Welcome to   Click to listen highlighted text! Welcome to

G20NewsUpdate : जी २० शिखर परिषदेची सांगता , पुढील यजमानपद ब्राझीलकडे

Spread the love

नवी दिल्ली : भारतात सुरु असणाऱ्या जी २० शिखर परिषदेची यशस्वी सांगता झाली आहे. जगभरातील अनेक नेते आणि विविध देशांचे प्रतिनिधी या परिषदेत सामील झाले होते. या परिषदेत विविध मुद्द्यांवर चर्चा झाली, दिल्ली जाहीरनामाही प्रसिद्ध झाला. आर्थिक, व्यावसायिक, पायाभूत सुविधा, कनेक्टिव्हिटी आदी मुद्द्यांवरून विविध देशांनी विचार आदान-प्रदान केले. दोन दिवस चाललेल्या बैठकीचा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज समारोप केला आहे. तसंच, नोव्हेंबर २०२३ पर्यंत जी २० चे अध्यक्षपद भारताकडे आहे. त्यानंतर, हे अध्यक्षपद ब्राझिलकडे असेल अशी घोषणा पंतप्रधान नरेंद्रा मोदी यांनी केली आहे.

जी २० च्या समारोपावेळी पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणाले की, “भारताकडे नोव्हेंबरपर्यंत जी २० चे अध्यक्षपद आहे. यासाठी अडीच महिने बाकी आहेत. या दोन दिवसांत आपण सर्वांनी अनेक सूचना आणि प्रस्ताव मांडले आहेत. प्राप्त झालेल्या सुचनांवर आमच्याकडून विचार करण्यात येईल, ही आमची जबाबदारी आहे. नोव्हेंबरच्या शेवटी जी २० चे एक व्हर्चुअल सेशन ठेवले जाईल. या सेशनमध्ये दोन दिवसीय शिबिरात झालेल्या मुद्द्यांची समिक्षा केली जाईल. तुम्ही या व्हर्च्युअल सत्रांत सहभागी व्हाल अशी आशा करतो. यासह, मी जी २० शिखर परिषदेचा समारोप घोषित करतो.”

दरम्यान ब्राझीलचे राष्ट्रपती आणि माझे मित्र लुला दा सिल्वा यांचे अभिनंदन करून जी २० च्या अध्यक्षपदाचे गेवल (प्रातिनिधिक चिन्ह) नरेंद्र मोदी यांनी ब्राझिलच्या राष्ट्रपतींकडे सुपूर्द केले त्यामुळे पुढील अध्यक्षपद ब्राझिलकडे गेले आहे. जी २० चे अध्यक्षपद स्वीकारल्यानंतर लुला दा सिल्वा म्हणाले की, “ब्राझीलच्या अध्यक्षपदाची तीन प्राधान्ये आहेत, सामाजिक समावेश – उपासमार विरुद्ध लढा, ऊर्जा संक्रमण – शाश्वत विकास आणि जागतिक प्रशासन संस्थांमध्ये सुधारणा.”

शिखर परिषदेच्या पहिल्या दिवशी काय घडलं?

‘ग्लोबल साऊथ’मधील विकसनशील देशांना सर्वाधिक फटका बसलेल्या युक्रेन युद्धाचा थेट उल्लेख असलेला ‘दिल्ली जाहीरनामा’ शनिवारी ‘जी-२०’ समूहाच्या शिखर परिषदेच्या पहिल्याच दिवशी स्वीकारण्यात आले. युक्रेनच्या वादग्रस्त मुद्दय़ाचाही समावेश जाहीरनाम्यात झाल्याने भारताच्या राजनैतिक मुत्सद्दीपणाचे हे मोठे यश मानले जात आहे! ‘हा काळ युद्धाचा नाही’, असे ठळकपणे जाहिरनाम्यात नमूद करण्यात आले आहे.

करोना महासाथीमुळे जगभरातीत देशांना एकमेकांबद्दल वाटणारा विश्वास कमी झाला आणि युक्रेन युद्धामुळे ही दरी वाढल्याचे जाणवते. करोनासारख्या आपत्तीवर आपण यशस्वीपणे मात केली असून अविश्वासाच्या या संकटावरही जग मात करू शकते. देशा-देशांमध्ये पुन्हा एकदा विश्वासाचे वातावरण निर्माण करून पुढे गेले पाहिजे, असा संदेश पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी जी-२० समूहातील राष्ट्रप्रमुखांच्या शिखर परिषदेच्या उद्घाटन सत्रातील भाषणाद्वारे दिला.

आपलं सरकार

Click to listen highlighted text!