Welcome to   Click to listen highlighted text! Welcome to

MaharashtraPoliticalUpdate : चर्चेतली बातमी : फडणवीस- चव्हाण भेटीचे काय आहे वास्तव ?

Spread the love

मुंबई : काँग्रेसचे ज्येष्ठ नेते अशोक चव्हाण यांनी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतल्याची चर्चा माध्यमातून केली जात होती. या भेटीनंतर अशोक चव्हाण भाजपच्या वाटेवर असल्याच्या प्रश्नांकित बातम्याही प्रसिद्ध होत होत्या. त्यावर काल काँग्रेसनेते बाळासाहेब थोरात यांनी या सर्व अफवा असल्याचा खुलासा केला होता. यावर काल फडणवीस यांनीही या बातम्यांमध्ये कुठलेही तथ्य नसल्याचे म्हटले होते तरीही हि चर्चा चालूच होती. दरम्यान आज स्वतः अशोक चव्हाण यांनी आपल्या आकस्मिक भेटीबद्दल सांगताना मी काँग्रेसची साथ सोडणार नाही. काँग्रेस नेते राहुल गांधी यांच्या भारत जोडो यात्रेचे  महाराष्ट्रातले नियोजन माझ्याकडे असून त्या तयारीत आपण असल्याचे चव्हाण म्हणाले.


चर्चेतल्या या या बातमीचा खुलासा करताना अशोक चव्हाण म्हणाले कि , “राज्यात गणेशोत्सव काळात पक्षीय भेदाभेद विसरुन नेतेमंडळी एकमेकांकडे जात असतात. यात पक्षाचा संबंध येत नाही. यानिमित्ताने राजकारणापलीकडे जाऊन गप्पा होतात. त्याचा अर्थ लगेच राजकीय भूकंप वगैरे असा होत नाही. फडणवीसांना मी भेटलो पण तो योगायोग होता. फडणवीस आणि मी योगायोगाने कुलकर्णी यांच्या घरी भेटलो. पण त्या भेटीत कोणतीही राजकीय चर्चा झाली नाही.

मी आज दिल्लीला जातोय…

चव्हाण पुढे म्हणाले कि , फडणवीस आणि माझ्या भेटीनंतर काही माध्यमांनी माझ्या काँग्रेस सोडण्याच्या बातम्या चालवल्या. मात्र मी काँग्रेसची साथ सोडणार नाही. माझ्याबद्दल या आधीही अशा चर्चा झाल्या आहेत. या बातम्यांमध्ये कोणत्याही प्रकारचं तथ्य नाही. मी आज दिल्लीला जातोय. काँग्रेसकडून  महागाईविरोधात देशव्यापी आंदोलन होत आहे. या आंदोलनात सहभागी होण्यासाठी मी निघालो आहे. उद्या या आंदोलनात माझा सहभाग असेल तसेच राहुल गांधी यांच्या भारत जोडो यात्रेचे  महाराष्ट्रातले  नियोजन माझ्याकडे आहे. त्याचंही नियोजन पुढच्या काही दिवसांत करायचे आहे.

शिंदे, फडणवीस यांची प्रतिक्रिया…

या भेटीबद्दल बोलताना देवेंद्र फडणवीस म्हणाले कि , सीएमओ ऑफिसचे समन्वयक आशिष कुलकर्णी यांच्या घरी गणपतीच्या दर्शनाला  आम्ही दोघेही एकाच वेळी पोहोचलो. ते गणपतीचे दर्शन घेऊन निघाले, तेवढ्यात मी पोहोचलो. अशा भेटी तर सगळ्यांच्याच होतात. पण अशोक चव्हाण आणि माझी ‘विशेष’ अशी कोणतीही भेट झालेली नाही, असे देवेंद्र फडणवीस यांनी स्पष्ट केले.


दरम्यान याचसंदर्भात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे केंद्रीय मंत्री नारायण राणे यांच्या घरी गणपती दर्शनासाठी मुख्यमंत्री गेले होते. यावेळी प्रसारमाध्यमांनी त्यांना,  काँग्रेसचा एक गट तुमच्यासोबत येणार आहे अशी चर्चा आहे. अशोक चव्हाण आणि देवेंद्र फडणवीस यांची भेट झाल्याचीही चर्चा आहे. याबद्दल काय सांगाल? असा प्रश्न  विचारण्यात आला. त्यावर उत्तर देताना ते म्हणाले कि , “खरं म्हणजे काँग्रेसबद्दल मी बोलत नाही. सभागृहात मी बोललोय. त्यांची जी फरफट सुरु आहे ती आपण पाहत आहोत. कोणावर टीका करण्याचा माझा स्वभाव नाही. आम्ही कोणालाही रस्ता दाखवला नाही जे आधी व्हायला हवं होतं ते आत्ता झालं आहे. जनतेच्या मनात जी भावना होती ती आम्ही जागृत केली. आम्ही बाळासाहेबांचे विचार पुढे नेत आहोत.

“तुम्ही काँग्रेस, राष्ट्रवादीला विरोध करुन शिवसेनेतून बाहेर पडलात तर तेच काँग्रेसचे नेते तुमच्या जवळ येत असतील तर?” असा प्रश्न शिंदे यांना पत्रकारांनी विचारला. त्यावर उत्तर देताना शिंदेंनीच पत्रकारांना प्रतिप्रश्न केला. “असं कुठे होतंय का? मला तर माहिती नाही,” असं शिंदे या प्रश्नावर म्हणाले.

आपलं सरकार

Click to listen highlighted text!