Welcome to   Click to listen highlighted text! Welcome to

UddhavThackerayNewsUpdate : मराठा आरक्षणासाठी बसलेल्या मनोज जिरांगे यांना भेटण्यासाठी मुख्यमंत्र्यांना वेळ नाही : उद्धव ठाकरे

Spread the love

जळगाव : मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी मागील 13 दिवसांपासून मनोज जरांगे जालना येथील अंतरवाली सराटी गावात उपोषण करत आहेत. दरम्यान, यावरूनच माजी मुख्यंमत्री उद्धव ठाकरे यांनी मुख्यंमत्री एकनाथ शिंदे यांच्यावर निशाणा साधला आहे. दिल्लीला जाण्यासाठी एकनाथ शिंदे यांना वेळ आहे, परंतु मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी उपोषण करणाऱ्या मनोज जरांगे यांची भेट घेण्यासाठी त्यांना वेळ नसल्याची टीका ठाकरेंनी केली आहे. जळगाव येथील सभेत ते बोलत होते.

दरम्यान यावेळी बोलताना उद्धव ठाकरे म्हणाले की, “दिल्लीत जी 20 ची बैठक होत आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना तिथे जाण्यासाठी वेळ आहे. पण त्याच मुख्यमंत्र्यांना जालना येथे उपोषणाला बसलेल्या मनोज जरांगे पाटील यांना भेटण्यासाठी वेळ नाही. त्यांच्या मागण्या काय आहेत. किमान त्यांच्यासोबत बोला तरी, आम्ही गेलो होतो. जरांगे यांच्यासोबत अजूनही सरकारचा कोणता अधिकृत प्रतिनिधी संवाद साधत आहे का?, एक दाढीवाला गद्दार (अर्जुन खोतकर यांच्यावर टीका) जातोय फक्त.”

हे तर ‘जालना’वाला कांड

“मी अंतरवाली सराटी गावात जाऊन आलो आहे. पोलीस देखील माणसं असून, कोरोना काळात त्यांनी आपला जीव धोक्यात घालून अनेकांचे जीव वाचवले आहेत. पण, अंतरवाली सराटी गावात उपोषण करणाऱ्या लोकांचे असे काय चुकले होते की, पोलीस आले आणि दणादण मारत सुटले. जसा जालियानवाला कांड झाला होता तसाच हा ‘जालना’वाला कांड झाला आहे. अशी राक्षसी वृत्ती महाराष्ट्रात आली कधी,” असं म्हणत उद्धव ठाकरेंनी सरकारवर टीका केली.

‘इंडिया’च्या बैठकीत मला अध्यक्षपद मिळाले

“सत्ता आली काय आणि गेली काय, मी सत्तेसाठी धडपडत नाही. माझ जीव तुमच्यासाठी आणि देशासाठी जळतोय. मागे आमची इंडिया म्हणून बैठक झाली. त्याचं अध्यक्षपद आमच्या शिवसेनेला (ठाकरे गट) देण्यात आले होते. तिथे देशातील सर्व मोठे नेते आले होते. तिथे मला एक किंमत होती आणि ती तुमच्यामुळे मिळाली. या बैठकीनंतर काही गद्दारांनी होर्डिंग लावले. ज्यात शिवसेनाप्रमुख यांचे फोटो लावून, ‘मी शिवसेनेचं काँग्रेस होऊ देणार नसल्याचा’ त्यावर लिहले होते. आम्हीपण होर्डिंग लाऊन उत्तर दिले, ‘मी शिवसेनेला कमळाबाईची पालखी वाहू देणार नाही’,” असा टोला उद्धव ठाकरे यांनी यावेळी लगावला.

बबनराव घोलप यांचा उद्धव ठाकरे यांना जय महाराष्ट्र

दरम्यान शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे प्रमुख उद्धव ठाकरे एकीकडे जळगावच्या दौऱ्यावर असताना दुसरीकडे ठाकरे गटाला मोठा धक्का बसला आहे. शिवसेना उद्धव ठाकरे गटाचे उपनेते बबनराव घोलप यांनी राजीनामा दिला आहे. बबनराव घोलप यांनी उद्धव ठाकरेंना व्हॉट्सअॅपद्वारे राजीनामा पाठवल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. शिर्डीत नव्या संपर्कप्रमुखांची निवड केल्याने तसेच भाऊसाहेब वाकचौरे यांना लोकसभेचं तिकीट जवळपास निश्चित मानले जात असल्याने बबनराव घोलप नाराज असल्याची चर्चा आहे. या नाराजीतूनच त्यांनी राजीनामा दिला असावा असं म्हटलं जात आहे. दरम्यान, बबनराव घोलप सध्या आऊट ऑफ कव्हरेज आहेत.

आपलं सरकार

Click to listen highlighted text!