Welcome to   Click to listen highlighted text! Welcome to

वेदोक्त मंत्र न म्हणता महंतांनी पुराणोक्त मंत्र म्हटल्याने छत्रपती संयोगिताराजे यांची संतप्त प्रतिक्रिया…

Spread the love

कोल्हापूर : संभाजीराजे छत्रपती यांच्या पत्नी संयोगिताराजे छत्रपती यांनी काल राम नवमीच्या निमित्ताने नाशिकच्या काळा राम मंदिरात पूजा केली. यावेळी महंतांनी पुराणोक्त पद्धतीने पूजा करण्यास सुरुवात केली हे लक्षात येताच संयोगिताराजे छत्रपती यांनी महंतांना विरोध दर्शवत वैदिक पद्धतीने मंत्र म्हणण्यास सांगितले परंतु महंतांनी त्यांना विविध कारणे सांगत वैदिक पद्धतीने पूजा करण्यास असमर्थता दर्शविली. हा अनुभव संयोगिताराजे यांनी आपल्या इन्स्टाग्राम अकाऊंटवरून शेअर करून आपली तीव्र प्रतिक्रिया व्यक्त केली आहे.


आपल्या पोस्टमध्ये संयोगिताराजे छत्रपती यांनी म्हटले आहे की , हे श्रीरामा, स्वतःला सर्वज्ञ समजून, माणसा-माणसात भेद निर्माण करणार्‍या,परमेश्वराच्या नावाने केवळ स्वार्थ साधू पाहणार्‍यांना सद्बुद्धि दे… हीच आमची प्रार्थना,अन हेच आमुचे मागणे, माणसाने माणसाशी माणसासम वागणे..आपण सर्वजण देवाची लेकरे….आणि लेकरांनी आपल्या आई-वडिलांना भेटण्यासाठी कोणाची परवानगी कशाला हवी? या विचारानेच राजर्षी छत्रपती शाहू महाराजांनी अनेक क्रांतिकारक असे निर्णय घेतले होते. त्यांचा वैचारीक वारसा चालवण्याची जबाबदारी आणि त्यामुळे जे आत्मबल प्राप्त झाले त्यामुळेच परवा नाशिकमध्ये काळा राम मंदिरात महा मृत्युंजय मंत्राचा जप बिनदिक्कत करू शकले.

छत्रपतींना शिकवण्याचे धाडस करू नका

नाशिकच्या काळा राम मंदिरातील तथाकथित महंतांनी माझ्या पूजेसाठी पुराणातील मंत्र म्हणण्याचा प्रयत्न केला. कोल्हापूरच्या छत्रपती घराण्याच्या वारशामुळे मी ठामपणे विरोध केला.अनेक कारणे देऊन त्यांनी मला वेदोक्त मंत्राचा अधिकार कसा नाही हे सांगायचा प्रयत्न केला.शेवटी मी विचारले की ज्या मंदिरांमध्ये तुम्ही आजच्या काळातही जे नियम लावत आहात ती मंदिरे वाचविली कोणी? छत्रपतींनी वाचविली! मग छत्रपतींना शिकवण्याचे धाडस करू नका. तरीही मी महामृत्युंजय मंत्र जप का केला म्हणुन त्यांनी प्रश्न केलाच… तेव्हा मात्र परमेश्वराच्या लेकराला, आपल्या ईश्वराला भेटायला आणि त्याची स्तुती करायला तुमच्या मध्यस्थीची गरजच नाही, असे सुनावले. त्यानंतर मी तिथेच रामरक्षा पण म्हणली. या प्रसंगाने माझ्या मनात प्रश्न निर्माण झाला की शंभर वर्षात ही मानसिकता का बदलली नाही? अजूनही राजर्षी छत्रपती शाहू महाराजांनी सांगितलेल्या विचारांना खूप खोलवर रुजवावे लागणार आहे…

अजूनही खूप प्रवास बाकी आहे…अजून खूप चालावे लागणार आहे… हे श्रीरामा, त्यासाठी बळ दे आणि सर्वांना ज्ञान दे ! दरम्यान, संभाजीराजे छत्रपती यांच्या पत्नी संयोगिताराजे छत्रपती यांनी श्रीरामनवमीच्या दिवशी केलेल्या या सोशल मीडियावरील पोस्टमुळे चर्चांना एकच उधाण आले आहे.

आपलं सरकार

Click to listen highlighted text!