Welcome to   Click to listen highlighted text! Welcome to

MaharashtraPoliticalUpdate : मुख्यमंत्र्यांच्या माफीवरून एकनाथ खडसे यांनी फडणवीस यांना घेरले , अजित पवार यांनाही घेतला चिमटा …

Spread the love

जळगाव : महाराष्ट्र पेटून उठतोय ही भीती गृहमंत्री फडणवीस यांना वाटली आणि त्यामुळे लाठीचार्ज केला, याबद्दल त्यांनी माफी मागितली, मात्र माफी मागायची सवय देवेंद्र फडणवीस यांना करावी लागेल, तर उपमुख्यमंत्री अजित पवार यावर आपली प्रतिक्रिया देतात त्यापूर्वी त्यांनी ते उपमुख्यमंत्री आहेत, आणि त्यांना सर्व अधिकार आहेत, हे त्यांनी आधी सिद्ध करावे असा टोला राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार एकनाथ खडसे यांनी गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांना लगावला आहे.

मराठा आरक्षणाची मागणी करण्यासाठी उपोषण करणाऱ्या आंदोलकांचे आंदोलन मागे घेण्याचा दबाव आणत जालना येथील मराठा समाज आंदोलकांवर लाठीचार्ज केल्याच्या घटनेचे राज्यभरात प्रतिसाद उमटत आहेत. या घटनेच्या पार्श्वभूमीवर आज मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि अजित पवार यांच्या उपस्थितीत पत्रकार परिषद संपन्न झाली.

देवेंद्र फडणवीस यांनी लाठी चार्ज झालेल्या जखमींची माफी मागितल्याच्या घटनेवर एकनाथ खडसे यांनी प्रतिक्रिया देताना फडणवीस यांना टोला लगावला आहे.

यानंतर एकनाथ खडसे यांनी माध्यमांशी संवाद साधला. यावेळी ते बोलत होते. खडसे म्हणाले की, घटना घडल्यावर लगेच माफी मागितली असती तर महाराष्ट्र पेटला नसता… माफी मागायची सवय देवेंद्र फडणवीस यांना करावी लागेल. धनगर समाज असेल किंवा इतर समाजाच्या आरक्षणाबद्दलही देवेंद्र फडणवीस यांनी शब्द दिला होता. मात्र ते तो पूर्ण करू शकले नाही, त्यामुळे फडणवीस यांना अशा पद्धतीने माफी मागण्याची वेळ आज राज्याच्या गृहमंत्र्यांवर आज आली आहे.

अजित पवार यांना काढला चिमटा …

जालना येथील लाठीचार्ज केल्याच्या घटनेत पोलिसांना शासनाच्या आदेश होते, हे सिद्ध करून दाखवावे, असे वक्तव्य अजित पवार यांनी केला आहे. यावर प्रतिक्रिया देताना एकनाथ खडसे यांनी अजित पवार यांना चिमटा काढला आहे. खडसे म्हणाले की, अजित पवार यांनी ते उपमुख्यमंत्री आहेत, आणि त्यांना सर्व अधिकार आहेत, हे त्यांनी आधी सिद्ध करावे.

लाठीचार्ज केल्याच्या घटनेची जबाबदारी स्वीकारली पाहिजे. सर्व लाईव्ह टेलिकास्ट आहे, सिद्ध करण्याची काय गरज आहे, असा सवाल एकनाथ खडसे यांनी उपस्थित केला. शांततेच्या मार्गाने आंदोलन सुरू असताना लाठी चार्ज करायला लावणं, त्या करायच्या सूचना देणे आणि माफी मागावी लागण, ही सरकारच्या दृष्टीने नामुष्की आहे, अशी टीका खडसेंनी सरकारवर केली आहे.

मोदींनी संसदेत आरक्षणाचा निर्णय घेऊन गुरुदक्षिणा द्यावी …

जालना घटना ही दुर्दैवी आणि अमानुष घटना आहे, त्याचं समर्थन कोणी ही करू शकत नाही. लाठी हल्याचा निर्णय पोलिस स्वतः घेऊ शकत नाहीत, वरून कोणाचा तरी त्यासाठी आदेश असावा लागतो तर हा आदेश देणारा गृह खात्याचा अदृश्य माणूस कोण आहे, शोधले पाहिजे. सरकारने आता अधिक चर्चा न करता मराठा समाजाला आरक्षण देण्याबाबत निर्णय घ्यावा. आता संसदेचे विशेष अधिवेशन घेतले जात आहे. त्यामध्ये कायद्यात दुरुस्ती करून आणि पन्नास टक्क्यांच्यावर आरक्षण द्यावे, खरंच जर त्यांना आरक्षण द्यायचे असेल तर त्यांनी संसदेत कायद्यात दुरुस्ती करावी आणि आरक्षण द्यावे, केंद्रात आणि राज्यात त्यांचच सरकार आहे, असही एकनाथ खडसे यांनी म्हटल आहे.

तसेच पंतप्रधान नरेंद्र मोदी जर शरद पवार यांना राजकीय गुरु मानत असतील तर त्यांनी उद्या शिक्षक दिवसाच्या निमित्ताने त्यांनी पवार याना गुरू वंदना केली पाहिजे. गेल्या साठ वर्षांपासून ते राजकारणात आहेत, पूर्वी होता तेवढाच आजही त्यांना प्रतिसाद मिळत आहे. त्यामुळे उद्या शिक्षक दिवसाच्या निमित्ताने गुरू म्हणून मोदी त्यांचा आदर सन्मान करतील, अशी अपेक्षा आहे, एकनाथ खडसे यांनी व्यक्त केली आहे.

 

आपलं सरकार

Click to listen highlighted text!