Welcome to   Click to listen highlighted text! Welcome to

MaharshtraPoliticalUpdate : लाठीहल्ल्याची जबाबदारी घेत नाहीत , मग काय लाठ्यांनी जबाबदारी घ्यायची का ? उद्धव ठाकरे यांचा सवाल

Spread the love

मुंबई : मुख्यमंत्री आणि दोन्हीही उपमुख्यमंत्र्यांनी जालना जिल्ह्यातील मराठा आंदोलकांवरील लाठीहल्ला प्रकरणी होत असलेल्या आरोपांचे उत्तर देण्यासाठी आयोजित पत्रकार परिषदेत केलेल्या आरोपांना शिवसेना नेते उद्धव ठाकरे यांनी उत्तरे दिली. ठाकरे म्हणाले की , महाराष्ट्रातलं तीन तिघाडा सरकार निर्घृणपणे काम करतं आहे. न्याय हक्कांसाठी जो कुणी रस्त्यावर उतरलं तर आम्ही डोकी फोडून टाकू. घरात घुसून मारु. माता, भगिनी, वयोवृद्ध काही बघणार नाही हाच संकेत या सरकारने जालन्याच्या घटनेतून दिला आहे.

भाजपाचे नेते बबनराव पाचपुते यांचे पुतणे साजन पाचपुते यांनी आज शिवसेनेत प्रवेश केला. त्यानंतर झालेल्या पत्रकार परिषदेत उद्धव ठाकरेंनी घणाघाती टीका केली आहे. दरम्यान बारसूमध्येही असाच अनुभव आला होता. तिथेही महिलांवरही लाठीचार्ज केला होता. जे सरकार स्वतःला हिंदुत्ववादी मानतं ते वारकऱ्यांवर लाठीमार कसा करु शकतं? जालन्यात जे झालं त्याची जबाबदारी कोण घेणार? सरकार पोलिसांवर जबाबदारी झटकणार, पोलीस म्हणणार लाठ्यांमुळे लागलं मग लाठ्यांवर जबाबदारी टाकणार का? असा खोचक प्रश्नही उद्धव ठाकरेंनी विचारला.

लाठीचार्ज सरकारने केला नाही तर बाहेरुन माणसं आणली होती का? बारसूत लाठीचार्ज कुणी केला? शाळकरी मुलांवर, महिलांवर लाठीचार्ज केला. ही जबाबदारी झटकणं झालं. अत्यंत निर्घृणपणे वागायचं आणि विचारायचं लाठी आम्ही मारु का? हे तर साळसूदपणे का वागत होते.

लाठीचार्जचे आदेश कुणी दिले?

जालन्यात लाठीचार्ज करण्याचा आदेश कुणी दिला? एक फुल आणि एक हाफ, फडणवीस वेगळे काढले तरीही त्यांचं काम काय चाललंय? कारण पोलीस जर यांना जुमानता वागत असतील तर याचा अर्थ त्यांचा प्रशासनावर कंट्रोल नाही. हे सरकार चालवण्याच्या कुवतीचे नाहीत, सरकार चालवण्यासाठी नालायक आहेत आणि या सरकारने राजीनामा दिला पाहिजे असंही उद्धव ठाकरेंनी म्हटलं आहे. महाराष्ट्रातलं निर्लज्ज सरकार आपल्याला उलथून टाकायचं आहे असं उद्धव ठाकरेंनी म्हटलं आहे.

…तर मग तुम्ही वटहुकूम काढून दाखवा …

देवेंद्र फडणवीसांचं ज्ञान एवढं तोकडं असेल मला वाटत नाही. कारण हा अधिकार केंद्राचा आहे. वटहुकूम सर्वोच्च न्यायालयाच्या विरोधात राज्य सरकार काढायला लागलं तर मला वाटतं देवेंद्र फडणवीस हे मंत्रालयाच्या आसपासही फिरकण्याच्या कुवतीचे नाहीत. घटनेचा त्यांनी काहीही अभ्यास केलेला नाही असंच त्यातून सिद्ध होतं. घटना बदलण्याचं काम जे करणार आम्ही जे म्हणतोय त्याची सुरुवात आहे. सर्वोच्च न्यायालयाने दिल्लीच्या बाबतीत ते करुन दाखवलं. निकाल फिरवला. आता खास अधिवेशन घेऊन वटहुकूम काढावा. जर देवेंद्र फडणवीसांना हे वाटत असेल की वटहुकूम का काढला नाही तर तुम्ही अधिवेशन घ्या आणि तुम्ही काढा वटहुकूम असं प्रति आव्हानही उद्धव ठाकरेंनी दिलं. या घटनेची जबाबदारी स्वीकारून गृहमंत्र्यांनी राजीनामा दिला पाहिजे. मुख्यमंत्र्यांचं पोलीस ऐकत नसतील तर त्यांनीही राजीनामा दिला पाहिजे अशीही मागणी उद्धव ठाकरेंनी केली.

आपलं सरकार

Click to listen highlighted text!