RajThackerayNewsUpdate : १५० ब्राह्मणांचा आशीर्वाद घेऊन औरंगाबादकडे निघताहेत राज ठाकरे , सभेसाठी पोलिसांचा कडेकोट बंदोबस्त

पुणे / औरंगाबाद : औरंगाबादेत होणारी १ मे ची सभा निर्विघ्न पार पाडावी आणि पुढील कार्य चांगल्याप्रकारे पार पडावे यासाठी सुमारे १५० ब्राह्मणांचा आशीर्वाद घेऊन मनसे अध्यक्ष राज ठाकरे हे उद्या सकाळी साडेआठच्या सुमारास पुण्यावरुन औरंगाबादच्या दिशेने रवाना होणार असल्याचे वृत्त आहे. खरे तर “शिवसेनेचे हिंदुत्व हे शेंडी -जानव्याचे आणि घंटाधारी हिंदुत्व नाही तर आमचे हिंदुत्व हे गदाधारी हिंदुत्व” असल्याचे वक्तव्य मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी केल्यामुळेच कि काय १५० ब्राह्मणांचा शुभाशीर्वाद घेऊनच ते उद्धव ठाकरे यांना सभेतून उत्तर देतील असे एकूण चित्र आहे . दरम्यान औरंगाबादच्या सभेच्या तयारीसाठी पोलिसांनीही कडेकोट बंदोबस्त ठेवला आहे.
३ तारखेला पुण्यात सर्वत्र महा आरत्या , विश्व हिंदू परिषद, बजरंगदलसह ८ हिंदुत्ववादी संघटनांचा पाठिंबा
राज ठाकरेंच्या औरंगाबाद दौऱ्याला रवाना होण्यासंदर्भात मनसे पुणे शहर अध्यक्ष साईनाथ बाबर यांनी याबाबत माहिती दिली आहे. मुंबई येथून राज ठाकरेंचे दुपारी साडेतीन वाजण्याच्या सुमारास पुण्यातील ‘राजमहाल’ येथील निवासस्थानी आगमन झाले. त्यावेळी कार्यकर्ते देखील उपस्थित होते. औरंगाबादच्या सभेशीवाय ३ तारखेला रमजान ईद आणि अक्षय्य तृतीयेच्या दिवशी पुणे शहर मनसेकडून पुण्यातील सर्व मंदिरात महाआरतीच आयोजन करण्यात आले आहे. त्या संदर्भात मनसेकडून तयारी सुरू असून आज शहर कार्यालयात विश्व हिंदू परिषद, बजरंग दल त्यांच्या संलग्न असलेल्या सात ते आठ संघटनांनी पाठिंबा दर्शविला आहे.तसेच त्या कार्यक्रमात सहभागी होणार असल्याचे संघटनांकडून सांगण्यात आले आहे.
सभेसाठी पोलिसांचा कडेकोट बंदोबस्त
दरम्यान औरंगाबादमधील राज ठाकरे यांनी पाडव्याच्या दिवशी शिवतीर्थावरील सभेत मशिदीवरील भोंग्यावरून केलेल्या वक्तव्यामुळे राज्यातील राजकीय आणि सामाजिक वातावरण ढवळून निघाले आहे. आपल्या याच सभेत राज ठाकरे यांनी भोंग्यासंबंधी सरकारला दिलेली डेडलाइन संपण्यापूर्वीच १ मे रोजी, महाराष्ट्रदिनी त्यांची औरंगाबादमध्ये सभा होत असून या सभेसाठी पोलिसांनी कडेकोट बंदोबस्ताची तयारी केली आहे. राज यांच्या सभेच्या निमित्ताने २ हजार पोलिस, ७२० एसआरपीएफ दलाचे जवान तैनात करण्यात येणार आहेत. सभेच्या ठिकाणी मैदानात ३०० पोलिसांसह ५ डीसीपी, ७ एसीपी आणि पीआय, पीएसआय यांचा बंदोबस्त लावण्यात आला आहे. तसेच मैदानातील प्रवेशद्वारावर १० ते १५ सीसीटीव्ही लावण्यात येणार आहेत. याच सीसीटीव्हीच्या माध्यमातून राज यांच्या सभेवर पोलीस मुख्यालयातून लक्ष ठेवण्यात येणार आहे.
सभेसाठी मनसेची जय्यत तयारी
हि सभा यशस्वी करण्यासाठी बाळा नांदगावकर आणि मुंबईतील नेत्यांची खास यंत्रणा गेल्या ८ दिवसांपासून प्रयत्न करीत असून सभेचा प्रचारही केला जात आहे. राज यांच्या या सभेसाठी २० हजार झेंडे, २० हजार रुमाल आणि निमंत्रण पत्रिकाही वाटण्यात आल्या आहेत. शहराच्या वाहतुकीवर सभेचा परिणाम होऊ नये म्हणून मनसे शिष्टमंडळ आणि पोलिस प्रशासनाची आज बैठक झाली. या बैठकीत सभेच्या पार्किंगविषयी चर्चा झाली. औरंगाबादमधील शहरातील कर्णपुरा भागात पार्किंग व्यवस्था करण्यात आली आहे. शहरात चार ठिकाणी पार्किंगची व्यवस्था करण्यात आली आहे. सभास्थळी जाण्यासाठी ३०० ते ५०० रिक्षा कार्यकर्त्यांना बाबा पेट्रोल पंपापासून सभास्थळी घेऊन जाणार आहेत, अशी माहिती मनसे जिल्हाध्यक्ष सुमीत खांबेकर यांनी दिली.
