उत्तर प्रदेश : चहातून विषबाधा झाल्याने दोन मुलांसह चार जणांचा मृत्यू
उत्तर प्रदेशातील मैनपुरी येथील एका घरावर भाऊबीजेच्या दिवशी दोन सख्ख्या भावांसह चौघांचा मृत्यू झाल्याची घटना समोर आली आहे. चहातून विषबाधा झाल्याने चौघांचा मृत्यू झाल्याचे सांगण्यात आले आहे. या घटनेत दोन मुलांसह चार जणांचा मृत्यू झाला. तर एकाची प्रकृती चिंताजनक आहे. त्याला सैफईला उपचारासाठी पाठवण्यात आले आहे.
गुरुवारी सकाळी नागला कन्हई गावातील शिवानंदन यांच्या घरी भाऊबीजेची तयारी सुरू होती. फिरोजाबाद येथे राहणारे त्यांचे सासरे रवींद्र सिंह हे घरी आले होते. दरम्यान चहा बनवणाऱ्या महिलेकडून चहापत्ती ऐवजी चहा बनवताना किटकनाशक पडले. ज्यामुळे ही दुर्घटना घडली. सर्वजण चहा प्यायला बसले चहा प्यायल्यानंतर रवींद्र सिंह यांची तब्येत अचानक बिघडली. ते बेशुद्ध पडले. तेवढ्यात सहा वर्षाचा मुलगा शिवानंद आणि पाच वर्षाचा दिव्यांश यांचीही प्रकृती खालावली. कुटुंबीयांनी तातडीने तिघांना रुग्णालयात दाखल केले. रुग्णालयात पोहोचल्यानंतर डॉक्टरांनी तिघांनाही मृत घोषित केले. त्यानंतर आणखी एकाचा मृत्यू झाला. या घटनेत एकूण चौघांचा मृत्य झाला असून औंचा पोलीस ठाण्याचे पोलीस पुढील तपास करत आहेत.