Welcome to   Click to listen highlighted text! Welcome to

SharadPawarNewsUpdate : पत्रकारांच्या प्रश्नांना शरद पवार यांची बिनधास्त उत्तरे …

Spread the love

औरंगाबाद :  राष्ट्रवादीचे नेते शरद पवार यांनी आपल्या औरंगाबाद दौऱ्यात अनेक प्रश्नांची उत्तरे देताना आगामी निवडणूक महाविकास आघाडी  लढवाव्यात  अपेक्षा व्यक्त करताना आपण मध्यावधी निवडणुकांबाबत बोललो नसल्याचा खुलासा केला आहे. राज्यातील सध्याच्या राजकीय घडामोडींवर भाष्य करताना पवार म्हणाले कि,  आमच्या पक्षात काही झाले नाही, जे गेलेत ते दुसरीकडचे गेले आहेत. २०१९ मध्ये राष्ट्रवादीच्या काही लोकांनी त्या रस्त्याने जाण्याचा प्रयत्न केला होता, पण मी त्यांना जाऊ दिले  नाही,’ असे पवार म्हणाले.

दरम्यान सरकार कोसळल्यानंतर महाविकास आघाडीचे काय होणार असे प्रश्न उपस्थित होत आहेत. पण, पुढील काळात येणाऱ्या निवडणुका महाविकास आघाडीने एकत्र लढाव्यात अशी आपली इच्छा आहे. मात्र हे निर्णय बसून चर्चेतून घ्यावे लागतील, तूर्त याबाबत आमच्या तीन पक्षांची चर्चा झालेली नाही,’ असेही त्यांनी म्हटले आहे.

राज्यपालांच्या तत्परतेवरून टोला

राज्यातील सत्तांतर आणि राज्यपालांची भूमिका यावर बोलताना ते म्हणाले कि , अलीकडे देशात आणि राज्यात ज्या गोष्टी घडतात त्या आमच्याही ज्ञानात भर पडते. राज्य मंत्रिमंडळानं विधानसभा अध्यक्ष भरावं यासाठी प्रस्ताव राज्यपालांकडे पाठवला. राज्यपालांना कष्ठदायी काम असल्यानं वर्षभरात त्यांनी मंजूर केला नाही. नवं सरकार आल्यानंतर ४८ तासात राज्यपालांनी तत्परता दाखवली. महाराष्ट्राचे राज्यपाल सी. प्रकाश, महाराष्ट्राची परंपरा समृद्ध करणारे राज्यपाल राज्यानं पाहिले आहेत. सध्याचे राज्यपाल चमत्कारिक आहेत, त्यांच्यावर बोलण्यास वाव आहे, पण मी बोलणार नाही, असा टोला शरद पवार यांनी लगावला.

शिवसेनेतील बंडानंतर उद्धव ठाकरेंनी त्यांच्या कार्यकर्त्यांना शांतता राखण्याचे  आणि रस्त्यावर न येण्याचे आवाहन केले  होते. त्यामुळे  शिवसैनिक रस्त्यावर आले नाहीत. माझा न्यायव्यवस्थेवर विश्वास आहे. कपिल सिब्बल यांचे ,  न्यायालयांच्या निकालामुळे  धक्का बसल्याचे  वक्तव्य ऐकल्याचेही शरद पवार म्हणाले.

…आणि पवारांच्या प्रतिप्रश्नाने झाला विनोद !!

राष्ट्रपतीपदासाठी लवकरच निवडणूक होणार आहे. संसदेच्या यंदाच्या पावसाळी अधिवेशनात राष्ट्रपतीपदासाठी मतदान होणार आहे. सत्ताधाऱ्यांकडून द्रौपदी मुर्मू तर विरोधी पक्षांकडून यशवंत सिन्हा हे उमेदवार आहेत. शरद पवार यांनी राष्ट्रपतीपदाची उमेदवारी लढवावी अशी बिगरभाजपा पक्षांची अपेक्षा होती, पण शरद पवारांनी यास नकार दिला. याचसंबंधी प्रश्न पत्रकार परिषदेत विचारण्यात आला आणि पवारांच्या उत्तराने हशा पिकला.

