Welcome to   Click to listen highlighted text! Welcome to

MaharashtraNewsUpdate : परिवहन मंत्री अनिल परब यांच्याशी संबंधित ७ ठिकाणांवर ईडीच्या धाडी, काय आहे प्रकरण ?

Spread the love

मुंबई : आज अंमलबजावणी संचालनालयाने राज्याचे  परिवहन मंत्री आणि शिवसेना नेते अनिल परब यांच्या मुंबई आणि पुण्यातील सात ठिकाणांवर छापे टाकले आहेत. मनी लॉन्ड्रिंग प्रकरणी ही कारवाई करण्यात आली आहे. पुणे, मुंबई आणि दापोली येथे हे छापे टाकण्यात आले आहेत. परब यांच्या पुणे, मुंबई आणि दापोली येथील निवासस्थानासह सात ठिकाणी तपास यंत्रणेने मनी लाँड्रिंगच्या फौजदारी कलमांखाली शिवसेना नेत्यावर नवा गुन्हा दाखल केल्यानंतर त्यांची झडती घेण्यात आली आहे. माजी मंत्री अनिल देशमुख यांच्या मनी लाँड्रिंग प्रकरणात अनिल परब यांची ईडीने चौकशी केली आहे.


दरम्यान या धाडींच्या वेळी परिवहन मंत्री अनिल परब हे वांद्रे येथील घरी नसल्याची माहिती मिळत आहे. ईडीचे अधिकारी आले तेव्हा अनिल परब घरी नव्हते. वांद्रे येथील अनिल परब यांच्या घरी ईडीच्या अधिकाऱ्यांसोबत सीआरपीएफचे सुरक्षा रक्षक तैनात केलेले आहेत.

ज्या विभास साठे यांच्याकडूनच दोपोलीत अनिल परबांनी रिसॉर्ट खरेदी केला होता.  त्याच  विभास साठे यांच्या निवासस्थानी पुण्यात ईडीकडून सर्च ऑपरेशन सुरू आहे. पुण्यातील पलेडियम इमारतीत विभास साठे यांचे घर आहे. त्यांच्याकडून घेतलेल्या  रिसॉर्टच्या बांधकामासाठी झालेल्या आर्थिक व्यवहारात मोठी अनियमितता झाल्याचा आरोप आहे आणि त्याच संदर्भात हि छापेमारी सुरू असल्याचे सांगण्यात येत आहे.

 

काय आहे प्रकरण ?

100 कोटींच्या वसुली प्रकरणात ईडीकडून ही छापेमारी सुरू असल्याचं बोललं जात आहे. यासोबतच अनिल परब यांच्यावर सुमारे 50 कंत्राटदारांकडून कोट्यवधी रुपयांची वसुली केल्याचाही आरोप आहे. सचिन वाझे याने ईडीला माहिती दिली होती की, अनिल परब यांना त्याने एक मोठी रक्कम दिली होती. याशिवाय पोलिसांच्या बदल्यांसाठी पैसे घेतले होते. तसेच काही कंत्राटदारांकडूनही वसुलीही करण्याची जबाबदारी अनिल परब यांनी सचिन वाझेला दिली होती. त्या प्रकरणात चौकशी आता ईडी करत आहे आणि त्याचाच एक भाग म्हणून ही धाड टाकण्यात आली आहे.

शिवसेनेत खळबळ

मुंबई महापालिका निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर या धाडी पडल्याने शिवसेनेत खळबळ उडाली आहे. अनिल परब हे शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांचे अत्यंत विश्वासू सहकारी आहेत. अनिल परब यांनी दापोलीत अनधिकृत रिसॉर्ट बांधल्याचा आरोप भाजपचे नेते किरीट सोमय्यांनी केला आहे. या रिसॉर्ट प्रकरणात किरीट सोमय्यांनी केंद्रीय पर्यावरण मंत्रालयाकडे तक्रार केली होती. तसेच या रिसॉर्टच्या बांधकामात काळ्या पैशांचा वापर केल्याचाही आरोप करण्यात येत आहे. याच अनधिकृत रिसॉर्ट प्रकरणात परब यांच्यावर कारवाई होणार असल्याचा दावा सोमय्यांनी केला. काही दिवसांपूर्वीच अनिल परब यांच्याशी संबंधित काही व्यक्तींवर आयकर विभागाकडून छापेमारी करण्यात आली होती.

दरम्यान  अमरावतीचे खासदार नवनीत राणा यांनीही  मुंबईचे पोलीस आयुक्त संजय पांडे आणि शिवसेना नेते अनिल परब यांच्याविरोधात सीबीआयकडे तक्रार केली होती.

आपलं सरकार

Click to listen highlighted text!