Welcome to   Click to listen highlighted text! Welcome to

WorldNewsUpdate : इम्रान खानच्या अटकेमुळे पाकिस्तानात गृहयुद्धासारखी स्थिती , देशभरात १४४ कलम लागू

Spread the love

इस्लामाबाद : पाकिस्तानचे माजी पंतप्रधान आणि पीटीआय प्रमुख इम्रान खान यांना मंगळवारी दुपारी ३ वाजता इस्लामाबाद उच्च न्यायालयातून अटक करण्यात आली. इम्रान खानला अटक केल्यानंतर पाक रेंजर्सनी त्याला गाडीजवळ ओढले. त्याला अटक केल्यानंतरच इस्लामाबाद शहरासह देशभरात हिंसक निदर्शने सुरू झाली असून देशात गृहयुद्धासारखी स्थिती निर्माण झाली आहे. या पार्श्वभूमीवर देशात शांतता राहावी म्हणून संपूर्ण देशात कलम १४४ लागू करण्यात आले आहे.


दरम्यान इम्रान खान यांच्या पीटीआय पक्षाने त्यांची सुटका करण्याची मागणी न्यायालयाकडे केली आहे. इस्लामाबाद उच्च न्यायालयाच्या मुख्य न्यायमूर्तींनी हे प्रकरण गांभीर्याने घेतले आणि दुपारी लगेचच सर्व अधिकाऱ्यांना कोर्ट रूममध्ये बोलावले. मात्र, रात्री साडेदहा वाजता उशिरा आलेल्या निर्णयात इम्रान खान यांना कोणताही दिलासा मिळाला नाही. इम्रानच्या अटकेमुळे पीटीआय समर्थक प्रचंड संतापले असून त्याचे पर्यवसान हिंसक निदर्शनात झाले आहे.

दरम्यान माजी पंतप्रधान इम्रान यांच्या अटकेनंतर पीटीआयचे उपाध्यक्ष शाह मेहमूद कुरेशी यांनी कार्यकर्त्यांना शांततापूर्ण आंदोलनाचे आवाहन केले आहे . पीटीआयच्या ट्विटरवर शेअर केलेल्या व्हिडीओमध्ये कुरेशी यांनी लोकांना शांततेने आंदोलन करण्याचे आणि पीटीआयचे अध्यक्ष इम्रान खान यांच्यासोबत एकत्र येण्याचे आवाहन केले. ते म्हणाले की ते इस्लामाबादला रवाना होत असून त्यांनी पीटीआयच्या सहा सदस्यीय समितीची बैठक बोलावली आहे. कुरेशी पुढे म्हणाले की, ‘आम्हाला शांततापूर्ण मार्गाने आंदोलन करावे लागेल.’

रस्त्यावर जाळपोळ आणि ‘आझादी’च्या घोषणा

पीटीआयच्या आवाहनानंतर पक्षाच्या अनेक समर्थकांनी शहराच्या विविध भागात जाळपोळ केली आणि इम्रान खान यांना सोडण्यासाठी स्वातंत्र्याच्या घोषणाही दिल्या. इम्रानचा पक्ष पीटीआयने सुरुवातीला त्याच्या अटकेला अपहरण म्हटले होते. पीटीआयने ट्विट केले आहे की, “पीटीआयचे अध्यक्ष इम्रान खान यांचे पाकिस्तान रेंजर्सने अपहरण केले आहे.” पीटीआयने असा दावाही केला आहे की, इम्रान खान यांना अटकेदरम्यान पाकिस्तानी रेंजर्सनी धक्काबुक्की केली, ज्यामुळे ते जखमी झाले. इम्रान खान काही प्रकरणांच्या सुनावणीसाठी इस्लामाबाद उच्च न्यायालयात पोहोचले होते.

डॉनच्या वृत्तानुसार, ही संपूर्ण घटना इस्लामाबाद उच्च न्यायालयाबाहेर घडली. या खटल्यांच्या सुनावणीसाठी इम्रान मंगळवारी येथे आले असतानाच त्यांना न्यायालयाबाहेर तत्काळ ताब्यात घेण्यात आले होते. पीटीआयचे वकील फैसल चौधरी यांनी या घटनेला दुजोरा दिला आहे.

