UddhavThackerayNewsUpdate : खेडच्या गोळीबार मैदानावरून उद्धव ठाकरे यांचा विरोधकांवर तुफान गोळीबार …
https://www.youtube.com/watch?v=q5MtvEr_NGs
खेड : निवडणूक आयोगाने शिवसेनेच्या ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेचे नाव आणि पक्षचिन्ह धनुष्यबाण मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या गटाला देण्याचा निर्णय दिल्यानंतर आपली बाजू जनतेच्या दरबारात मांडण्यासाठी खेड येथे कोकणात आपली जोरदार सभा घेऊन एकाच वेळी निवडणूक आयोग, अमित शहा , भाजप आणि शिंदे यांचा रोख ठोख शब्दात समाचार घेतला.
खेडमधील गोळीबार मैदानावरून आपल्या विरोधकांवर जबरदस्त गोळीबाराच्या फैरी झाडल्या. यावेळी बोलत्यांना त्यांनी केंद्रिय निवडणूक आयोगावर जोरदार हल्लाबोल केला. “शिवसेनेची स्थापना निवडणूक आयोगाच्या वडिलांनी नाही, तर माझ्या वडिलांनी केली आहे,” असे ठणकावत त्यांनी नाव न घेता पंतप्रधान नरेंद्र मोदींवर हल्ला चढवला. तसेच भाजपाला आधी गल्लीतलं कुत्रं विचारत नव्हतं, तेच आज शिवसेनेच्या मुलावर उठले आहेत. तर शिवसेना फोडणारे मराठी माणसाच्या आणि हिंदुंच्या एकजुटतेवर घाव घालत आहेत. हिंदुत्वासाठी शिवसेनाप्रमुखांनी संपूर्ण आयुष्य वेचलं. त्या हिंदुत्वाला धुमारे फुटत असताना शिवसेना फोडण्यात आली.
शिवसेनेची स्थापना निवडणूक आयोगाच्या वडिलांनी केलेली नाही…
ते पुढे म्हणाले , “मला निवडणूक आयोगाला खास सांगायचं आहे की, त्यांच्या डोळ्यात मोतीबिंदू झाला नसेल, तर कोणती शिवसेना खरी आहे हे पाहायला इकडं या. हा ‘चुना लगाव आयोग’ आहे. ते सत्तेचे गुलाम आहेत. वरून जे आदेश येतात त्याप्रमाणे वागणारे हे त्यांचे गुलाम आहेत. हे निवडणूक आयुक्त म्हणून राहायच्या लायकीचे नाहीत, हे मी उघडपणे बोलतो आहे.” “कारण निवडणूक आयोगाने या तत्वानुसार शिवसेना शिंदे गटाची असल्याचं सांगितलं ते तत्वच खोटं आहे. शिवसेनेची स्थापना निवडणूक आयोगाच्या वडिलांनी केलेली नाही, तर माझ्या वडिलांनी केली आहे. कदाचित तिकडं वरती निवडणूक आयोगाचे वडील बसले असतील. मात्र, ते आयोगाचे वडील असतील, माझे नाही.”
मग तुम्ही संगमाचं काय चाटत आहात?
मोदींचे नाव न घेता त्यांना थेट आव्हान ठाकरे म्हणाले की , शिवसेनाप्रमुख यांच्या मागे उभे राहिले नसते, तर हे आज दिसले नसते. मात्र, हे निष्ठुर आणि निर्घृणपणे वागत आहेत. ज्यांनी साथ दिली त्यांनाच संपवत आहेत. त्यांनी आम्हाला संपवण्याचा प्रयत्न करून पाहावा.” मेघालयात विधानसभेच्या निवडणुका झाल्या. तिकडे अमित शाहा जाऊन मुख्यमंत्री कॉनराड संगमा यांच्या भ्रष्टाचाराचे आरोप केले. निवडणूका झाल्यावर पंतप्रधानांनी ट्वीट केलं, आपण दोघं मिळून सरकार स्थापन करु. निवडणुकीत भ्रष्टाचाराचे आरोप करायचे आणि लोकांनी उताणं केल्यावर सत्तेसाठी गोंडा घोळायचा. पुण्यात अमित शाह म्हणाले होते, उद्धव ठाकरेंनी मुख्यमंत्रपदासाठी काँग्रेस-राष्ट्रवादीचे तळवे चाटले. मग तुम्ही संगमाचं काय चाटत आहात?, असा घणाघात शिवसेना ( ठाकरे गट ) उद्धव ठाकरेंनी केला आहे.
