Welcome to   Click to listen highlighted text! Welcome to

Maharashtra Political Crisis : बंडखोर आमदार गुवाहाटीमध्येच अडकले , मुंबई “रिटर्न”वर अद्याप प्रश्न चिन्ह …

Spread the love

मुंबई : महाराष्ट्रात झपाट्याने बदलत असलेल्या राजकीय घडामोडींदरम्यान एक मोठी बातमी समोर आली आहे. विविध वृत्त वाहिन्यांनी  दिलेल्या माहितीनुसार, शिवसेनेचे बंडखोर नेते एकनाथ शिंदे यांनी काल रात्री वडोदरा येथे भाजपचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतली. दोघांमध्ये सरकार स्थापनेबाबत चर्चा झाली असल्याचे वृत्त असले तरी अद्याप गुवाहाटीवरून मुंबईकडे परत केंव्हा निघणार यावर प्रश्न चिन्ह कायम आहे. 

विशेष म्हणजे खऱ्या शिवसेनेवरून शिवसेनेतील अंतर्गत युद्ध तीव्र झाले असताना ही बैठक झाली आहे. उद्धव ठाकरे यांच्याकडे आमदारांची संख्या कमी असली तरी पक्षावर नियंत्रण प्रस्थापित करण्याचे जोरदार प्रयत्न सुरु केले आहेत. शनिवारी शिवसेनेच्या राष्ट्रीय कार्यकारिणीची बैठक बोलावण्यात आली असून, त्यात बंडखोरांवर कारवाई करण्याचे अधिकार उद्धव ठाकरे यांना देण्यात आले आहेत. यासोबतच पक्षाच्या पदाधिकाऱ्यांनीही त्यांच्या नेतृत्वावर विश्वास व्यक्त केला आहे.

दरम्यान एका वृत्तानुसार, एकनाथ शिंदे एका विशेष विमानाने वडोदरा येथे पोहोचले होते, जिथे दोन्ही नेत्यांची भेट झाली शुक्रवारी गृहमंत्री अमित शहा हेही वडोदरात उपस्थित होते, मात्र त्यांच्या या बैठकीला उपस्थित राहण्याबाबत काहीही सांगण्यात आलेले नाही, असे सूत्रांचे म्हणणे आहे. या प्रकरणाशी परिचित लोकांचे म्हणणे आहे की, शिंदे काल रात्री आसाममधील गुवाहाटीहून विशेष विमानाने वडोदरा येथे पोहोचले होते. जिथे त्यांनी माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतली. या बैठकीनंतर शिंदे गुवाहाटीतील पंचतारांकित हॉटेलमध्ये परतले जेथे ४० हून अधिक बंडखोर आमदार तळ ठोकून आहेत.

बंडखोर आमदारांना अपात्रतेबाबत पत्र

दुसरीकडे शिवसेनेतील ठाकरे गटाने विधानसभेच्या उपसभापतींकडे अर्ज केला असून, १६ बंडखोर आमदारांना अपात्र ठरवावे असे पत्र  दिले आहे .  या संदर्भात उपसभापतींनी या आमदारांना दोन दिवसांची मुदत दिली असून, २७ जून रोजी सायंकाळी ५.३० वाजेपर्यंत लेखी उत्तर देण्यास सांगितले आहे. दुसरीकडे शिंदे गटाने या कारवाईवर प्रश्नचिन्ह उपस्थित करत पक्षाच्या बैठकीसाठी व्हीप लागू होत नसल्याचे म्हटले आहे.

दरम्यान शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी  या मुद्द्यापासून दूर राहावे, अन्यथा ते अडकतील, असे म्हटले आहे. तरीही देवेंद्र फडणवीस हे शिवसेनेतील बंडाचे सूत्रधार असल्याचे राऊत यांनी सांगितले. राऊत म्हणाले की, मी देवेंद्र फडणवीस यांना एकच सल्ला देईन, या संकटात स्वत:ला अडकवू नका.

शिवसेनेने राष्ट्रवादी-काँग्रेससोबतच्या महाविकास आघाडीतून बाहेर पडून आपला नैसर्गिक मित्र असलेल्या भाजपशी हातमिळवणी करावी, असे शिंदे गटाने आधीच सांगितले आहे. एकनाथ शिंदे यांनीही त्यांच्यामागे राष्ट्रीय शक्ती असल्याचे म्हटले होते. त्यांच्या नव्या गटाचे नाव शिवसेना बाळासाहेब असेल आणि त्यांच्या विचारधारेवर पक्ष पुढे जाईल, असेही बंडखोर गटाने म्हटल्यानंतर शिवसेना पक्ष प्रमुख , मुख्यमंत्री उद्धव ठाकरे म्हणाले कि , शिवसेना आणि बाळासाहेब ठाकरे यांचे नाव घेऊन कोणालाही राजकारण करता येणार नाही मते मागायचीच असतील तर आपल्या बापाच्या नावाने मागा.

आपलं सरकार

Click to listen highlighted text!