ShivsenaNewsUpdate : मोठी बातमी : शिंदे- फडणवीस निघाले दिल्लीला, शिवसेना टिकविण्याचे उद्धव ठाकरे यांच्यासमोर मोठे आव्हान

मुंबई : शिवसेनेचे पक्ष प्रमुख उद्धव ठाकरे यांच्यासमोर आपला पक्ष टिकविण्याचे मोठे आव्हान निर्माण झाले असल्याचे चित्र आहे. या पार्श्वभूमीवर आपले कार्यकर्त्यांचे पाठबळ वाढविण्यासाठी शिवसेनेतील बंडखोर नेते आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यात मोठा संघर्ष चालू आहे. शिंदे एकीकडे सरकार चालवत आहेत तर दुसरीकडे आमदारांच्या कार्यकर्त्यांशी मेळाव्याद्वारे संवाद साधून शिवसैनिकांना आपल्या गटात घेत आहेत. दरम्यान आता त्यांचे लक्ष शिवसेनेतील खासदारांना आपल्या गटात घेण्याच्या प्रयत्नात आहेत. त्यासाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आज रात्रीच दिल्लीला जात आहेत. त्यानंतर, उद्या ते त्यांच्यासोबत येणाऱ्या खासदारांच्या गटाला सोबत घेऊन पंतप्रधान नरेंद्र मोदींची भेट घेणार असल्याचे वृत्त आहे.
वृत्त वाहिन्यांच्या वृत्तानुसार शिंदेगटाच्या आमदारांची आज मुंबईत बैठक पार पडली. या बैठकीत शिंदे यांनी शिवसेनेची मूळ राष्ट्रीय कार्यकारिणी बरखास्त करून नवीन कार्यकारिणी निवडली असल्याचे सांगण्यात येत आहे. याच वेळी त्यांनी शिवसेनेच्या १२ खासदारांची बैठक घेतली असल्याचे सांगण्यात येत आहे. त्यानुसार शिवसेनेचे सर्वच खासदार आमच्यासोबत असल्याचा दावा दिपक केसरकर यांनी केला आहे.
शिंदे यांचा कार्यक्रम सोबत फडणवीसही जाणार…
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे आज सोमवारी रात्री ९ वाजता मुंबई येथून विमानाने नवी दिल्लीकडे प्रस्थान करीत आहेत. रात्री सव्वा अकराच्या सुमारास ते दिल्लीतील महाराष्ट्र सदन येथे पोहोचतील. त्यानंतर, दुसऱ्यादिवशी १९ जुलै रोजी मंगळवारी ते शिवसेना खासदांरांसह पंतप्रधान नरेंद्र मोदींना भेटणार आहेत. या भेटीत राज्यातील मंत्रीमंडळ विस्ताराचीही चर्चा होणार असल्याचे समजते. दरम्यान, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हेही दिल्लीत शिंदेसमवेत असणार आहेत.
खा. संजय राऊत यांच्या हालचाली
दरम्यान शिंदे यांच्या या घडामोडींची माहिती मिळताच शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी तातडीने दिल्लीतील त्यांच्या शासकीय निवासस्थानी शिवसेनेच्या खासदारांची बैठक घेतली. या बैठकीत उद्धव ठाकरेंच्या बाजूने असणाऱ्या खासदारांच्या उपस्थितीत संजय राऊत यांनी दिल्लीत पत्रकार परिषद घेत शिंदे गटावर जोरदार हल्ला चढवला. शिंदे गटाकडून शिवसेनेची राष्ट्रीय कार्यकारिणी बरखास्त करण्यात आल्याच्या वृत्तावर संजय राऊत यांचा चांगलाच संताप झालेला पाहायला मिळाला. राऊतांनी कठोर शब्दांत शिंदे गटावर हल्ला केला. “आधी विधानसभेत कॉमेडी एक्स्प्रेस सीझन १ झाला, आता त्याचा दुसरा भाग सुरू आहे, लोक सर्व पाहत आहेत आणि मजा घेत आहेत”, असे संजय राऊत म्हणाले.
ज्या ठिकाणी ठाकरे, त्याच ठिकाणी शिवसेना…
राऊत म्हणाले कि , “बाळासाहेबांनी स्थापन केलेल्या शिवसेनेतून फुटून वेगळा झालेला एक गट मूळात राष्ट्रीय कार्यकारिणी बरखास्त कसा काय करू शकतो? हे प्रचंड हास्यास्पद आहे. दरम्यान शिवसेनेचे आता पुढचे पाऊल काय असेल? असे विचारले असता संजय राऊत यांनी शिवसेनेचं पुढचे पाऊल यांच्या छाताडावर असेल असे म्हणत शिंदे गटाला आव्हान दिले. ज्या ठिकाणी ठाकरे, त्याच ठिकाणी शिवसेना, बाकी गोष्टींना अर्थ नसल्याचे सांगून राऊत म्हणाले कि, राजन विचारे हेच लोकसभेतील शिवसेनेचे प्रतोद असून जर खासदार फुटले तर त्यांना कायदेशीर भाषेत उत्तर देऊ.
मुख्यमंत्र्यांवरच टांगती तलवार म्हणूनच धडपड
“स्वत: मुख्यमंत्र्यांच्या डोक्यावर अपात्रतेची टांगती तलवार आहे. त्यामुळे त्यांनी घेतलेली मुख्यमंत्रीपदाची शपथच बेकायदेशीर आहे. आमचा न्यायव्यवस्थेवर विश्वास आहे. सर्वोच्च न्यायालयात फक्त न्यायच होईल. अपत्रातेची टांगती तलवार आमदारांवर आहे. त्यामुळेच ही धडपड सुरू आहे. तसंच आमदार आणि कार्यकर्त्यांना भ्रमित करण्यासाठी असे निर्णय शिंदे गटाकडून घेतले जात आहेत”, असं संजय राऊत म्हणाले.
दबावाखाली खासदारांना फोडण्याचा कट : खा. विनायक राऊत
दरम्यान, शिवसेना खासदार विनायक राऊत यांनीही यासंदर्भात केंद्रातील भाजपवर आरोप केला आहे. संसदेच्या अधिवेशनातच शिवसेना खासदारांना फोडण्याचा कट आखला जात असून दिल्लीकरांच्या दबावाखाली शिवसेना खासदार आहेत, असा थेट आरोपच गटनेते खासदार विनायक राऊत यांनी केला आहे. त्यामुळे, शिवसेनेतील खासदारांचाही मोठा गट आता मूळ शिवेसनेपासून फारकत घेत असल्याचे सद्यपरिस्थितीवरुन दिसून येत आहे.