चिंचवडमध्ये गद्दारी झाली नसती, तर सुफडा साफ केला असता…
“अमित शाह कुटुंब आणि परिवारवाद यावर बोलतात. मी उद्धव बाळासाहेब ठाकरे अभिमाने सांगतो, बाळासाहेबांचा पुत्र आहे. माझे वडील अभिमानाने सांगायचे, होय मी प्रबोधकारांचा पुत्र आहे. ठाकरेंची ६ वी पिढी महाराष्ट्रातील जनतेसाठी राबत आहे. आमच्यावर घराणेशाहीचा आरोप करताना तुमचा आगापिच्छा काय आहे? तुमची वंशावळ कोणती ते आम्हाला सांगा,” असा सवाल उद्धव ठाकरेंनी उपस्थित केला. कसब्यात साफ झाले, चिंचवडमध्ये गद्दारी झाली नसती, तर सुफडा साफ केला असता. अंधेरीत निवडणूक लढायची हिंमत नव्हती. मेघालयात अमित शाहांनी कॉनराड संगमांवर भयानक आरोप केले. कुटुंबाच्या हातात राज्य आहे, गरीबांचा पैसा खाल्ला, मेघालय देशातील सर्वात भ्रष्ट राज्य सरकार आहे. तरीसुद्धा संगमांनी यांना उताणं केलं,” असा टोला उद्धव ठाकरेंनी भाजपाला लगावला.
२०२४ नंतर आपल्या देशात लोकशाही शिल्लक राहणार नाही…
मी शून्य आहे. माझ्यामागे बाळासाहेब आहेत, म्हणून मला किंमत आहे. पण, गुजरातला सरदार वल्लभभाई पटेल, बंगालमध्ये सुभाषचंद्र बोस आणि इकडे बाळासाहेब चोरले. या चोर वृत्तीला मतदान करणार का? २०२४ साली स्वातंत्र्य लढ्याशी संबंध नसलेला पक्ष गाडून टाकायचा आहे, हा निश्चय करा. नाहीतर २०२४ नंतर आपल्या देशात लोकशाही शिल्लक राहणार नाही, असा इशारा शिवसेना ( ठाकरे गट ) पक्षप्रमुख उद्धव बाळासाहेब ठाकरे यांनी दिला आहे. ते पुढे म्हणाले , “ होय मी घरात बसून महाराष्ट्र सांभाळला, पण तुम्ही दिल्लीसमोर मुजरे करत बसलात. माझ्याबरोबर महाराष्ट्र होता. आपलं जागतिक कौतुक झालं, ते माझं नाही महाराष्ट्राचं कौतुक होतं. गुजरातच्या निवडणुकांसाठी महाराष्ट्रातील उद्योग पळवले. फक्त तुटलेल्या एसटीवर गतिमान महाराष्ट्राची जाहीरात करतात. यांना शरम नाही.”
एक काळी टोपी वाला होता, आता गेला…
“त्यांना भगव्याचे तेज संपवायचे आहे. मी हवा की नको हे जनता ठरवेल निवडणूक आयोग नाही. मिंधेंच्या हातात धनुष्यबाण तरीही चेहरा पडलेला आहे. पण, ‘मेरा खानदान चोर है,’ हे कधीच पुसलं जाणार नाही,” अशी घणाघाती टीका उद्धव ठाकरेंनी एकनाथ शिंदेंवर केली.
“यांच्यात असे अनेक आहेत, ज्यांनी बाळासाहेबांना पाहिलं नाही. मात्र, आम्हाला बाळासाहेबांचे विचार सांगतात. बाळासाहेबांचे विचार नोकरी, उद्योग बाहेर जाऊ देण्याचे नव्हते. एक काळी टोपी वाला होता, आता गेला. छत्रपती शिवाजी महाराज, सावित्रीबाई फुलेंचा अपमान केला. तरीही गद्दारांच्या शेपट्या आतच. हे बाळासाहेबांचे विचार नव्हते,” असा हल्लाबोल उद्धव ठाकरेंनी शिंदे गटावर केला आहे.
भुरटे, गद्दार आणि तोतयांना सांगतोय नाव चोराल, पण शिवसेना चोरू शकत नाही. निवडणूक आयोगाचा निर्णय आम्हाला मान्य नाही. मैदानाचे नावं चांगलं आहे, गोळीबार मैदान. पण, यांची ढेगणं चिरडायला गोळीबाराची गरज नाही. तुमचे एक बोट मतदानाच्या दिवशी यांना संपवेल. ज्यांना आपलं कुटुंबीय मानलं, त्यांनी आपल्यावर वार केले,” अशी खंत उद्धव ठाकरेंनी व्यक्त केली.
https://www.youtube.com/watch?v=q5MtvEr_NGs