इम्रानच्या वकिलालाही मारहाण

या अटकेदरम्यान इम्रान खान इस्लामाबाद उच्च न्यायालयाच्या बायोमेट्रिक कक्षात बसले होते. पीटीआयच्या अधिकृत ट्विटर अकाऊंटवर इम्रानच्या वकिलाचा व्हिडिओ शेअर करण्यात आला आहे की, इम्रान खानचे वकील बॅरिस्टर अली गोहर यांनी प्रसारमाध्यमांशी बोलताना सांगितले की, इम्रान खानला अटक करताना रेंजर्सनी त्यांना मारहाण केली.

या मारहाणीत ‘इमरान खानच्या डोक्याला आणि पायाला दुखापत झाली आहे,’ असा दावा त्यांनी केला. दरम्यान पाकिस्तानातील पेशावरमधील एका रेडिओ स्टेशनच्या इमारतीलाही आग लागल्याने इम्रानच्या समर्थकांमध्ये किती संताप होता, याचा अंदाज येतो. याशिवाय पाकिस्तानातील मियांवली एअरबेसवर ठेवलेले डमी विमानही आंदोलकांनी जाळले आहे.

शाळा बंद आणि नेट सेवेवरही परिणाम

पाकिस्तानचे माजी पंतप्रधान इम्रान खान यांना अटक झाल्यापासून देशभरात हिंसक निदर्शने होत आहेत. परिस्थिती इतकी बिकट झाली आहे की उद्यापासून पुढील आदेश येईपर्यंत देशभरातील सर्व खाजगी शाळा बंद राहणार आहेत. याशिवाय गृह मंत्रालयाच्या आदेशानुसार संपूर्ण पाकिस्तानमध्ये मोबाईल नेटवर्क आणि इंटरनेट सेवा प्रभावित झाली आहे. देशात अनेक ठिकाणी नेट बंद आहे, तर काही ठिकाणी ते अतिशय संथ गतीने सुरू आहे.

पीटीआयचे ६ समर्थक ठार

या हिंसक निदर्शनादरम्यान, इम्रान खान यांच्या पक्ष पीटीआयने दावा केला आहे की आतापर्यंत त्यांच्या ६ समर्थकांना आपला जीव गमवावा लागला आहे आणि डझनभर पीटीआय समर्थक जखमी झाले आहेत. डॉनच्या वृत्तानुसार, इम्रान खान यांना का अटक करण्यात आली हे देखील सांगण्यात आले नाही. नंतर एन एनएबीने सांगितले की माजी पंतप्रधान इम्रान खान यांना अल कादिर ट्रस्टशी संबंधित प्रकरणात अटक करण्यात आली आहे.

काय आहे अल कादिर ट्रस्ट प्रकरण ?

अल-कादिर ट्रस्ट प्रकरणात फसवणूक केल्याप्रकरणी इम्रान खानविरोधात एफआयआर दाखल करण्यात आला आहे. हा संपूर्ण वाद अल कादिर ट्रस्ट विद्यापीठाशी संबंधित आहे. इम्रान खान, त्यांची पत्नी बुशरा बीबी आणि त्यांचे जवळचे सहकारी झुल्फिकार बुखारी आणि बाबर अवान यांनी पंजाबमधील झेलम जिल्ह्यातील सोहावा तहसीलमध्ये ‘दर्जेदार शिक्षण’ देण्यासाठी अल-कादिर विद्यापीठाची स्थापना करण्याच्या उद्देशाने अल-कादिर प्रोजेक्ट ट्रस्टची स्थापना केली.

या ट्रस्ट ला दान केलेल्या जमिनीच्या कागदपत्रांमध्ये फेरफार केल्याचा त्यांच्यावर आरोप आहे. इम्रान आणि त्याच्या पत्नीने विद्यापीठासाठीची जमीन बेकायदेशीरपणे बळकावली आणि दोघांनी पाकिस्तानातील सर्वात श्रीमंत मलिक रियाझ याला अटकेच्या नावाखाली धमकावून कोट्यवधी रुपयांची जमीन आपल्या नावावर करून घेतली.