“राष्ट्रपती पदासाठी तुम्ही उमेदवारी नाकारली. आता जे दोन उमेदवार आहेत, त्यांच्यातील लढत एकतर्फी होतेय असं दिसतंय. तुम्ही जर रिंगणात असता तर कदाचित ही निवडणूक चुरशीची झाली असती असं वाटत नाही का?” असा प्रश्न शरद पवार यांनी विचारण्यात आला. त्यावर शरद पवारांनी भन्नाट प्रतिप्रश्न केला. “तुम्हाला काय इथे (राज्यात) माझा कंटाळा आला आहे का?”, असं अतिशय मजेशीर वाक्य पवारांनी उच्चारलं. त्यानंतर पत्रकारांमध्ये तुफान हशा पिकला.

दरम्यान, यामागची भूमिकाही पवारांनी समजावून सांगितली. “भाजपा वगळता इतर सर्व राष्ट्रीय पक्षांनी मला राष्ट्रपती पदाची निवडणूक लढवण्यासाठी आग्रह केला होता. पण माझं वैयक्तिक मत असं आहे की हे ज्या पद्धतीचे पद आहे त्यासाठी उमेदवारीचा प्रस्ताव आपण स्वीकारू नये. कारण मी जर राष्ट्रपती झालो असतो तर माझ्यासारख्या माणसांमध्ये रमणाऱ्याला एका ठिकाणी जाणं आणि तिथंच जाऊन बसणं हे शक्य झालं नसतं”, अशी भूमिका पवार यांनी स्पष्ट केली.

…काही तरी प्रभावशाली मिळाल असेल…

शिवसेनेतील आमदारांच्या  बंडावर बोलताना ते म्हणाले , बंड करणाऱ्यांना सांगायला निश्चित कारण आहे, अशी स्थिती नव्हती. काही जण हिंदुत्व, काही जण राष्ट्रवादीचं कारण सांगत, काही जण निधीचं कारण सांगतात. सूरतला गेल्यावर याबाबत चर्चा सुरु झाल्या. महाविकास आघाडी सरकार स्थापन झाल्यानंतर या मंत्रिमंडळातील राष्ट्रवादीचे मंत्री अधिक काम करतात, प्रश्न सोडवतात, हे मी आघाडीच्या आमदारांकडून ऐकलं आहे, असं शरद पवार म्हणाले. आता काही जणांनी जो निर्णय घेतलाय त्यांच्याकडे सांगायला काही नसल्यानं ते असं बोलतात, असं शरद पवार म्हणाले. मी याला बंड, उठाव आणि गद्दारी म्हणणार नाही, असं शरद पवार म्हणाले. हा निर्णय घेणाऱ्यांना काही तरी प्रभावशाली मिळाल असेल, असं शरद पवार म्हणाले.

औरंगाबादच्या नामांतराबद्दल माहित नव्हते

औरंगाबादच्या नामांतराच्या प्रश्नावर बोलताना ते म्हणाले कि ,  नामांतराचा निर्णय घेणार हे मला माहिती नव्हते. नामांतराच्या निर्णयाबाबत योग्य पद्धतीने माहिती देण्यात आली नाही. औरंगाबाद आणि उस्मानाबाद शहराचे नामांतर करताना सुसंवाद साधला गेला नाही. थेट मंत्रिमंडळात प्रस्ताव मंजूर झाल्यावरच याबाबत समजले. नामांतराच्या मुद्द्यावर हवी तशी चर्चा झाली नाही. मुख्यमंत्र्यांचा अंतिम निर्णय असतो, तो निर्णय मंत्रिमंडळाचा म्हणून जाहीर केला नव्हता. नामांतरापेक्षा इतर मूलभूत प्रश्नावर लक्ष देणे गरजेचे होते. नामांतराचा मुद्दा हा किमान समान कार्यक्रमाचा भाग नव्हता, असेही  शरद पवार यांनी स्पष्ट केले.

आपलं सरकार

Click to listen highlighted text!