औरंगाबाद संवेदनशील शहर
औरंगाबाद संवेदनशील शहर म्हणून प्रसिद्ध आहे. कुठल्याही घटनेचे येथे तात्काळ पडसाद उमटतात. भीमा-कोरेगाव प्रकरणाचे शहरात असेच पडसाद उमटले होते. विशेष म्हणजे यापूर्वी औरंगाबादमध्ये अनेक दंगली झाल्या आहेत. शिवाय राज ठाकरे या सभेत वादग्रस्त बोलण्याची शक्यता नाकारता येत नाही. यापूर्वीही त्यांनी भोंग्याबद्दल अल्टीमेटम दिलाच आहे. हे सारे पाहता त्यांच्या सभेपूर्वी पोलिसांनी चोख बंदोबस्त ठेवला आहे. त्या दिवशी शहरभर पोलीस तैनात राहणार आहेत. शहरातील विविध पक्ष संघटनांनी राज यांच्या सभेला विरोधही केला असून पोलिसांनी घालून दिलेल्या नियमांचा भंग झाला तर सभा उधळून लावण्याचा इशारा भीम आर्मी या संघटनेने दिला असल्याने ऐनवेळी परिस्थिती चिघळायला नको, याची दक्षता पोलिसांकडून घेण्यात येत आहे.
खा . इम्तियाज जलील यांच्याकडून राज ठाकरे यांना निमंत्रण
दरम्यान राज ठाकरे यांनी मशिदीवरील भोंग्यांवरून रान उठवले असून त्याचे पडसाद देशभर उमटत असले तरी मुस्लिमांच्या हितासाठी कोणत्याही राजकीय अथवा सामाजिक संघटनांना विरोध करणाऱ्या एमआयएम पक्षाने मात्र कधी नव्हे तो राज यांच्या या सभेबाबत नरमाईची भूमिका घेत त्यांच्या सभेला विरोध न करण्याचे ठरविले आहे. अर्थात हा आमच्या पक्षाचा किंवा पक्षाचे प्रमुख खा. असदुद्दीन ओवेसी यांचा निर्णय नसून माझा औरंगाबादसाठीचा निर्णय असल्याचा खुलासा खा. इम्तियाज जलील यांनी केला आहे. याउलट खा. जलील यांनी राज ठाकरे यांना ईदचे मंत्रण दिले असून राज ठाकरे हे औरंगाबादचे पाहुणे असल्याचे म्हटले आहे. मात्र या वादावर बोलताना खा. ओवेसी यांनीही अत्यंत सावध प्रतिक्रिया देत ” हा दोन भावांचा वाद असून त्यात आम्ही का पडायचे ? ” असे म्हटले होते त्यावरून या विषयावर एमआयएम ने शांत राहणेच पसंत केले असल्याचे दिसत आहे. राष्ट्रवादी काँग्रेसच्या अल्पसंख्यांक आघाडीने मात्र सभेला विरोध केला आहे.
जनहित याचिकाकर्त्याला न्यायालयाचा बांबू
राज ठाकरे यांच्या सभेच्या पार्श्वभूमीवर रिपब्लिकन युवा मोर्चा नामक संघटनेचे जिल्हा प्रमुख जयकिशन कांबळे यांनी औरंगाबाद खंडपीठासमोर जनहित याचिका दाखल केली होती. या याचिकेत एक तर हि सभाच रद्द करण्यात यावी किंवा परवानगी दिल्यास पोलिसांच्या अटींची काटेकोर पालन होणे आवश्यक असल्याची भूमिका जयकिशन कांबळे यांनी याचिकेमधून मांडली होती. मात्र न्यायालयाने राज ठाकरेंच्या सभेविरोधातील ही जनहीत याचिका राजकीय हेतून प्रेरित असल्याचे नमूद करून याचिका कर्त्यांना पुढील तीन दिवसात एक लाखांचा दंड ठोठावत फेटाळली आहे.
याआधीच भीम आर्मी संघटनेनं सुरुवातीपासून राज ठाकरेंच्या या सभेला विरोध दर्शवला आहे. आज सकाळी माध्यमांशी बोलताना भीम आर्मी संघटनेचे राष्ट्रीय महासचिव अशोक कांबळे यांनी पुन्हा एकदा सभा उधळून लावण्याचा इशारा दिला आहे. “१ तारखेला राज ठाकरेंची औरंगाबादमध्ये सभा आहे. ती सभा उधळून लावू या भूमिकेवर आम्ही आजही ठाम आहोत. कालच आम्हाला कळलं की राज ठाकरेंच्या सभेला पोलिसांनी परवानगी दिली आहे. पोलिसांनी दिलेल्या १६ अटींचं जर राज ठाकरेंनी उल्लंघन केले , तर त्याच सभेमध्ये छत्रपती शिवाजी महाराज, डॉ. बाबासाहेब आंबेडकर, महात्मा फुले या महापुरुषांच्या घोषणा तुम्हाला ऐकायला मिळतील. आम्ही कुठल्याही व्यक्तीच्या विरुद्ध नाही. पण जो भारताच्या संविधानाच्या विरुद्ध वागेल, त्याच्याविरुद्ध आम्ही आहोत”, असे त्यांनी म्हटले आहे.