कागदपत्रांमध्ये ट्रस्टच्या कार्यालयाचा पत्ता बनी गाला हाऊस, इस्लामाबाद असा उल्लेख करण्यात आला आहे. नंतर २०१९ मध्ये, बुशरा बीबीने देणग्या मिळविण्यासाठी बहरिया टाउन या खाजगी रिअल इस्टेट फर्मसोबत सामंजस्य करारावर स्वाक्षरी करीत ट्रस्टने बहरिया टाऊनकडून ही जमीन खरेदी केली. तथापि, गृहमंत्री राणा सनाउल्ला यांच्या म्हणण्यानुसार, या ४५८ कनाल जमिनीपैकी इम्रान खान यांनी आपला हिस्सा ठरवला आणि दान केलेली २४० कनाल जमीन बुशरा बीबीची जवळची मैत्रीण फराह गोगीच्या नावावर हस्तांतरित केली. सनाउल्लाहने दावा केला की, या जमिनीची किंमत कमी करून इम्रान खानने विद्यापीठाच्या नावावर आपला हिस्सा मिळवला. आणि हे प्रकरण दडपण्याचा प्रयत्न केला. या आरोपांनंतर, पाकिस्तानचे माजी अर्थमंत्री मिफ्ताह इस्माईल यांनी ट्विट केले की इम्रान खानने रिअल इस्टेट टायकून मलिक रियाझ यांना सुमारे 190 दशलक्ष पौंड दिले, ज्यांना नंतर ही रक्कम ब्रिटीश अधिकार्‍यांना द्यायची होती. ही रक्कम त्यांच्या कमाईची आहे गुन्ह्यातून मिळवली आहे याचा तपस करायचा आहे.

मलिक रियाझने शेकडो एकर जमीन एका ट्रस्टला दान केली, ज्याचे सदस्य इम्रान खान, बुशरा बीबी आणि फराह गोगी होते. परंतु आरोपांनुसार, ट्रस्टला २०२१ मध्ये अल-कादिर विद्यापीठ नावाच्या एका बांधकामाधीन संस्थेसाठी देणगीच्या नावावर लाखो रुपये मिळाले, ज्याचे उद्घाटन ५ मे २०१९ रोजी इम्रान खान यांनी केले होते. ते या संस्थेचे अध्यक्ष आहेत. पाकिस्तानच्या माध्यमांनी ट्रस्टला १८० दशलक्ष पाकिस्तानी रुपये मिळाल्याची बातमी दिली तेव्हा हा घोटाळा उघडकीस आला, तर रेकॉर्डमध्ये सुमारे ८.५२ दशलक्ष पाकिस्तानी रुपये खर्च झाल्याचे दिसून आले. संस्था ट्रस्ट म्हणून स्वीकारली असताना संस्था विद्यार्थ्यांकडून शुल्क का घेत आहे, असा प्रश्न उपस्थित करण्यात आला.

सरकारकडून अटकेचे समर्थन

इम्रानच्या अटकेनंतर गृहमंत्री राणा सनाउल्ला यांनी पत्रकार परिषदेत सांगितले की, इम्रान आणि बुशरा बीबी यांना गेल्या वर्षी मे महिन्यापासून नॅशनल अकाउंटेबिलिटी ब्युरो (एनएबी) कडून जबाब नोंदवण्यासाठी नोटिसा बजावल्या जात आहेत. मात्र ते तपासात सहभागी होत नव्हते. हा ५० ते ६० अब्ज रुपयांचा घोटाळा आहे. वरिष्ठ पीटीआय नेत्या शिरीन मजारी यांच्या म्हणण्यानुसार, इम्रान खान इस्लामाबाद उच्च न्यायालयात बायोमेट्रिक प्रक्रियेतून जात असताना पाक रेंजर्सनी खिडकीची काच फोडली आणि वकील आणि खानच्या सुरक्षा कर्मचार्‍यांना मारहाण केल्यानंतर त्यांना अटक केली.

इम्रान खान यांना पाकिस्तानात अटक केल्यानंतर लष्कराने तातडीची बैठक बोलावली आहे. लष्करप्रमुख जनरल असीम मुनीर, डीजी आयएसआय नसीम अंजुम, डीजीएमएओ आणि अनेक वरिष्ठ अधिकारीही यात सहभागी झाले होते. सूत्रांवर विश्वास ठेवायचा झाल्यास, या भेटीत पाकिस्तानमध्ये मार्शल लॉ लागू करण्याबाबत चर्चा झाली. दरम्यान हा हिंसक विरोध इतका तीव्र होता की लाहोरमधील गव्हर्नर हाऊसही जाळण्यात आले. याशिवाय, भारतीय लष्कर पाकिस्तानमधील अनियंत्रित परिस्थितीवर लक्ष ठेवून आहे आणि नियंत्रण रेषा आणि आंतरराष्ट्रीय सीमेवर कडक नजर ठेवली आहे.

 

आपलं सरकार

Click to listen highlighted text!