततेत घरी जाणार आहे, असंही मनोज जरांगे पाटील म्हणाले.

मनोज जरांगे पाटील म्हणाले, आम्ही शेतकरी आहोत, सामान्य घरातील आम्ही आहोत. आम्ही या सभेचे नियोजन एकत्र येऊन केलं आहे. राज्यकर्त्यांनी एक मराठा, लाख मराठा स्वार्थासाठी म्हणायचं, असा आरोपही केला. समाजातील मनातील भूमिका मा मांडत आहे. ही गर्दी त्यासाठीच आली आहे. सगळ्यांनी समाजासोबत राहिले पाहिजेत. गोरगरीब मुलांचं चांगलं झालं पाहिजे, असंही जरांगे-पाटील म्हणाले.

मध्यरात्रीच सभास्थळी लाखोंचा जनसागर

धुळे-सोलापूर महामार्गावरील अंतरवाली सराटी परिसरातील रामगव्हाण रोडवरील १०० एकरांत शनिवारी दुपारी १२ वाजता मनोज जरांगे पाटील यांची सभा होणार आहे. सभेसाठी १० फूट उंचीचे व्यासपीठ उभे करण्यात आले आहे. तसेच जरांगे यांना प्रवेश करण्यासाठी ३ फूट उंचीचे ५०० फूट लांब रॅम्प करण्यात आले आहे. या सभेसाठी एक दिवस अगोदरच राज्याच्या कानाकोपऱ्यातून मराठा समाजबांधव अंतरवाली सराटी गावात पोहोचले आहेत. त्यामुळे, मध्यरात्रीच सभास्थळी लाखोंचा जनसागर पाहायला मिळाला. एका मराठा बांधवाच्या हाकेवर लाक मराठा समाजबांधव एकत्र आल्याचं दिसून आलं.

जरांगे पाटील यांच्या विराट सभेसाठी मराठा बांधवांनी स्वयंस्फूर्तीने अंतरवाली सराटी गाव गाठलं आहे. सभेस्थळी जाऊन तेथील फोटो आणि व्हिडिओज अनेकांनी सोशल मीडियातून शेअर केले आहेत. काहींनी फेसबुक लाईव्हच्या माध्यमातून मध्यरात्री जमलेला जनसमुदायही दाखवून दिला आहे. त्यामुळे, इतिहासात पहिल्यांदाच एका सर्वसामान्य माणसाने दिलेल्या हाकेला धावून लाखो मराठा बांधव जमा झाल्याचं दिसून येत आहे. विशेष म्हणजे येथे येणाऱ्या लाखो जनांसाठी हजारो स्वयंसेवकही पुढे आले आहेत. अनेक मराठा समाजबांधव मुक्कामी येत आहेत. मुक्कामी येणाऱ्या समाजबांधवांसाठी वडीगोद्री, अंकुशनगर, महाकाळा आदी ठिकाणी जेवणाची व्यवस्था करण्यात आली आहे.

वेगवेगळ्या माध्यमातून सभेसाठी येणाऱ्या लोकांची सेवा केली जात आहे. कुणी मोफत पाणी वाटत आहे, कुणी मोफत चहा देत आहे, कुणी मोफत नाश्ता देत आहे. तर, वैद्यकीय सेवा सुविधांचीही सोय करण्यात आली आहे. नांदेड, जालना येथील तरुणांनी तातडीची वैद्यकीय सेवा देण्यासाठी २० रुग्णावाहिका सभास्थळी तैनात गेल्या आहेत. दरम्यान, बीड-जालना या मार्गावरुन जाणाऱ्या गाड्यांमध्ये बिघाड झाल्यास त्यांची गाडी दुरुस्त करुन देण्याचं कामही येथील मॅकेनिक स्वयंसेवकांनी हाती घेतलं आहे. त्यासाठी, दोन दिवस या मार्गावर मॅकेनिक लोकांचं पेट्रोलिंग असणार आहे.

८० एकरावर वाहन पार्किंग

वडीगोद्री कृषीउत्पन्न बााजर समितीच्या आवारातील ६२ एकर, धुळे-सोलापूर महामार्गावरील दोदडगाव येथे ६ एकर, सभास्थळाजवळ शिवारात ६ एकर, रामगव्हाण येथे ६ एकर, गरजेनुसार समर्थकारखाना अंकुशनगर, वडीगोद्री- जालना महामार्गावरील धाकलगाव शिवारात गरजेनुसार वाहनांची पार्किंग केली जाणार आहे. या सभेच्या नियोजनासाठी सभास्थळी दहा हजार स्वयंसेवक नियुक्त करण्यात आले आहेत. शिवाय पाच लाख पाणी बॉटल्स, ५० पाण्याचे टँकर राहणार आहेत.

११० रुग्णवाहिका

सभास्थळी व परिसरात तब्बल ११० रुग्णवाहिका राहणार असून, यात ३५ रुग्णवाहिका या कार्डियाक आहेत. ३०० डॉक्टर, ३०० परिचारिकांचा स्टाफ कार्यरत राहणार आहे. शिवाय अत्यावश्यक सेवेसाठी ४० खाटा राहणार आहेत. अग्निशमन विभागाची १० वाहनेही नियुक्त करण्यात आले आहेत. सभास्थळावर १००० लाऊड स्पीकर लावण्यात आले असून, विविध ठिकाणी २५ मोठे स्क्रीन राहणार आहेत. सभास्थळावर येण्यासाठी ७ प्रवेशद्वार करण्यात आले आहेत.

आपलं सरकार

Click to listen highlighted text!