KarnatakaElectionUpdate : कर्नाटकात आज निवडणुकीचा ‘रणसंग्राम’; २,६१५ उमेदवारात जंगी लढत

बंगळुरू : कर्नाटक विधानसभा निवडणुकीसाठी आज सकाळी ७ वाजल्यापासून संध्याकाळी ६ वाजेपर्यंत मतदान होत आहे. या निवडणुकीत ५ कोटी ३१ लाख मतदार मतदान करणार असून राज्यातील २,६१५ उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात आहेत. या निवडणुकीत भाजपसमोर पुन्हा जिंकण्याचे आव्हान आहे तर यावेळी आपल्या हातात हे राज्य यावे म्हणून काँग्रेसने चांगलीच कंबर कसली आहे. निवडणूक शांततेत पार पदवी म्हणून राज्यात सर्वत्र कडेकोट बंदोबस्त ठेवण्यात आला आहे.
या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मतदानासाठी प्रशासन सज्ज झाले आयोगाने राज्यभरात एकूण ५८,५४५ मतदान केंद्रांवर मतदान करण्याची सुविधा प्राप्त करुन दिली आहे. या मतदानादरम्यान एकूण ७५,६०३ बॅलेट युनिट (BU), ७०,३०० कंट्रोल युनिट (CU) आणि ७६,२०२ व्होटर व्हेरिफायेबल पेपर ऑडिट ट्रेल (VVPAT) वापरण्यात येत आहेत.
राज्यभरातील एकूण ५,३१,३३,०५४ मतदार मतदानाचा हक्क बजावणार आहेत. या मतदारांमध्ये २,६७,२८,०५३ पुरुष मतदार तर २,६४,००,०७४ महिला मतदार आहेत. तसेच ४,९२७ इतर मतदार आपला मतदानाचा हक्क बजावणार आहेत.राज्यातील तरुण मतदारांची संख्या ११, ७१,५५८ असून १२,१५,९२० मतदार ज्येष्ठ तर ५,७१,२८१ विशेष मतदार आहेत.
दरम्यान कर्नाटकचा राजकीय इतिहास पाहता , या राज्यातील मतदारांनी सलग दोन वेळा कोणत्याही राजकीय पक्षाकडे सत्ता सोपवली नाही. दर पाच वर्षांनी राज्यात सत्ताबदल हा ठरलेला असतो. या पार्श्वभूमीवर भाजपने पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली जोरदार प्रचार केला आहे तर दुसरीकडे काँग्रेसच्या सिद्धरमय्या आणि डीके शिवकुमार या नेत्यांना पुढे करून काँग्रेसकडून सोनिया गांधी , राहुल गांधी, प्रियंका गांधी आणि मल्लिकार्जुन खर्गे यांनी अत्यंत आक्रमक प्रचार करीत भाजपच्या नाकी नऊ आणले आता यावेळी मतदार कोणाला कौल देणार याकडे देशाचे लक्ष लागणार हे उघड आहे. १३ मे रोजी या निवडणुकीचा निकाल लागणार आहे. विधानसभा निवडणुकीसाठी एकूण २,६१५ उमेदवार उभे आहेत. त्यामध्ये २,४३० पुरुष तर १८४ महिला उमेदवार आणि एक तृतीयपंथीय उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात आहेत.