Welcome to   Click to listen highlighted text! Welcome to

IndiaNewsUpdate : नेताजी अमर रहे ….मुलायम सिंह यादव यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार

Spread the love

सैफई (उत्तर प्रदेश):  उत्तर प्रदेशचे माजी मुख्यमंत्री आणि समाजवादी पक्षाचे माजी प्रमुख मुलायम सिंह यादव यांच्या इटावा जिल्ह्यातील सैफई या त्यांच्या मूळ गावी शासकीय इतमामात अंत्यसंस्कार करण्यात आले. अखिलेश यादव यांनी वडील मुलायमसिंह यादव यांच्यावर अग्नी दिला. सकाळी १० वाजल्यापासून त्यांचे पार्थिव अंत्यदर्शनासाठी सैफई मेळा मैदानाच्या मंडपात ठेवण्यात आले होते. मुलायमसिंह यादव यांचे सोमवारी निधन झाले. वयाच्या ८२ व्या वर्षी त्यांनी गुरुग्रामच्या मेदांता हॉस्पिटलमध्ये अखेरचा श्वास घेतला.


मुलायमसिंह यादव यांचा देह पंचतत्त्वात विलीन होत असताना लोकांना लोकांनी धरती पुत्र रहे ..नेताजी अमर रहे… अशा घोषणा दिल्या. मुलायमसिंह यादव यांच्या पार्थिवावर त्यांच्या पहिल्या  पत्नी मालती देवी यांच्या स्मारकाशेजारीच अंत्यसंस्कार करण्यात आले.

केंद्रीय मंत्री राजनाथ सिंह

मुलायम सिंह यांना श्रद्धांजली वाहण्यासाठी केंद्रीय मंत्री राजनाथ सिंह सैफई येथे पोहोचले होते.  ‘पंतप्रधान मोदी येथे येऊ शकले नाहीत, परंतु त्यांनी मला त्यांच्या वतीने श्रद्धांजली वाहण्यास सांगितले. आमचे खूप घट्ट नाते होते. मुलायमसिंह यादव हे भारतीय राजकारणातील मोठे व्यक्तिमत्त्व होते. त्यांचे जाणे देशाचे मोठे नुकसान आहे. त्यांना श्रद्धांजली वाहण्यासाठी आम्ही सर्वजण येथे आलो आहोत. असे यावेळी राजनाथसिंह म्हणाले.

बॉलीवूड अभिनेते अमिताभ बच्चन

बॉलीवूड अभिनेते अमिताभ बच्चन यांच्यासोबत अभिषेक बच्चन आणि जया बच्चन देखील सपा सुप्रीमो मुलायम सिंह यादव यांना श्रद्धांजली वाहण्यासाठी उत्तर प्रदेशातील सैफई येथे उपस्थित होते. खासदार वरुण गांधी यांनीही  मुलायमसिंह यादव यांना श्रद्धांजली वाहून अखिलेश यादव यांचे सांत्वन केले.

यांची उपस्थिती …

मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्याशिवाय मुलायमसिंह यादव यांना छत्तीसगडचे मुख्यमंत्री भूपेश बघेल, राजस्थानचे मुख्यमंत्री अशोक गेहलोत, उत्तर प्रदेशचे उपमुख्यमंत्री केशव मौर्य आणि ब्रिजेश पाठक, बिहारचे उपमुख्यमंत्री तेजस्वी यादव, मध्य प्रदेशचे माजी मुख्यमंत्री, काँग्रेस नेते डॉ. कमलनाथ, मल्लिकार्जुन खर्गे, आंध्र प्रदेशचे माजी मुख्यमंत्री चंद्राबाबू नायडू, भाजप खासदार रिता बहुगुणा जोशी आणि योगगुरू बाबा रामदेव यांनीही नेताजींना आपली श्रद्धांजली वाहिली.

उत्तर प्रदेशात तीन दिवसांचा दुखवटा…

मुलायम सिंह यादव यांच्या निधनानंतर मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी उत्तर प्रदेशात तीन दिवसांचा दुखवटा जाहीर केला आहे. सोमवारी बिहारमध्येही एक दिवसाचा राजकीय शोक होता. सोमवारी सकाळी ८.१६ वाजता मेदांता येथे निधनानंतर नेताजींचे पार्थिव सैफई येथे आणण्यात आले तेव्हा हजारो कामगार त्यांच्या अंत्य दर्शनासाठी उपस्थित होते.

सोनिया गांधी यांची आदरांजली…

काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी यांनीही मुलायमसिंह यादव यांच्या निधनाबद्दल शोक व्यक्त केला आहे. आपल्या शोकसंदेशात त्यांनी म्हटले आहे कि , मुलायमसिंह यादव यांच्या निधनाची बातमी ऐकून दुःख झाले. समाजवादी विचारांचा एक बुलंद आवाज आज शांत झाला. देशाचे संरक्षण मंत्री आणि उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री म्हणून मुलायम सिंह यांचे योगदान नेहमीच अविस्मरणीय राहील. त्याहूनही अधिक म्हणजे शोषित आणि दीनदुबळ्यांच्या कार्यासाठी त्यांनी दिलेले योगदान सदैव स्मरणात राहील.”

तारुण्यात कुस्तीपटू असलेल्या यादव (८२) यांचे काल (सोमवार, १० ऑक्टोबर) गुरुग्राममधील मेदांता हॉस्पिटलमध्ये निधन झाले. २२ नोव्हेंबर १९३९ रोजी सैफई, इटावा, उत्तर प्रदेश येथे जन्मलेल्या यादव कुटुंबाची गणना देशातील प्रमुख राजकीय कुटुंबांमध्ये केली जाते.

मुलायमसिंह यादव १० वेळा आमदार आणि सात वेळा खासदार होते. ते १९८९ ते १९९१, १९९३ ते १९९५ आणि २००३ ते २००७ असे तीन वेळा उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री होते आणि १९९६ ते ९८ पर्यंत देशाचे संरक्षण मंत्री होते. एकेकाळी ते देशाच्या पंतप्रधानपदाचे दावेदारही मानले जात होते. ८२ वर्षीय मुलायम सिंह हे जवळपास दोन वर्षांपासून ब्लडप्रेशर आणि युरिन इन्फेक्शनसारख्या आजारांशी झुंज देत होते.

आपलं सरकार

Click to listen highlighted text!