BrijbhushanSinghNewsUpdate : अखेर लैंगिक शोषण प्रकरणी ब्रृजभूषण सिंह यांच्याविरोधात गुन्हा दाखल, प्रियंका गांधी यांनी घेतली आंदोलकांची भेट

नवी दिल्ली : भारतीय कुस्तीचे अध्यक्ष बृजभूषण सिंह यांच्या विरोधात बलात्काराचा गुन्हा दाखल करण्यत आला आहे. दिल्लीच्या कनॉट प्लेस पोलीस ठाण्यात पॉक्सो कायद्याअंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. २१ एप्रिलला एका अल्पवयीन मुलीसह सात कुस्तीपटूंनी केलेल्या तक्रारीनंतर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तसेच गुन्हा दाखल झाल्यानंतर तक्रार करणाऱ्या अल्पवयीन मुलीला सुरक्षा पुरवण्यात आली आहे. अटक होईपर्यंत आंदोलन सुरूच ठेवण्याचा निर्धार कुस्तीपटूंनी केला आहे. दरम्यान काँग्रेसनेत्या प्रियंका गांधी यांनी आंदोलकांची भेट घेत त्यांना आपला पाठिंबा जाहीर केला आहे.
शुक्रवारी सर्वोच्च न्यायालयात महिला कुस्तीपटूंच्या लैंगिक छळाचा गंभीर आरोपांनंतर बृजभूषण सिंह यांच्याविरोधात दाखल करण्यात आलेल्या याचिकेवर सुनावणी झाली. दरम्यान सुप्रीम कोर्टात दिल्ली पोलिसांनी गुन्हा दाखल करण्याचे आश्वासन दिले होते. सरन्यायाधीश न्यायमूर्ती डीवाय चंद्रचूड आणि न्यायमूर्ती पीएस नरसिंहा यांच्या खंडपीठासमोर ही सुनावणी झाली. एसजी तुषार मेहता म्हणाले होते की, “दिल्ली पोलिस शुक्रवारीच एफआयआर दाखल करतील.” मात्र रात्री उशिरा ब्रृजभूषण विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पीडित कुस्तीपटूंच्या सुरक्षेची जबाबदारी दिल्ली पोलिसांवर
दरम्यान दिल्ली पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, सात महिला अधिकारी या प्रकरणाचा तपास करत आहेत . हे सर्व अधिकारी एसीपीला रिपोर्ट करतील आणि नंतर एसीपी , डीसीपीला रिपोर्ट करतील. एफआयआर नोंदवण्यासाठी नवी दिल्लीतील सुमारे १० पोलीस अधिकाऱ्यांना ठाण्यात बोलावण्यात आले होते. त्यानंतर एफआयआर नोंदवण्यात आली आहे. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, येत्या काही दिवसांत दिल्ली पोलिस तपासासाठी परदेशात देखील जाण्याची शक्यता आहे. जिथे पीडित कुस्तीपटूसोबत लैंगिक अत्याचाराची घटना घडली आहे. त्याचबरोबर देशातील प्रत्येक राज्यात जिथे लैंगिक अत्याचाराचे प्रकरण समोर आले आहे तिथे पोलीस देखील पोलीस जाण्याची शक्यता आहे. पीडित कुस्तीपटूंच्या सुरक्षेची जबाबदारी दिल्ली पोलिसांवर असेल.
सर्व पीडित कुस्तीपटूंचे जबाब नोंदवणार
एफआयआर दाखल करण्यापूर्वी दिल्ली पोलिस आयुक्तांनी अधिकाऱ्यांना बोलावून बैठक घेतली. दिल्ली पोलिसांच्या सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, आता पोलिस सर्व पीडित कुस्तीपटूंचे जबाब नोंदवणार आहे. तसेच या प्रकरणी पोलिस संबंधित पुरावे गोळा करणार आहेत.
प्रियंका गांधी यांची आंदोलकांना भेट
कुस्तीपटूंच्या संपाला पाठिंबा देण्यासाठी काँग्रेस सरचिटणीस प्रियंका गांधी शनिवारी (२९ एप्रिल) सकाळी जंतरमंतरवर पोहोचल्या. त्यांच्यासोबत काँग्रेसचे खासदार दीपेंद्र हुडाही होते. जंतरमंतरवर पैलवानांच्या धरणे आंदोलनाचा शनिवारी सातवा दिवस आहे. ब्रिजभूषण शरण सिंह यांच्याविरोधात शुक्रवारी एफआयआर दाखल झाल्यानंतरही कुस्तीपटूंचा संप सुरूच आहे. स्तीपटूंची भेट घेतल्यानंतर प्रियंका गांधी म्हणाल्या, दोन एफआयआर नोंदवण्यात आले आहेत, परंतु त्याची प्रत मिळालेली नाही. दोन एफआयआर नोंदवलेले असताना त्याची प्रत का दिली नाही. चौकशी सुरू आहे, मग अद्याप राजीनामा का दिला नाही, असा सवाल काँग्रेस नेत्याने उपस्थित केला.
यावेळी बोलताना प्रियंका म्हणाल्या की , अशा अनेक मुली आहेत ज्यांच्यासोबत हा प्रकार घडला आहे. मला समजून घ्यायचे आहे की सरकार त्यांना का वाचवत आहे. मला पंतप्रधानांकडून कोणतीही आशा नाही. मेडल आणल्यावर त्यांना घरी बोलावण्यात आले होते पण आता या माणसाला (बृजभूषण शरणसिंग) वाचवण्यासाठी एवढा प्रयत्न का केला जात आहे ? असा प्रश्नही त्यांनी उपस्थित केला आहे.