ShivsenaNewsUpdate : राज ठाकरे भाजपची “ढ ” टीम …. शिवसेनेचंही ठरलं !! औरंगाबादच्या जाहीर सभेची तारीख जाहीर

मुंबई : शिवसेनेचे पक्षप्रमुख आणि राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनीही आता सभेचे उत्तर सभेने देण्याचा निर्णय घेतला असून मुंबईच्या सभेनंतर औरंगाबादमध्येही ८ जून रोजी सभा घेण्याचे ठरवले आहे . उद्धव ठाकरे यांनी आज शिवसेनेच्या राज्यभरातील संपर्क प्रमुखांना आज ऑनलाईन मार्गदर्शन केले. या बैठकीनंतर शिवसेना नेते संजय राऊत यांनी याबाबत माध्यमांना माहिती दिली. यावेळी त्यांनी आगामी काळात शिवसेनेच्या राज्यभर सभा होणार असल्याचे सांगत, १४ मे रोजी मुंबईत बीकेसी येथे आणि ८ जून रोजी औरंगाबादमध्ये मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंच्या सभा होणार असल्याची माहिती दिली.
दरम्यान महाराष्ट्राचे मुख्यमंत्री आणि शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी मनसे प्रमुख राज ठाकरे यांच्यावर थेट हल्ला चढवला आहे. “राज ठाकरे हे आपण जणू बाळासाहेब ठाकरेच आहोत, असे समजू लागले आहेत,” असा आरोप उद्धव ठाकरे यांनी केला. तसेच राज ठाकरे हे भाजपाची ‘ब’ टीम नव्हे तर ‘ढ’ टीम आहे, असा टोलाही लगावला. उद्धव ठाकरे यांनी शुक्रवारी रात्री खासदारांची बैठक घेतली. यावेळी ते बोलत होते. शिवसंपर्क अभियानाच्या पहिल्या टप्प्यातील अनुभवही त्यांनी ऐकून घेतले आणि पुढील टप्प्यासाठी सूचना केल्या.
मुन्नाभाईशी केली तुलना , स्वतःला बाळासाहेब समजत असल्याचा आरोप …
उद्धव ठाकरे म्हणाले, “राज ठाकरे हे भाजपाची ‘ब’ टीम नव्हे तर ‘ढ’ टीम आहे. मुन्नाभाई चित्रपटात मुन्नाभाईला गांधीजी वाचून वाचून आपणच गांधींसारखे बोलू शकतो असा भ्रम होतो. तसेच हे राज ठाकरे हे आपण जणू बाळासाहेब ठाकरेच आहोत असे समजू लागले आहेत.”
पत्रकारांशी बोलताना संजय राऊत म्हणाले, “शिवसेना पक्षप्रमुखांनी राज्यभरातील शिवसैनिकांना एक संदेश दिला आहे. संघटना बांधणीत कुठेही मागे राहता कामा नये, हल्ल्याला प्रतिहल्ला करावाच लागेल. ढोंगाचे बुरखे फाडावेच लागतील. विशेषता: जे बनावट हिंदुत्ववादी आहेत, त्यांचे आव्हान वैगेरे आम्हाला काही नाही, आम्ही लढू. १४ तारखेला बीकेसी मध्ये सभा आहे. त्यानंतर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे औरंगाबादमध्ये ८ जून रोजी सभेसाठी येणार आहेत आणि महाराष्ट्रात फिरण्याचा संकल्प त्यांनी जाहीर केला. ”
दरम्यान “शिवसेना पक्ष प्रमुखांनी अनेक विषयांवर भाष्य केलं आहे, पण ते भाष्य हे शिवसेना पदाधिकाऱ्यांना मार्गदर्शन करण्यासाठी होते. अनेक विषयांवर ते आक्रमकपणे बोलले आहेत, जोरदार पद्धतीने त्यांनी मार्गदर्शन केलेलं आहे. त्यांचं वक्तव्य हे पदाधिकऱ्यांसाठी प्रेरणादायक आहे. ” असेही यावेळी संजय राऊत यांनी सांगितले. “भाजपा स्वत:च बुस्टर डोस घेत आहे. त्यांचे हिंदुत्व हे तकलादू असल्याने त्यांना नवहिंदुत्वाचा बुस्टर डोस घ्यावा लागत आहे.” अशा शब्दात संजय राऊत यांनी भाजपावर देखील यावेळी निशाणा साधला.