MadhyaPradeshNewsUpdate : कमाल झाली !! माफी मागून जैन मंदिरातून चोरलेला ऐवज चोरट्याने परत ठेवला …

बालाघाट : मध्य प्रदेशातील बालाघाट जिल्ह्यात एका चोराने काही दिवसांपूर्वी मंदिरातून चोरीला गेलेल्या चांदीच्या आणि पितळी वस्तू माफी मागून परत केल्या आहेत. या पत्रात चोराने लिहिले आहे की, ‘या चोरीमुळे मला खूप त्रास सहन करावा लागला आहे.’ बालाघाट जिल्ह्याचे अतिरिक्त पोलिस अधीक्षक विजय डाबर यांनी रविवारी सांगितले की, २४ ऑक्टोबरच्या दिवाळीच्या रात्री अज्ञात चोरट्याने ठाण्याच्या बाजार चौकातील शांतीनाथ दिगंबर जैन मंदिरातून चांदीच्या नऊ छत्र्या आणि तीन पितळी वस्तूंसह या महागड्या धातूच्या दहा वस्तू चोरून नेल्या होत्या.
डाबर यांनी सांगितले की, पोलिसांनी चोरीची हि घटना गांभीर्याने घेत पोलिसांनी तपास सुरू केला, त्यामध्ये परिसरात गस्त घालून आणि बारकाईने पुरावे गोळा करून चोरीतील आरोपी आणि संशयितांवर सातत्याने दबाव टाकला. या भीतीपोटी आरोपींनी या मंदिरातून चोरलेल्या सर्व छत्र्या इत्यादी ग्रामपंचायतीच्या नळावर एका पिशवीत माफी मागून ठेवल्या होत्या, मंदिरात पाणी भरण्यासाठी गेलेल्या एका जैन कुटुंबीयाने शुक्रवारी हे पाहिले आणि त्याबाबत सोसायटीच्या पदाधिकाऱ्यांना व पोलिसांना हि माहिती दिली. दरम्यान पोलिसांनी घटनास्थळ गाठून चोरीचा सर्व मुद्देमाल जप्त केला असून आरोपींचा शोध सुरू असल्याचे त्यांनी सांगितले.
जैन मंदिरात दिवाळीच्या रात्री घडली होती चोरीची घटना..
मध्य प्रदेशातील बालाघाट शहरातील. दीपावलीच्या रात्री २४ ऑक्टोबर रोजी लोक लक्ष्मीची पूजा आणि उत्सव साजरा करण्यात व्यस्त असताना लामटा मार्केट येथील शांतीनाथ दिगंबर जैन मंदिरातून ९ चांदीच्या छत्र्या, भामंडळ चोरीला गेले. दुसऱ्या दिवशी सकाळी जैन समाजातील लोकांनी मंदिरात जाऊन हरवलेली छत्री पाहिली, त्यानंतर हा प्रकार उघडकीस आला होता.
चोरीच्या मालासह चोराने मागितली माफी
एसपी समीर सौरभ यांनी सांगितले की, चोराने बॅगेत माफीनामा लिहिलेले एक पत्रही सोडले आहे. चोरीच्या मालासह जप्त केलेल्या चिठ्ठीत चोरट्याने आपली व्यथाही लिहिली आहे. जैन मंदिरात जेव्हापासून चोरी झाली तेव्हापासून तोट्यात वाढ होत असल्याने हा माल परत करत असल्याचे चोराने पत्रात लिहिले आहे. चोराने पत्रात असेही लिहिले आहे की, देवा …शक्य असेल तर मला माफ कर.
हि घटना उघडकीस आल्यानंतर केवळ पोलीसच नाही तर जैन समाजातील लोकांनाही याचे आश्चर्य वाटले की चोराचे मन कसे बदलले? चोरी केल्यानंतर चोर प्रामाणिकपणे संपूर्ण माल परत करतो, अशी घटना लोकांनी कधी ऐकली किंवा पाहिली नाही. दरम्यान ही घटना घडवणाऱ्या व्यक्तीनेच नवीनच चोरीला सुरुवात केलेली असावी, असे पोलिसांचे म्हणणे आहे. चोराला गेलेला माल परत मिळाला असला तरी पोलिसांकडून चोरट्यांचा शोध सुरूच राहणार असून लवकरच चोरांना अटक करण्यात येईल असे पोलिसांनी म्हटले आहे.
जालना जिल्ह्यातील घटना …
दरम्यान समर्थ रामदासांचे गाव असलेल्या जालना जिल्ह्यातील जांब समर्थ येथील मंदिरातून श्रीरामाच्या मुर्त्यांसह सर्व मुर्त्या तीन महिन्यांपूर्वी चोरून नेल्या होत्या. यावरून भाविकांना तपासासाठी मोठे आंदोलन करावे लागले. अधिवेशनातही हे प्रकरण गाजले होते. या तपासासाठी एसआयटीची स्थापना केली होती तरीही तपस लागत नव्हता अखेर घटना स्थळी मिळालेली एक चप्पल आणि चोरट्यांनी मंदिर परिसरात मारलेली तंबाखूची पिचकारी यावरून पोलिसांनी अखेर चोरट्यांना शोधले आणि दोघांना अटक करून चोरीला गेलेल्या तीन मुर्त्या परत मिळवण्यात यश प्राप्त केले. एखाद्या खून प्रकरणाप्रमाणे पोलिसांनी या चोरीचा तपस करीत यश मिळवले. जांब समर्थ येथील भाविकांनी या मुर्त्या सापडल्यानंतरच गावात दिवाळी साजरी केली.
एकीकडे मंदिरातून चोरीला गेलेल्या मूर्ती परत मिळविण्यासाठी केलेली प्रयत्नांची पराकाष्ठा कुठे आणि चोरांनी स्वतःच माफी मागून मंदिरातून चोरलेल्या वस्तू ठेवण्याची घटना कुठे ? असे या घटनेवरून म्हणता येईल.